श्यामची आई पुस्तकातून शिकण्यासारखे ४२ संस्कार | 42 Lessons From Shyamchi Aai


"श्यामची आई" पुस्तकातून शिकण्यासारखे ४२ संस्कार  

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पुस्तकांपैकी एक "श्यामची आई" हे पुस्तक साने गुरुजींनी १९३३ साली लिहिले. या पुस्तकाची पारायणं आज देखील अनेक मराठी घरांमध्ये होतात. नितांत सुंदर, आईच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेलं, आई-वडील-मुल यांच्यामधील प्रेम, बंधुप्रेम, भूतदया, त्याग, कष्ट आणि सदगुण शिकवणारं आणि अनेकदा डोळ्यांत अश्रु आणणारं असं हे मंगलमय पुस्तक. या पुस्तकात ४२ गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी सांगू पाहते. या गोष्टींमधून श्याम वर झालेले संस्कार समजतात. आजही ते तितकेच योग्य आहेत, काळ बदलला असला तरीही संस्कार आणि शिकवणी आजही तितक्याच अर्थपूर्ण आहेत. हे संस्कार आजचे पालक त्यांच्या मुलांना आजही देऊ शकतात असेच आहेत. माझ्या भावनिक बुद्धिमत्तेला शक्य त्या क्षमतेने गोष्टींमधून संस्कार वेचण्याचा प्रयत्न केला आहे:



१. सावित्रीचे व्रत 

पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना नको.


२. अक्काचे लग्न 

जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. 


३. मुकी फुले 

दुसऱ्यांच्या घरची फुले न सांगता-सवरता आणू नये, विचारून आणावी.

मुक्या कळ्या तोडू नये, त्यांना फुलायची संधी द्यावी, उमलू द्यावे. 


४. पुण्यात्मा यशवंत 

सत्यसंगती लाभावयास जशी पुण्याई लागते त्याचप्रमाणे थोर आई-वडील, थोर भावंडे मिळावयास पुण्याई लागते. 


५. मथुरी 

सर्वांना एकसमान वागवणे. सहृदयता, एकमेकांप्रति काळजी, प्रेम असावे, दया असावी. 


६. थोर अश्रू 

श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो! देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून.


७. पत्रावळ 

गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. 


८. क्षमेविषयी प्रार्थना 

खोटे बोलू नये.
संस्कार हे कधी प्रेमाने थोपटून तर कधी रागाने धोपटून होतात. 


९. मोरी गाय 

प्राण्यांवर प्रेम करा. गाई ही भारतीयांची आराध्यदेवता, आधारदेवता. 


१०. पर्णकुटी 

मनाने श्रीमंत व्हा. बिकट परिस्थितीतही आशावादी, आनंदी रहा. 


११. भूतदया 

पशुपक्ष्यांवर प्रेम करा, परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल, तसे करू नका. भावंडाना विसरू नका, बहिणीला विसरू नका अंतर देऊ नका. 


१२. श्यामची पोहणे 

मुलांनी धीट व्हावे. मुले भित्री असता कामा नये. 


१३. स्वाभिमान रक्षण 

श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. स्वाभिमानी असावे, मिंधेपणा म्हणजे मरण. दुसऱ्याचे घेऊ नये, द्यावे. 


१४. श्रीखंडाच्या वड्या 

प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सदगुण सदैव चमकत राहतात. 


१५. रघुपती राघव राजाराम 

इतरांना त्रास देऊ नये. योग्य तेच करावे. तुम्हाला एकटे पडावे लागले तरी चालेल पण योग्य तेच करा. 


१६. तीर्थयात्रार्थ पलायन 

चोरी चहाडी करू पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. 


१७. स्वावलंबनाची शिकवण

स्वतःच्या पायावर उभे राहावे. ज्याला बुद्धी आह, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधीही होऊ नको. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. दुसऱ्यालाही आपल्याजवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. 


१८. अळणी भाजी 

दुसऱ्याचे मन दुखवू नये. पंक्तीत जेव्हा वाढायला आणतील तेव्हा आपणांस हि मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काहीही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये.


१९. पुनर्जन्म 

चांगले होण्याचा प्रयत्न करा. सत्कर्मी लागा.


२०. सात्विक प्रेमाची भूक 

आई-वडिलांचे मुलांवर अपार प्रेम असते त्यांच्या प्रेमास उपर आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो?


२१. दुर्वांची आजी 

चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. चुका करण्यात ऐट मिरवू नये.


२२. आनंदाची दिवाळी 

प्रेमपूर्वक त्यागातील आनंद - त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे. 



२३. अर्धनारी नटेश्वरी 

लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो तर स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व  विचार यांचे मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व  स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजेच विवाह होय. 


२४. सोमवती अवस 

जे नाही त्यासाठी रडत  बसू नये, त्यासाठी इतरांना लाजवू नये, मान खाली घालायला लावू नये. जे शक्य आहे त्यात समाधान मानावे. ध्येयवादी राहावे.


२५. देवाला सारी प्रिय 

जातीवाद पुरून टाका, कोणीही श्रेष्ठ, कनिष्ठ नाही. सर्व समान आहेत. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे.


२६. बंधूप्रेमाची शिकवण 

परस्पर प्रेम करा.


२७. उदार पितृहृदय 

आई-वडिलांचे अनंत ऋण कसे फेडणार? शेकडो बहीण-भावांना निरपेक्ष प्रेम देऊनच हे ऋण थोडे कमी होईल. 


२८. सांब सदाशिव पाऊस दे 

सामुदायिक कामात आपणास जे करता येईल ते आपण निरलसपणे केले पाहिजे, त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे, हत्तीने हत्तीप्रमाणे. 


२९. मोठा होण्यासाठी चोरी 

चोरी करू नये. सत्य, अहिंसा, दया, प्रेम, ब्रम्हचर्य. लहान शब्द. आपण पटकन उच्चरतो. परंतु त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्म लागतात. 


३०. तू वयाने मोठा नाहीस...

वयाने, पैशाने आणि शिकून मोठे व्हा पण त्याच बरोबर मनाने मोठे व्हा. 


३१. लाडघरचे तामस्तीर्थ 

आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ असते. 


३२. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक 

स्वाभिमान नेहमी महत्वाचा.


३३. गरिबांचे मनोरथ 

उज्ज्वल भविष्यासाठी मायेचा सोनेरी पिंजरा दूर करावा लागल्यास तसे करणे.


३४. वित्तहानीची हेटाळणी 

कर्जाची परतफेड करता न आल्यास समाजात नामुष्की होते. प्रियजनांना त्रास होतो. 


३५. आईचे चिंतामय जीवन 

मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा हे कठोर वास्तव.

 

३६. तेल आहे मीठ नाही 

परिस्थिती बदललत राहते.


३७. अब्रूचे धिंडवडे 

कर्जाची परतफेड न केल्यास जप्ती येऊन अब्रू जाते.


३८. आईचा शेवटचा आजार 

स्वतःची प्रकृती सांभाळणे, स्वतःचे आद्य कर्तव्य.


३९. सारी प्रेमाने नांदा 

एकमेकांस कधी अंतर देऊ नका. संसार मोठा कठीण, कर्तव्य नेहमीच श्रेष्ठ.


४०. शेवटची निरावानिरव

काळ कोणालाच चुकत नाही 


४१. भस्ममय मूर्ती 

आईची बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. 


४२. आईचे स्मृतिश्राद्ध 

स्वातंत्र्ययुद्धात श्याम मातृमोहाने सहभागी होणार नाही, म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल...  



 










टिप्पणी पोस्ट करा (0)