shabd-sur-japun-thev-marathi-book-review-cover

शब्द सूर जपून ठेव

पोस्ट शेयर करा:

लेखिका – नेहा लिमये 

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

प्रकार – संगीत

पृष्ठसंख्या – २२०

समीक्षक – मृणाल जोशी

मूल्यांकन – ४ । ५

माझी पुस्तक वाचण्याची एक वेगळी प्रोसेस आहे. मुळात पुस्तक हातात आलं आणि त्याचं तुम्ही वाचन करतात त्या क्षणी तुम्ही वाचतायेत असा सरसकट अर्थ मी काढत नाही, मुळात कोणते पुस्तक हातात येणार, ते कसे असेल काय असेल कोणत्या विषयाशी सुसंगत असेल ह्याचे मनोरे आपण बांधू लागतो आणि एक सुंदरसें पुस्तक हाती येतं. पुस्तक हातात आल्यावर आधी त्या पुस्तकाचा सुवास आपल्या रंध्रात सामावून घ्यावा. पुस्तक उघडून वाचायच्या आधी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ नीट निरखून बघतो मग प्रस्तावना असा तो एकूण प्रवास असतो. 

मुखपृष्ठा वर कोरीव पद्धतीने चितारलेलं शिर्षक आपल्याला तिथेच क्षणभर खिळवून ठेवतं. लेखिकेच्या मनात हा विचार आला का नाही माहीत नाही पण ‘सूर’ आपल्या संस्कृतीची संस्कारांची ‘ठेव’ आहे. सूर आणि ठेव ह्या शब्दांना इतक्या खुबीने एकमेकांत बांधलं आहे की त्याला खरोखरच जबाब नाही आणि उरलेले शब्द जपून ठेवले की आपल्या मनातले सूर कायम अबाधित राहतात (लक्षपूर्वक मुखपृष्ठ बघितल्यावर जाणवेल)

शब्द सूर…फारच वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे. छोट्या छोट्या लेखांमध्ये नटलेले पुस्तक आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा सूर आहे तर त्या सुरांच्या सुरावटीचे संस्कार झालेले गाणे हा पुस्तकाचा प्राण आहे.  मला लेखांची अनुक्रमणिका फारच आवडली, गंधार, धैवत, रिषभ, पंचम, निषाद, मध्यम, षड्जवर आधारलेली कोणती गाणी आणि त्या गाण्यांची एकरूप झालेले लिखाण.

संगीतविषयक अनेक पुस्तकं वाचली आहे त्यात हे पुस्तक आपले वेगळेपण कश्यावरून सिद्ध करतं तर ह्या गाण्यांना अलवार शब्दांमध्ये नाजूक भावनेने फार नजाकतीने लेखांमध्ये गुंफले आहे. आपला प्रवास त्या त्या लेखांमधून गाण्यांच्या भोवती फेर धरत असतो. हे पुस्तक एका दमात वाचायचं नाहीच मुळी. आपण ड्रेसिंग टेबल जवळ असतो तिथे अनेक सेंट्स  – परफ्युमच्या सुंदर काचेच्या बाटल्या ठेवलेल्या असतात आपला आजचा मूड कसा आहे त्यावर कोणत्या सुवसाशी आज आपली गट्टी जमणार हे जसे ठरवतो नेमकं तसेच हे पुस्तक वाचायचे…हवं ते पान उघडायचे हवं त्या रागदारीच्या पट्टीशी आपल्या तारा झंकारून घ्यायच्या. वर्ज्य सूर सोडून द्यायचे आणि उरलेल्या सुरावटीसोबत मिळून आपली ब्रह्मानंदी टाळी लावून घ्यायची. इतकंच!!

कोणत्याही गाण्यांबद्दल लिहायचं असेल ते ही लेख स्वरूपात तर ती खरोखर तारे वरची कसरत असते हे मी स्वानुभवाने सांगतो. शिरीष कणेकर सर नेहमी सांगायचे “गाण्यावर लिहायचे असेल तर पाण्यावर तरंग जितक्या हलके येतात आणि पाणी कोणते आणि तरंग कोणती हे तुम्ही सांगू नाही शकत तरी एक अदृश्य रेषा त्या दोघांना विभक्त करते तसे गाण्यांवर लेख लिहायचे असतात बरं का मृणाल’. ही अदृश्य रेषा नेहाच्या लेखांमध्ये शोधून सापडायची नाही. नेहानी मांडलेल्या लेखांमार्फतविविध विषय आपल्या भेटीला येतात. कधी कोणत्या अनामिक ठिकाणाची रम्य सकाळ, कधी आजीच्या गोष्टी, कधी पंढरपूरच्या विठोबाची मनाला लागणारी हुरहूर, कधी दूरदर्शनवर लहानपणी ऐकू येणारा देसराग तर कधी ऑफिस मधून घरी येऊन एक कोणतं असं गाणं कानापर्यंत येतं आणि क्षणार्धात ते मनाच्या तळाशी जाऊन नवीन स्पंदने निर्माण करून आपल्याला अनोळखी स्वप्नांच्या आणि आठवणींच्या प्रदेशांत घेऊन जातं हे आपल्याला देखील कळत नाही, एकाएकी तंद्री तुटते तेंव्हा कळतं आपल्या मनातला थकवा – शिणवटा केंव्हाच दूर गेला आणि ह्या नकळत सहलीत आपण कधी चंद्रभागेतीरी जाऊन आलो तर कधी गावातल्या अंगणातल्या तुळशी जवळ दिवेलागणच्या वेळी नकळत नमस्कार करून आलो. आपल्याला घटकाभर का होईना पण नेहाच्या लेखांमुळे एक हवाहवासा प्रवास घडला ह्याचा अत्यानंद होतो.

माझं ह्या पुस्तकाचं वाचन सुरू झालं ते मुगल ए आजमच्या लेखावरून, मुळात ह्या सिनेमातल्या गाण्यांवर अक्षरशः एक संदर्भ ग्रंथ लिहिता येईल पण ह्या लेखांत जे गाणं घेतलं मुळात ते माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक “जब रात हो ऐसी मतवाली फिर सुबह का आलम क्या होगा?” आणि त्याला तोडीस तोड लेख वाचून हे पुस्तक किती पद्धतशीर लिहिले आहे ह्याची साक्ष पटते. माणसांचा मूड कधीच एकसारखा राहत नसे. कधी आपण आनंदी असतो कधी दुःखी, कधी निर्विकार तर कधी काही सांगावेसे वाटत नाही तर कधी खूप कोणाशी बोलावे, आपल्या मनातले कोणालातरी सांगावे असेच वाटते. माणसांच्या ह्याच सुसंगतीतला मुख्य धागा धरून ह्या लेखांची आणि त्या वेळेशी आणि मुडशी सुसंगत असलेले सूर – राग आहे. जसं केंव्हा आपल्याला भैरवी हवी कधी ठुमरी कधी केहरवा, कधी झपताल, कधी बागेश्री तर कधी मालकौंस कधी पुरिया. कोणती रागदारी कधी केंव्हा आपला कोणता क्षण कॅश करून जाईल हे सांगता येणं कठीण.

हे पुस्तक वाचताना मला कायम माझ्या मोबाईल मध्ये प्ले लिस्ट सुरू आहे असाच भास होतो. माझं गाणं ऐकणे म्हणजे मी एका वेळी वेगवेगळी गाणी ऐकतो आत्ता ताजमहल सिनेमातील मोहम्मद रफी सुरू असेल तर थोड्यावेळात भाभी की चुडीया मधील बाबूजींचं ज्योती कलश येतं, बाबूजी आले तर सोबत आशा ताई येतात आणि धुंदी कळ्यांना गाऊन जातात, मधेच तलत येतो सोबत मागे कुठे तरी शमशाद बेगमच्या बाजूला बकुळ पंडित ह्याचं नाट्यसंगीत असतं, किशोरी ताईंचं सहेलारे असतं तर बंगालच्या खास ठेवणीतल्या आवाजात एस डी गाऊन जातात. लताबाईंच्या गळ्यातील गंधार कुठे तरी तारा झंकारतात आणि रसिक बलमा चा आलाप ऐकू येई तर अमर प्रेम मधील चिंगारी किशोर जातोय सोबत मुकेश मेरे टूटे हुये दिल सें गातोय. मराठी भावगीते, सुगम संगीत, नाट्यसंगीत, भजन, हिंदी सिनेमातील वेगवेगळ्या जॉनरची गाणी माझ्या समोर येतात त्याच प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवर्सची गाणी आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर माझ्याशी एकरूप झाली ती लेख स्वरूपात पुन्हा समोर आली मात्र ह्या वेळी येताना त्यांनी नवीन रूप ल्यायलं होतं, जुन्या गाण्यांशी नवीन ओळख करून घेताना मला देखील फार गंमत वाटली.

प्रत्येक लेखानंतर एक बार कोड दिला आहे त्यात स्कॅन केलं की आपण चटकन ते गाणं किंवा तो राग ऐकू शकतो, किती भारी सोय केली आहे. सगळं हातात दिल्यावर माझ्यासारखा “अजून आळशी” होईल ही भीती जरा दूर सारून ते कोड चटाचट स्कॅन करत सुटलो मी. लेखांमध्ये गाणी गुंफली आहे पण त्याहून भारी वाटलं ते म्हणजे “ही गाणी ही जरूर ऐका” हे शेवटलं सदर. इतकी भरमसाठ गाणी अहहहा!!! ती पण सिनेमा, गीतकार, संगीतकार, गायक / गायिका ह्यांच्या तपशीलवार माहिती सकट…

जुन्या अनेक आठवणींना उजाळा दिला, भोपाळच्या त्या तलावाच्या काठी ह्या गाण्यांमुळे आम्हा मित्रांच्या किती तरी मैफली आणि असंख्य आठवणी अजून जिवंत आहेत, मनाच्या तारा तुमच्या पुस्तकांमुळे झंकारल्या तेंव्हा आवडत्या मुगल ए आजमच्या ओळी तुम्हांस व शब्द सूर जपून ठेव ला नजर करतो…

नग़मो से बरसती है मस्ती 

छलके हैं खुशी के पैमाने

आज ऐसी बहारें आई हैं 

कल जिनके बनेंगे अफ़साने

अब इसे ज्यादा और हसीं ये प्यार का मौसम क्या होगा

जब रात है ऐसी मतवाली 

फिर सुबह का आलम क्या होगा

समीक्षक – मृणाल जोशी

shabd sur japun thev neha limaye rajhans mrunal joshi


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *