पुस्तक | श्रीमान योगी |
लेखक | रणजित देसाई |
पृष्ठसंख्या | ११५० |
प्रकाशन | मेहता पब्लिशिंग हाऊस |
समीक्षण | आकाश जाधव |
मूल्यांकन | ५ | ५ |
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक रणजित रामचंद्र देसाई कृत 'श्रीमान योगी' ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासावर आधारित दर्जेदार कादंबरी.
'श्रीमान योगी' फेब्रुवारी १९६८ साली प्रकाशित झाली. तेव्हा शिवाजी महाराजांचे अधिकृत आणि सरस चरित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे रणजित देसाईंनी कादंबरी स्वरूप शिवचरित्र लिहिण्याचे शिवधनुष्य उचलले. त्यासाठी त्यांनी आग्र्यापासून जिंजीपर्यंत वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. सेतुमाधवराव पगडी, सुंदरभाई बुटाला, अ. रा. कुलकर्णी व इतर अनेक इतिहासतज्ज्ञांनी त्यांना मदत केली. शिवचरित्र लिहिणे तसे कठीण कारण एखाद्या घटनेबाबत इतिहासकार आणि लेखक यांच्या दृष्टिकोनात भिन्नता असू शकते आणि कोणते पुरावे खरे मानावेत याबद्दल देखील मतभेद असणारच/असतातच. 'श्रीमान योगी' सर्वात अचूक व सर्वोपरी विचार केलेलं शिवचरित्र कहाणी आहे असा लेखकाचा दावा नाही तसं त्यांनी नमूद केलं आहे. या कादंबरीस श्री. नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना दिली आहे ज्यात त्यांनी अस्सल आणि विश्वनीय पुराव्यांचा आधारावर लेखन पूर्ण करण्याचा सल्ला देसाईंना दिला आहे. कुरुंदकरांनी लिहिलेली प्रस्तावना विलक्षण आहे, ती प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. शिवकालीन घटनांकडे त्यांनी तटस्थपणे पाहिलं आहे, अनेक शक्यता तपासल्या आहेत. इतकं सूक्ष्म निरीक्षण इतिहासाचा सखोल अभ्यास असल्याशिवाय शक्य नाही.
युगप्रवतर्क छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि बुद्धीसामर्थ्याने फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा इतिहास बदलला. प्रजेला गुलामगिरीतून मुक्त केलं, गनिमांना धुळीस मिळविलं, पातशाह्यांना जेरीस आणलं आणि मऱ्हाटा पातशाही उभी केली, स्वराज्य उभं केलं. ५० वर्षाच्या अल्प जीवनप्रवासात शिवाजी महाराजांनी अविश्वसनीय कर्तृत्व केलं. मुत्सद्दी राजकारणी, दूरदृष्टे, धोरणात्मक रणनितीकार, सावधपणे जोखीम स्वीकारणारे, चतुर सेनानी, गनिमी डावपेच आखण्यात तरबेज, प्रजाहितदक्ष, प्रेरणादायी असे शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूवर, गुणांवर आणि विचारांवर स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो.
'श्रीमान योगी' चं मुखपृष्ठ आवरण अतिशय सुरेख आहे आणि पुस्तक बांधणी उत्कृष्ट तर मुद्रण दर्जेदार आहे. पुस्तकाच्या शेवटी तीन गडांचे नकाशे देखील देण्यात आले आहेत. मराठी साहित्यात 'श्रीमान योगी' च स्थान नेहमीच अढळ राहील. पुस्तकाची सुरुवात शहाजी महाराज आणि जिजाऊसाहेबांच्या शिवनेरी पायथ्याच्या भेटीपासून होते. देसाईंच्या लेखणीच्या ताकद इतकी कि पहिला प्रसंग वाचत असतानाच तो आपल्या समक्ष घडत असल्याचं भासतं आणि संवाद वाचून परिस्थिती उलगडत जाते. शिवजन्मापूर्वीची राजकीय पार्शवभूमी आपल्याला आपल्यासमोर उलगडत जाते.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
छत्रपती शिवरायांचा जन्म ते मृत्यू असा जीवनप्रवास लेखकाने कादंबरीत मांडला आहे. शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाची व्यक्तिमत्व जसे कि शहाजी महाराज, जिजाऊसाहेब, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, महाराणी सईबाई, शंभूराजे आणि इतरांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. कादंबरीत केवळ युद्ध आणि विजयाबद्दल न लिहिता त्यासमवेत शिवरायांचे वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध आणि त्यांच्या भावनांबद्दल देखील लिहिण्यात आलेलं आहे. कादंबरीचे नायक छत्रपती शिवराय असले तरी लेखकाने त्यांना मनुष्य भिंगातून, एक व्यक्ती म्हणून ते कसे होते, या दृष्टिकोनातून त्यांचं व्यक्तिमत्व कागदावर चितारलेलं आहे. शिवरायांनी अविश्वसनीय पराक्रम केला पण काहीप्रसंगी त्यांना माघार देखील घ्यावी लागली. अशा प्रसंगातून ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले, स्वराज्य विस्तार केला. शिवरायांकडे आपण नेहमीच परिपूर्ण नायक म्हणून बघतो पण हि कादंबरी शिवरायांकडे मनुष्य म्हणून पाहते आणि तेच या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. त्याच बरोबर प्रभावी व्यक्तिमत्व चित्रण आणि प्रत्येक महत्वाच्या पात्राला भावनिक खोली हे देखील या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे.
पुरंदर जिंकण्याचा प्रसंग वाचताना शिवरायांचं चातुर्य ध्यानात येत. सिंहगड जिंकणे, चंद्रराव मोरेंचे पारिपत्य, जावळी ताब्यात घेणं, प्रतापगडाचे काम, अफजलखान वध, पन्हाळा जिंकणे, विजापूरवर आक्रमणाची तयारी, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका आणि पावनखिंड, रायगडाचे काम, शाहिस्ताखान वर हल्ला, सुरतेवर आक्रमण, पुरंदर चा तह, आग्रा आणि औरंगजेब भेट आणि सुटका, सिंहगड, राज्याभिषेक आणि दक्षिण दिग्विजय मोहीम हे सर्व प्रसंग वाचताना आपण इतिहासात हरवून जातो. दक्षिण दिग्विजय मोहीमेतील गोवळकोंडा भेट हे प्रकरण अतिशय वाचनीय आहे, शिवरायांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला त्यातून दिसून येतं. शिवरायांनी शून्यातून सुरुवात केली, चार बलाढ्य शत्रुंना लढा दिला. विजयनगर सारखं वैभवशाली हिंदू साम्राज्य जिथे मुसलमानी तडाख्याने अस्तास गेलं, तिथे शिवरायांनी बलाढ्य सुलतानी संकटाला तोंड देत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
"अहद तंजावर ते तहत पेशावर" अवघा मुलुख आपलाच...
रणजित देसाईंनी अक्षरशः शिवकाळ आपल्या लेखणीने जिवंत केला आहे. तत्कालीन आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती, गडकिल्ल्यांची वर्णनं, वेशभूषा, चालीरीती, शाहिरी पोवाडे हे सर्व ऐतिहासिक आयाम खुबीने लिहिले आहेत. पात्रांची बोलीभाषा पुस्तकाच्या कालखंडाला शोभेल अशी आहे, त्यावर मावळ प्रांताचा प्रभाव जाणवतो. संवादांमध्ये सहजता आहे, लिखाण वास्तवाला धरून आहे. प्रसंग उभे करताना लेखकाने अतिनाट्य स्वरूप देण्याचा मोह टाळला आहे.
पुस्तकात शिवरायांनी लिहिलेली मोजकी अस्सल पत्रं देखील देण्यात आली आहेत. जी वाचून आपण शिवरायांना अजून बारकाईने अभ्यासू शकतो. ऐतिहासिक घटना, पात्र चित्रण, शौर्य आणि पराक्रम, संवाद आणि तत्कालीन चित्रण यासर्वांचा सुरेख मेळ लेखकाने 'श्रीमान योगी' मध्ये जमवून आणला आहे.
पुस्तक ६० च्या दशकात लिहिलं असल्यामुळे त्यात काही वादग्रस्त व्यक्तिमत्व उल्लेख देखील आहेत. कदाचित तेव्हा सर्व पुरावे उपलब्ध नसावेत. पुस्तकातील काही प्रसंगांमध्ये शिवरायांवर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला असे लिहिलं आहे आणि लिखाण अश्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे जेणे करून अप्रत्यक्षरीत्या संशयाची सुई महाराणी सोयराबाईंकडे वळते. (याबाबत कोणते ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्यास जाणकारांनी कमेंट करून कळवा) असो, हि बाब वगळता कादंबरीत कोणतेच कच्चे दुवे नाहीत.
'श्रीमान योगी' हे मराठी साहित्यातील रत्न आहे. रणजित देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण व्यक्तिचित्रण केलेले आहे. 'श्रीमान योगी' मराठी जणांमध्ये तर प्रसिद्ध आहेच त्याचबरोबर तिची हिंदी आणि इंग्रजी आवृत्ती देखील प्रकाशित झाली आहे. संशोधन, भाषिक अलंकार, अप्रतिम व्यक्तीचित्रण आणि प्रसंगवर्णने, शिवरायांच्या जीवनाचा सखोल अभ्यास, तत्कालीन स्थिती-परिस्थितीचा चौफेर आढावा आणि लेखकाच्या प्रामाणिक लिखाणामुळे 'श्रीमान योगी' अजरामर झालेलं आहे. प्रत्येक मराठी माणसाने हि कादंबरी जरूर वाचायला हवी आणि संग्रही ठेवावी.