| पुस्तक | श्यामची आई |
| लेखक | पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) |
| पृष्ठसंख्या | २३४ |
| प्रकाशन | शुभम साहित्य |
| समीक्षण | आकाश जाधव |
| मूल्यांकन | ५ | ५ |
नितांत सुंदर, आईच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलं, आई-वडील-मुल यांच्यामधील प्रेम, बंधुप्रेम, देशप्रेम, भूतदया, त्याग, कष्ट आणि सद्गुण शिकवणारं आणि अनेकदा डोळ्यांत अश्रु आणणारं असं हे मंगलमय पुस्तक.
जागतिक स्तरावर मराठी साहित्याचं प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या काही मोजक्या पुस्तकांमध्ये, साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ पुस्तक नक्कीच अग्रणी असेल. या पुस्तकात ४२ गोष्टी आहेत. या गोष्टींमधून श्याम वर झालेले संस्कार समजतात. आजही ते तितकेच योग्य आहेत, काळ बदलला असला तरीही पुस्तकातील संस्कार आणि शिकवणी आजही तितक्याच अर्थपूर्ण आहेत. हे संस्कार आजचे पालक त्यांच्या मुलांना आजही देऊ शकतात असेच आहेत.
गुरुजींनी १९३३ साली, नाशिकच्या तुरुंगात असताना पुस्तकातील ३६ रात्री फक्त पाच दिवसात लिहिल्या तर उर्वरित बाहेर आल्यानंतर. 'आईचे प्रेम' हा पुस्तकाचा मुख्य केंद्रबिंदु. महाराष्ट्रातील घराघरांमध्ये ‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाचन करणे व करवून घेणे हा एक सांस्कृतिक भाग बनला आहे.
अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल, असे मला मुळीच वाटत नाही. - आचार्य अत्रे
अजूनही जगभरातील इतर साहित्यात या पुस्तकाहून सरस असे, मातृप्रेम या विषयावरील पुस्तक किमान माझ्या तरी वाचनात/ऐकिवात आलेलं नाही. कदाचित ते नसावेच, कारण असे लिखाण तेव्हाच होऊ शकते जेव्हा लेखक दिव्य शक्तीशी एकरूप झालेला असतो किंवा 'फ्लो स्टेट' च्या देखील पल्याड असतो. गुरुजींनी या गोष्टी शाईने लिहिल्या नसून आठवणीने ओथंबून वाहणाऱ्या अश्रूंनी लिहिल्या असाव्यात.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील पालगड गावी २४/१२/१८९९ रोजी झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण पालगडला झालं नंतर त्यांचं पुढील शिक्षण औंध संस्थानात झालं. पुस्तकातून तत्कालीन कोकणाचे वर्णन, समाजव्यवस्था, राजकीय स्थिती, बोलण्याची पद्धत, जीवनमान, दिनचर्या, खानपान अश्या अनेक गोष्टी देखील समजतात. गुरुजी मुळात भिडस्त स्वभावाचे. पुस्तकातून त्यांच्या स्वभावाचे इतर पैलूही उलगडत जातात. पुस्तकाची मांडणी सरळ सोपी आहे. पुस्तकातील नायक म्हणजेच श्याम म्हणजेच साने गुरुजी दररोज सायंकाळी आश्रमात, गावातल्या इतर मंडळींसह प्रार्थनेसाठी जमतात. प्रार्थनेनंतर श्याम, तिथे जमलेल्यांना त्यांच्या बालपणातील आईच्या आठवणी गोष्टीरुपी सांगतात. प्रत्येक गोष्टीतून त्यांच्यावर झालेले संस्कार, चांगले गुण इतरांपर्यंत पोहचवतात. सर्व गोष्टी खऱ्या आहेत क्वचित एखादं पात्र किंवा प्रसंग काल्पनिक असू शकतो असं प्रस्तावनेत लिहिलं आहे.
'श्यामची आई' या पुस्तकाची थोरवी तुम्ही शब्दात मांडणार तरी कशी? कोणती शब्द रचना त्याला न्याय देऊ शकेल? कोणत्या गोष्टींचं तुम्ही समीक्षण करणार? आईच्या मायेचं? हे पुस्तक या सर्वांपेक्षा उपर आहे, वेगळ आहे. सर्व गोष्टी मुख्यत्वे माय-लेकराच्या भोवती फिरतात, त्यात अनेक पात्रांची रेलचेल आहे. श्यामची आई, दैनंदिन जीवनातील प्रसंगांतून श्यामवर संस्कार करायचे प्रयत्न करत आहे. हे संस्कार क्लिष्ट नाहीत, साधे-सोपे एका वाक्यात कोणालाही समजतील असे आहेत. जसे कि - "श्याम, पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना नाही.", "श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप." असे कितीतरी सुंदर संस्कार प्रत्येक गोष्टीत लपलेले आहेत. त्यातील किती वेचावेत, किती मनावर कोरून ठेवावेत, लिहून ठेवावेत, पुढच्या पिढीला पोहचवावेत. काळाच्या ओघात या गोष्टी आणि संस्कार विरून गेल्या नाहीत उलट आज या संस्कारांची फक्त मराठी जनतेलाच नव्हे तर तमाम लोकसंख्येला गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण हे पुस्तक केवळ आई-मुल-संस्कार इतकंच मर्यादित नसून देशसेवा, लोकसेवा, बंधूभाव आणि प्राणिमात्रांवर प्रेम याबद्दलही सांगतं. फक्त काही गोष्टींमध्ये गरिबीचे उद्दात्तीकरण तर होत नाही ना असे मला वाटून गेले, कदाचित मी चुकीचा असेल.
श्याम, म्हणजेच साने गुरुजी खरोखरच भाग्यवान होते, ज्यांना इतके चांगले संस्कार देणारे आई-वडील लाभले. त्यांचे देखील कौतुक तितकेच कारण त्यांनी श्याम वर केलेले संस्कार साधे-सोपे पण उत्कृष्ट दर्जाचे होते. पुस्तक वाचताना तुम्ही देखील तुमच्या आई-वडिलांच्याबद्दल विचार करू लागता, त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव होऊ लागते, त्यांच्यासाठी तुमच्या मनात आणखी आदर निर्माण होतो.
श्यामच्या आईने श्यामला कधी प्रेमाने सांगून गोष्टी शिकवल्या तर कधी रागाने धोपटून. स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले, वेळप्रसंगी भीतीवर मात करण्यासाठी कडक पावले उचलली. शक्य त्या सर्व पद्धतीने एक सुजाण नागरिक श्यामच्या आईने घडविला. श्याम चे देखील त्याच्या आईवर खूप प्रेम होते कदाचित आईपेक्षाही जास्तच. श्याम आईला शक्य तशी मदत करत असे. आईच्या आजारपणात तिला काम पडू नये आणि आराम मिळावा म्हणूण बरीचशी कामे श्याम स्वतः करीत असे. शाळेसाठी दूर जावे लागणार आणि आई-वडिलांना भेटता येणार नाही म्हणून श्यामच्या मनाची जी घालमेल होते ती तुम्हाला पण अस्वस्थ करते. लाडघर प्रवासाचा प्रसंग म्हणजेच 'श्यामची आई' पुस्तकाचा शिरोमणी, त्यातील प्रत्येक शब्दातून आई-लेकाचे प्रेम प्रतीत होत राहते. नक्की दोघांपैकी कोणाचे प्रेम सरस असाही प्रश्न पडतो पण अर्थातच - आईचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ.
घनदाट या जंगलात धो धो स्वच्छ वाहे पाणी ।
माझ्या श्यामच्या जीवनी देव राहो ।
पुस्तक शेवटाकडे जाताना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या म्हणीचा प्रत्यय येऊ लागतो. शेवटच्या ५-६ गोष्टी वाचताना डोळ्यांतून फक्त आसवे बोलत राहतात, मन खिन्न होतं. जीवन नश्वर असलं तरीही श्यामच्या आईचं जाणं मनाला चटका लावतं आणि त्यात गुरुजींचे शब्द अजूनच मनाला....
सुखावले मन । प्रेमे पाझरती लोचन ।
माझ्यामते 'श्यामची आई' हे पुस्तक प्रत्येक मराठी घरांमध्ये वाचलंच गेलं पाहिजे. लहान मुलांना तर हे पुस्तक आवर्जून वाचायला द्या, वाचवून घ्या. पण त्याचबरोबर सर्व वयोगटातील वाचकांनी एकदा नक्की हे पुस्तक वाचावं. बालपणी शक्यतो पुस्तकातील भावनिक खोली लक्षात येत नाही. मराठी भाषेत इतकं सुंदर पुस्तक आहे हे संपूर्ण जगाला कळायला हवं.
