पुस्तक | राधेयकर्ण |
लेखक | विनायक सदाशिव वाकसकर |
पृष्ठसंख्या | ११८ |
प्रकाशन | वरदा प्रकाशन |
समीक्षण | आकाश तानाजी जाधव |
मूल्यांकन | ४ | ५ |
कर्णाचा संक्षिप्त जीवनप्रवास गोष्ट आणि संवाद स्वरूपात या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
'राधेयकर्ण' ची पहिली आवृत्ती १९३६ साली प्रकाशित झाली, म्हणजेच शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय (१९६७) आणि रणजित देसाई यांचं राधेय (१९७३) प्रकाशित होण्याआधी कित्येक वर्ष आधी 'राधेयकर्ण' लिहिलं गेलं होत. त्याअर्थी मराठी साहित्यातील कर्णावर आधारित हे पाहिलं पुस्तक ठरेल. (*या विषयी अधिक माहिती असल्यास कृपया कॉमेंट करून माहिती कळवावी.) वरदा प्रकाशनाने या पुस्तकाची तिसरी आवृत्ती २०२३ मध्ये प्रकाशित केली. मी या पुस्तकास कर्णाचं लघुचरित्र म्हणेन.
वि. स. वाकसकर हे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ, त्यांचा जन्म १८८४ सालचा. 'तंजावरचे मराठे राजे' हे त्यांचं महत्वाचं ऐतिहासिक लिखाण. २० व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल हे कर्णावरील पुस्तक अनेक अर्थांनी वेगळं आहे. तेव्हा कर्णाचं चरित्र एके ठिकाणी उपलब्ध नव्हतं म्हणून वाकसकरांनी अभ्यास करून, लिहून ते पूर्ण केलं.
या पुस्तकात कर्णाचा जन्म ते वध असा प्रवास ११ प्रकरणात मांडला आहे. महाभारतातील १८ प्रकारणांपैकी १२ प्रकरणांमध्ये कर्णाचा उल्लेख आढळतो. हे उल्लेख एकत्रित करून त्यातील महत्वाचे प्रसंग संक्षिप्त करून 'राधेयकर्ण' मध्ये मांडले आहेत. कर्णाचा जन्म कसा झाला?, त्याला सूतपुत्र म्हणून का हिणवलं गेलं?, दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा का घोषित केलं?, कर्ण पराक्रमी होता का? कर्णाने पांडवांना हरवले होते का? धर्मराज युधिष्टिरास कर्णाच्या भीतीमुळे झोप का येत नव्हती? अभिमन्यूला मारण्यात कर्णाचा सहभाग होता का? कर्ण रणसंग्राम सोडून कधी पळाला होता का? अर्जुन कर्णाचा पराक्रम पाहून भीतीने शिबिरात पळून गेला होता का? कर्णवध श्रापामुळे झाला कि अर्जुनाच्या पराक्रमामुळे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकातून मिळतील.
सूर्यपुत्र कर्ण आपल्या सदगुणांमुळे आणि दानशूरतेमुळे ओळखला जातो. फक्त सूतपुत्र आहे म्हणून कर्णाची सामर्थ्यता वेळोवेळी डावलली गेली, त्याला अपमानित करण्यात आलं. सर्व परिस्थिती त्याच्या विरुद्ध असताना देखील तो रंकाचा राजा झाला. त्याने आपल्या अविश्वसनीय पराक्रमाने सर्वांना आचंबित केलं. कौरवांना बलशाली केलं. पुस्तक वाचताना प्रकर्षाने असं जाणवतं कि, महाभारत हे कौरव विरुद्ध पांडव असं असलं तरी ते मुळात रणभूमीवर कर्ण विरुद्ध पांडव अस झालं. कर्ण निःसंशय पराक्रमी, सद्गुणी आणि दानशूर होता, त्यावर वेळोवेळी अन्याय झाला होता, अपमान झाला होता, तो सहनशील होता, वचन पाळणारा होता तरीही त्याच्या कडून काही प्रमाद घडलेच त्यामुळे त्याच चरित्र शुद्ध न राहता त्यावर काही डाग राहतात ज्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही.
कर्णाने सर्व पांडवांना किमान एकदा तरी हरवले आहे. कर्णाला देखील रणसंग्रामात हार पत्करावी लागली आहे. 'राधेयकर्ण' मधे महाभारतातील प्रसंग आणि संवाद बऱ्यापैकी जसेच्या तसे दिले आहेत. अस असलं तरी पुस्तकात कर्णावर मुक्तहस्ते स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत, कर्णासाठी बरीच विशेषणे वापरण्यात आली आहेत.
महाभारतातील प्रसंग आणि संवाद उत्तम रंगवण्यात आले आहेत. पांडव आणि कर्णाची तुलना करताना लिखाण कर्णाकडे झुकतं. महाभारतातील महत्वपूर्ण ज्या ज्या व्यक्तींसोबत कर्णाचा संबंध आला किंवा संवाद झाला तो या लघुचरित्रात नमूद करण्यात आला आहे. यातील कृष्ण-कर्ण आणि कुंती-कर्ण संवाद वाचनीय आहे. काही प्रसंग/संवाद तुम्हाला तत्वज्ञान सांगून जातील. ज्यांना अस्त्र म्हणजे काय आणि ते कोणते मंत्र म्हणून अवगत होतात याविषयी कुतूहल आहे त्यांच्यासाठी शेवटच्या प्रकरणांमध्ये एका ओळीत काहीतरी दडलंय.
कर्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण हे आपल्यालाच ठरवायचं आहे. हे पुस्तक तुम्हाला ते ठरवण्यासाठी फक्त पार्शवभूमी तयार करून देतं. कौरव जिंकले कि पांडव हे पण आपल्यालाच ठरवायचं आहे. उपसंहार पर्वात कर्णाच्या जीवनप्रवासाचं विश्लेषण केलं आहे. महाभारतकाळातील वर्णव्यवस्था नक्की कशी होती, जात महत्वाची कि गुणकौशल्य याची उहापोह देखील केली आहे. काही ठिकाणी महाभारतातील प्रसंग वैज्ञानिक द्रुष्ट्या बघण्यात आले आहेत, जस कि विस्मृती चा प्रसंग, जे कि नक्कीच कौतुकास्पद आहे.
'राधेयकर्ण' च्या लिखाणाचा कालखंड लक्षात घेता तेव्हाची, बोलीभाषेतील मराठी आणि आत्ताची मराठी यातील फरक जाणवतो. लेखकाने काव्यात्मक शब्दांचा बराच वापर लिखाणामध्ये केला आहे. काही ठिकाणी इतक्या अवजड शब्दांचा वापर केला आहे कि त्याचा अर्थ तर सोडाच पण ते शब्द नीट वाचताही येत. काही शब्द मराठी आहेत कि संस्कृत त्यावर मी सखोल अभ्यास केला नाही पण तुम्हाला ते पुस्तक वाचताना नक्कीच जाणवेल. लिखाणात सुसूत्रता आहे पण लेखनशैलीत एकसंधता नाही. शेवटच्या प्रकरणात १९११ साली प्रसिद्ध झालेल्या 'दुर्योधनाची फिर्याद' या रा. गोखले यांनी लिहिलेल्या लेखाची आणि लेखकाची चांगलीच पडताळणी केली आहे. बऱ्यापैकी हा लेख सर्वांना माहित नसल्याने मूळ गाभ्यापासून दूर जात असल्याचं जाणवतं. हि पडताळणी या पुस्तकात का करण्यात आली हे समजायला मार्ग नाही कदाचित तेव्हा हा लेख सर्वत्र चर्चेत (ट्रेण्डिंग) असेल.
एकूणच 'राधेयकर्ण' नक्कीच वाचनीय आहे. ज्यांनी मृत्युंजय आणि राधेय कादंबरी वाचली आहे त्यांनी पडताळणीसाठी हे लघुचरित्र नक्की वाचावं आणि ज्यांनी या कादंबरी नाही वाचल्या त्यांनी सुरुवात या लघुचरित्रापासून करायला हरकत नाही. आणि ज्यांना कर्णाचं व्यक्तिमत्व प्रचंड आवडतं त्यांनी तर नक्कीच 'राधेयकर्ण' वाचायला हवं.