Your Next Five Moves | युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह | Patrick Bet-David, Greg Dinkin | पॅट्रिक बेट-डेव्हिड, ग्रेग डीनकिन


लेखक पॅट्रिक बेट-डेव्हिड, ग्रेग डीनकिन
पृष्ठसंख्या २८९
प्रकाशन सायमन अँड शुस्टर
समीक्षण आकाश जाधव
मूल्यांकन ४.३ | ५


"व्हॅल्यूटेनमेंट" या यूट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्धी झोतात आलेले पॅट्रिक बेट-डेव्हिड यांनी सहलेखक ग्रेग डीनकिनसहित लिहिलेलं "युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह" हे पुस्तक आपल्याला व्यवसाय यशस्वीरीत्या कसा चालवायचा याबद्दल सांगतं. लेखकाच्या मते व्यवसाय आणि बुद्धिबळ हे एकसमान आहेत. तुम्हाला व्यवसाय यशस्वीरित्या चालवायचा असेल तर तुम्हाला किमान तुमच्या पुढच्या पाच चाली ठाऊक असायलाच हव्यात. वरवर तुम्ही तुमच्या निर्णयाचे पाच वेगळ्या परिस्थितींचे अनाकलन आधीच करू शकता, जेणेकरून निर्णयानंतर त्या परिस्थितींना तुम्ही योग्य रीतीने हाताळू शकता.

पुस्तक पाच प्रकरणांत (चालींमध्ये) विभागलेलं आहे. प्रत्येक प्रकरणात चाली विस्तृतपणे, संदर्भांसहित स्पष्ट केल्या आहेत. पॅट्रिक यांनी जागोजागी त्यांचे अनुभव पेरले आहेत, जे नक्कीच कोणत्याही व्यावसायिकाला मार्गदर्शक ठरतील. पुस्तक पॅट्रिक यांनी खूप मनापासून लिहिलं आहे, आणि त्यांचं यशस्वी उद्योजक बनवायचं ध्येय हे जाणवत राहतं.
भारतात काही घरांमध्ये व्यवसाय पुढच्या पिढीला शिकवला जातो (किंवा व्यवसायाचं बाळकडू घरातूनच मिळतं), तर काही घरांमध्ये व्यवसाय हा शब्दच प्रतिबंधित असतो. अशा घरातील तरुण/तरुणींना व्यवसायात धक्के खाऊन त्यातील बेसिक्स शिकावे लागतात. हे धक्के "युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह" हे पुस्तक नक्कीच काही प्रमाणात कमी करू शकतं. लेखकाने क्लिष्टपणा टाळला आहे, जो सहसा आपल्याला इतर व्यावसायिक पुस्तकांमध्ये बघायला मिळतो. पॅट्रिक हे स्वतः यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी त्यांची विचारपद्धती जशीच्या तशी मांडली आहे. त्यांच्या जीवनातील वेचक प्रसंग पुस्तकात डोकावत राहतात. व्यवसायात सिस्टिम आणि प्रोसेसचं महत्व ते तुम्हाला पटवून देतात. पुस्तकातील माझं सर्वांत आवडतं वाक्य:

"अमेरिकेत फक्त २०० डॉलर खर्चून तुम्ही तुमच्या कंपनीचे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) होऊ शकता. पण खरा फरक तेव्हा पडतो, जेव्हा इतर लोक तुम्हाला CEO म्हणू लागतात."

व्यवसाय म्हणजे काय? तो कसा उभा करायचा? कसा वाढवायचा? व्यावसायिक शत्रूला कसं थोपवायचं? कंपनीमध्ये कल्चर कसं असावं आणि ते कसं निर्माण करावं? तुमचे सर्वोत्तम कामगार सोडून न जावेत यासाठी काय करावं? महत्वाच्या मिटींग्जच्या आधी काय आणि कोणती तयारी करावी? छोट्या व्यावसायाला मोठं स्वरूप कसं द्यायचं? व्यवसाय डिजिटल कधी करायचा? अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. माझ्यामते हे "युअर नेक्स्ट फाईव्ह मूव्ह" हे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. जर तुम्ही व्यवसायात उतरणार असाल किंवा व्यवसाय विस्ताराच्या विचारात असाल, तर हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे.




संबंधित व्हिडिओ

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने