पुस्तक | गोष्ट पैशापाण्याची | लेखक | प्रफुल्ल वानखेडे |
---|---|---|---|
प्रकाशन | सकाळ प्रकाशन | समीक्षण | अक्षय सतीश गुधाटे |
पृष्ठसंख्या | १८३ | मूल्यांकन | ४.९ / ५ |
मला कोणी विचारलं.. मी कोणती दोन पुस्तकं वाचू ज्याने सगळं आयुष्य सुरळीत होऊ शकेल, तर मी सांगेल साने गुरुजी यांचं "श्यामची आई"
आणि प्रफुल्ल वानखेडे यांचं "गोष्ट पैशापाण्याची". एक पुस्तक तुम्हाला
प्रेम आणि करुणा शिकवेल आणि दुसरं तुम्हाला कष्ट आणि पैसा. याहून आयुष्यात
सफल होण्यासाठी मला अधिक आवश्यक गोष्टीच वाटतं नाहीत.
मी हे पुस्तक हातात घेतलं आणि वाचत सुटलो. आवघ्या दोन तासात पुस्तक संपवूनच उठलो. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व मुद्द्यांवरून नजर फिरवली आणि थक्क व्हायला झालं. प्रत्येक मुद्दा आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकाने अनुभवलाच असेल, किंवा नसेल तर, अनुभवतीलच. जर मला हे पुस्तक आधी ५-१० वर्ष आधी वाचायाला मिळालं असतं तर कितीतरी अधिक पटीने, पैशाबाबतच्या कित्येक गोष्टी आधिच स्पष्ट झाल्या असत्या अस वाटून गेलं.
पुस्तक
सुंदरच आहे.. सुरवात मुखपृष्ठावरूनच झाली आहे. जितकं साधं, तितकंच बोलकं.
आपला पैसा, आपली मूल्ये आणि त्याच्याशी संलग्न असलेली आपली कृती. यातून
आपलं साकार होणारं भविष्यच या पुस्तकात आहे, अस मला वाटतं. अनेक
लहान-मोठ्या अनुभवसंपन्न कथांमधून लेखकाने पैशाबद्दल असणाऱ्या सर्व बाबी
नमूद केल्या आहेत. मराठी लिखाणात सर्वात कमी हाताळलेला हा विषय.. पैसे,
व्यवहार, व्यवसाय.. नफा, तोटा, माणुसकी.. आणि त्यात आपली कृती नक्की कशी
असावी आणि कोणत्या वेळी कशी नसावी हे दोन्ही या पुस्तकात एकदम साध्या
शब्दात नमूद केले आहे. एकूण ३१ अनुभव लेख यात आहेत. त्या प्रत्येक लेखागणीक
पैशांबद्दलची एक नवीन बाजू आपल्यासमोर मांडली आहे.
आयुष्याच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर, आपण कोणत्या गोष्टी चुकू शकतो आणि कधी कोणत्या दुर्लक्षित करतो.. त्याचे परिणाम.. दुष्परिणाम.. आणि ती परिस्थिती सुधारता कधी येऊ शकली असती याची देखील इत्यंभूत माहिती आणि विशेष म्हणजे त्याला असणारी माणुसकीची जोड, या पुस्तकाला विशेष उंचीवर नेऊन ठेवते. "प्रत्येक वेळी व्यवसाय करताना, पैसे कमवताना कोणाला फसवायलाच हवे अस नाही, प्रेमाने, माणुसकी जपत.. किंबहुना याला अधिक प्राधान्य देऊन आपण सर्वच लवकर आर्थिक सबळ होऊ शकू." हीच या पुस्तकाची खास बाब आहे. आर्थिक साक्षरता, पुस्तक वाचन.. अजून किती.. नी काय-काय आहे या पुस्तकात. अक्षरशः लिहीत राहावं वाटतं आहे. इतकं सुंदर पुस्तक मला वाचायला मिळाल्याबद्दल लेखकाचे मनस्वी आभार!
प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवं अस पुस्तक. नक्की वाचा, आणि आम्हाला कळवा, या पुस्तकाबद्दल तुमची प्रतिक्रिया!
-© अक्षय सतीश गुधाटे.