| पुस्तक | भटकंती |
| लेखक | हेरमान हेसे |
| अनुवाद | रेणूप्रसाद पत्की |
| पृष्ठसंख्या | १२० |
| प्रकाशन | वॉल्डन पब्लिकेशन |
| समीक्षण | योगिता बुटाला |
| मूल्यांकन | ४.५ | ५ |
मूळ जर्मन पुस्तकाचे नाव ‘वॉंडर्रंग’ (Wanderrung)
'भटकंती' मध्ये लेखक हेरमान हेसे यांनी जर्मनी सोडून इटलीच्या उत्तर भागात केलेल्या भटकंतीचे प्रवासवर्णन असले तरीही, पुस्तकाचा मूळ गाभा आहे – आत्मचिंतन.
या प्रवासात मुक्तचिंतनातून ‘स्व’चा शोध घेणे हे स्वगतरुपी हेरमान हेसे यांनी या पुस्तकात मांडले असून, त्यांनी स्वहस्ते काढलेल्या चित्रांच्या साहाय्याने सविस्तरपणे लिहिले आहे. या ‘स्व’च्या शोधात निसर्गाचे मानवी आयुष्यातील स्थान, चाकोरीबद्ध जीवनाचा साखळदंड तोडून विनापाश एखाद्या भटक्याप्रमाणे जगणे, नवे अनुभव घेत स्वतःला माणूस म्हणून समृद्ध करणे, हे त्यांना अपेक्षित आहे. हेरमान हेसे यांनी स्वतःच्या मनातील विचारांना उत्स्फूर्तपणे व्यक्त करत, जगण्याच्या रोजच्या धकाधकीत हरवलेल्या स्वतःला नव्याने स्वतःच्याच मूळ स्वरूपात नेण्याचा प्रवास केला आहे व हीच त्यांची खरी ‘भटकंती’! त्याच वेळी, ते नव्या अनुभवांना सामोरे जायला मनाने पूर्ण तयार आहेत हे ही जाणवते.
सहसा, मूळ भाषेतील पुस्तक अनुवादित होत असताना त्यातील आशय अनुवादकाच्या हातून निसटतो. पण हे पुस्तक त्यास अपवाद आहे. अनुवादक श्री. रेणूप्रसाद पत्की यांनी त्यांचे भाषेवरील प्रभुत्व सिद्ध केले आहे.
प्रवाहीपणे, एकामागोमाग एक वाक्य वाचकांना एका विचारातून दुसर्या विचाराकडे नेते. त्यामुळे, भराभरा वाचून संपवण्याचे हे पुस्तक नसून, प्रत्येक वाक्य वाचत, मनात परत परत घोळवत, त्यावर विचार करत, वाचकाने स्वतःचे अनुभव त्यासह ताडून पाहत, त्यावर चिंतन केले, तर हे पुस्तक किती वैश्विक (म्हणजे युनिव्हर्सल) आहे याची जाणीव होईल.
प्रत्येक वाक्य वाचकांस एक नवा अनुभव देईल, विचारांना दिशा देईल व चिंतन करण्यास भाग पाडेल, अशी या पुस्तकात ताकद आहे. उदाहरणार्थ,
“मुळात सीमा ओलांडून जाणे, ही संकल्पनाच किती सुंदर आहे!”,
“तुझे घर हे कुठल्या एका ठिकाणी वसलेले नाही, ते एकतर तुझ्या ‘आत’ आहे किंवा मग ते कुठेच नाही”,
“तो स्वतःपेक्षा कोणी वेगळं होण्याची इच्छाच करत नाही आणि तेच असतं घर सापडणं, ठाव गवसणं. तोच असतो खरा आनंद”,
“खिन्नता हळूहळू विरत जाते, आयुष्य पुन्हा सुंदर होतं, आकाश पुन्हा सुंदर होतं, भटकंतीला पुन्हा अर्थ प्राप्त होतो”,
“अनेक प्रकारच्या ध्रुवांमधे माझे आयुष्य हेलकावे खात राहते. या बाजूला घराची ओढ, तर त्या बाजूला भटकंतीची”,
“पुन्हा पुन्हा रात्रीच्या नीरव शांततेत जीवन या ना त्या रुपात आपली पावलं वाजवत राहतं”,
“आपल्या या वेगवान आणि बधिर करून टाकणार्या आयुष्यात आपला आत्मा स्वतःला आपल्यासमोर उघड करू शकेल असे क्षण क्वचित येतात”,
“सगळया सुंदर गोष्टी या अशा पद्धतीने पिशवीत भरून ठेवून अडचणीच्या काळासाठी जपून ठेवता आल्या असत्या तर?”,
“हे रस्ते हर्षाकडे जाणारे आहेत की दुःखाकडे हे मला माहित नाही, पण या रस्त्यांनी मला जायचं आहे आणि मला जावंच लागेल, एवढे मला माहिती आहे”.
ही आणि अशी वाक्यं उद्धृत करताना जाणवते की हे मुक्तचिंतन किती खोलवर वाचकांच्या मनाचा तळ गाठणारी आहेत. म्हणूनच, प्रत्येक वाचकांना या पुस्तकातला ‘भटक्या’ म्हणजे मीच आहे की काय असे वाटले तर नवल नाही!
पुस्तकाचे दोन भागात पुढीलप्रमाणे विभाजन केलेले आहे :
भाग १. भटकंती
भाग २. इतर लेख
पहिल्या भागात, ‘भटकंती’ हा मूळ जर्मन भाषेतील ‘वॉंडर्रंग’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. दुसरा भाग हा लेखक हेरमान हेसे यांचे काही निवडक लेख व त्यांची माहिती, ‘भटकंती’विषयी अनुवादक श्री. रेणूप्रसाद पत्की यांचे मनोगत अशी पुस्तकाची मांडणी आहे. अनुवादकाचे मनोगत पुस्तकाच्या शेवटी ठेवण्याचा अनोखा, अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे व मराठी साहित्यात हा नाविन्यपूर्ण म्हणावा लागेल. हा प्रकार मराठी साहित्यात कदाचित नवीन प्रघात अथवा पायंडा पाडणारा ठरू शकतो. मात्र मनोगत शेवटी सादर करण्याचे प्रयोजन तितकेसे स्पष्ट नाही.
दुसर्या भागात, लेखक हेरमान हेसे यांनी लिहिलेले ६ निवडक लेख आहेत जे या पुस्तकाच्या विषयाला साजेसे आहेत. मात्र, ‘निद्राहीन रात्री’ या लेखाला या लेखमालेत शेवटी सादर करायला हवे होते, असे जाणवते. हा लेख अतिशय अप्रतिम असून, प्रत्येक मानवाने आपल्या आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे, हा लेख वाचताना आपलाच अनुभव व आपल्याच भावना प्रतिबिंबित होत असल्याचा भाव प्रत्येक वाचकाच्या मनामधे निर्माण होऊ शकतो.
लेखक हेरमान हेसे यांनी ‘भटकंती’ या पुस्तकामार्फत निसर्ग मानवी आयुष्यात कसा घट्ट विणला गेला आहे हे निदर्शनास आणून दिले आहे.
त्यांना ‘भटक्या’चे जीवन जगताना आयुष्याच्या शेवटी इटलीत स्थायिक व्हावेसे वाटले. त्यामुळे तिथे ते वास्तव्य करून राहिले. इटली येथील वास्तव्यात, त्यांनी ‘सिद्धार्थ’, ‘श्टेप्पेनवोल्फ’ अशी सुप्रसिद्ध पुस्तके त्यांनी लिहिली. एकंदरीत, इटली येथे त्यांच्या भटकंतीला विराम मिळाला असे लक्षात येते.
नोबल पारितोषिक विजेते, चित्रकार, कादंबरीकार, कवी व लेखक हेरमान हेसे यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारे जर्मन भाषेतील ‘वॉंडर्रंग’ हे पुस्तक थेट मराठीत अनुवादित होऊन ‘भटकंती’ या नावाने वॉल्डन पब्लिकेशनने प्रकाशित केलेले आहे. अंतर्मुख करायला लावणारे हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने आपल्या संग्रही ठेवलेच पाहिजे, वाचलेच पाहिजे, इतके अप्रतिम आहे!
