Kosla - कोसला

कोसला

पोस्ट शेयर करा:

लेखक – भालचंद्र नेमाडे

पृष्ठसंख्या – ३३४

प्रकाशन – पॉप्युलर प्रकाशन

मुल्यांकन – ४.९ | ५

प्रत्येकाला आपल्या दोन बाजू असतात… एक जी आपण सगळ्यांसमोर मांडतो आणि एक जी फक्त आपल्या पुरतीच असते. स्वतःच्या स्वतंत्र विचारांची आणि स्वतःशीच भांडत स्वतःच्या मनात कालवा कालव करणारी, जिथं आपण सतत वावरत असतो. दोन्ही ही खूप जरुरी बाबी आहेत, आणि हेच त्याच्या स्वभावाचं गमक असते. या पुस्तकात असच मुक्त जगलेल्या एका तरुणाचा (पांडुरंग सांगवीकरचा) विचारी संघर्ष आहे.

पुण्यास शिक्षणासाठी, एका इवल्याशा गावातून आलेल्या नायकाची ही द्विधा मनस्थिती आहे. आपल्याला या रहदारीच्या शहरात काहीही उमगत नाही, आपण अगदीच वेगळे आहोत, निराळं सार जग आहे अशाच स्वतःच्याच विचारांच्या तंद्रीत कोशात बंद केलेल्या एका सुंदर फुलपाखराची ही गोष्ट आहे. त्याच कोशात आयुष्य घालवून मनात जन्मनाऱ्या वेगवेगळया विचारांचा हा संघर्ष आहे. त्यातून घरातील वातावरण आणि व्यवहार यामुळे थोडासा बुजलेला नायक. मनाला घोर लावतो. समाजाचं प्रतिबिंब असलेल्या या पुस्तकाची नक्कीच अनेकांनी दखल घेतली आहे आणि आपण सर्वही नक्कीच घ्या.

भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लिहलेल्या या पुस्तकद्वारे समाजाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं. तसेच नायकाच्या मनावर या सर्व घडामोडींनी होणाऱ्या प्रचंड तणावाचा, एका वेगळ्या आवरणाचा आढावा घेतला आहे. लेखकाची शैली वेगळी आहे, भाषा प्रभुत्व प्रचंड आहे, यात अनेक परखड शब्द आहेत तसेच विषय हाताळणी तुम्हाला विचार करायला भाग पाडते. 

पुस्तकातील घटनाकाळ, त्यावेळीं समाजाने निर्माण केलेली व्यवस्था आणि घरातील गरीब परिस्थिती लेखकाने अगदी विशेष मांडली आहे. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे. नायकाच्या घरात आजारी मनीच्या वर्णनाने तर नक्कीच डोळ्यांच्या काचेतून निखळ पाण्याला वाव आहे हे दाखवून दिले आहे. तिच्या अंगावरच्या प्रत्येक फोडानिशी आपलीही लाही लाही होते. यात लेखकाने मनात तेवल्या पणतीचं अगदी मोठ्या धगधगत्या ज्योतीमध्ये रूपांतर केले आहे. मनीचं मरण आणि त्यानंतर अजिंठाच्या लेण्या, त्यातल्या बुद्धांचं ते दर्शन आणि तिथे केलेली दुःखाची उकल. सगळंच डोळे आणि बुद्धिकोश विस्फारणार आहे.

परगावी शिकणाऱ्या, कामासाठी बाहेर आलेल्या, गावातून दूर राहणाऱ्या, आपला “कंफर्ट झोन” सोडून वावरणाऱ्या आणि आकाश गवसू पाहणाऱ्या पाखारांसाठी, त्यांच्या एका सहपाखराची ही कहाणी नक्की वाचावी अशी लेखकाने लिहली आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल याची खात्री देतो. या कादंबरीने फक्त मराठीत एक भर पडली नाही तर एक वळण दिल आहे, आणि पाश्चात्य संस्कृतीत अडकलेल्या मराठी वांड्मयाला एक ग्रामीण आणि अस्सल मराठीचा गाभा शोधला आहे. अधिक लिहणे म्हणजे कादंबरीचा अपमान होईल, सगळ्यांनी नक्की वाचा आणि आम्हाला तुमचे विचार सांगा.

kosla bhalchandra nemade popular kadambari akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

11 Comments

  • #कोसला

    ५०-५५ वर्षानंतरही एखादी कादंबरी समाज मनावर गारुड करते, तरुणांपासून ते व्रुध्दापर्यंतच्या वयोमानावर ती सारखाचं प्रभाव पाडते, कोसला वाचुन काही जणांनी आत्महत्या देखील केली. कोसला विषयी असं बरचं काही ऐकून होतो. अशी काय जादू आहे या पुस्तकात?

    आई आणि आजीचे होणारे भांडण, मोठा वाडा, त्यात धुडगूस घालणारे उंदिर, वडिलांविषयीची चीड यातुन तयार होत गेलेला संवेदनशील आणि भावनाप्रधान पण वरुन घट्टपणा दाखवणारा पांडुरंग सांगवीकर हा पंचवीस वर्षीय तरुण या कथेचा नायक आहे.

    काही थोरं करावं म्हणून हा सांगवीकर उच्चशिक्षणासाठी पुण्यात येतो. राहण्याची सोय म्हणून कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असतो, याच ठिकाणी त्याला नविन मित्र, शिक्षक भेटतात. पुढे सांगवीकर स्वकर्तुत्वाने काॅलेजचा जनरल सेक्रेटरी बनतो. कॉलेजचा डोलारा सांभाळत असताना त्याला अनेक अडथळे येतात, आरोप होतात. या आरोपांना सामोरे जात असताना सांगवीकरांच्या जीवाची झालेली घालमेल लेखक भालचंद्र नेमाडे अशा कुशलतेने मांडतात की ते वाचुन वाचकाचा जीव भांड्यात पडल्या खेरीज राहत नाही.

    सर्वांमध्ये राहून अलिप्त होत जाणारा सांगवीकर परीक्षेच्या शेवटच्या पेपरमध्ये दोन प्रश्नांची उत्तरे लिहून शिक्षणाला रामराम ठोकून गावी निघून जातो. गावात आल्यानंतर सांगवीकरची होणारी फरफट वाचकाला खूप काही शिकवून जाते. शेवटी सांगवीकर “पुढे जे व्हायच ते होऊदे!! सगळेच निरर्थक आहे तर मग चिंता का करायची?” या तत्त्वज्ञानापाशी येऊन पोहोचतो. वरवर पाहता ही कथा खूप साधी आणि सोपी वाटेल पण ती तितकी साधी आणि सोपी नाही हे देखिल तितकेच सत्य आहे.

    कोसला ही एक केवळ कादंबरी नसून तुमच्या माझ्या आयुष्यातील जिवंत प्रवास, स्वातंत्र्य विश्वात नेणारा एक अविस्मरणीय अनुभव, सुटकेचा निश्वास, जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असं बरच काही आहे, जे पूर्णपणे ईथे मांडणे कठीण म्हणून प्रत्येकाने कोसला ही कादंबरी वाचायला हवीच.

    जाता जाता कोसलामधील मला आवडलेल्या चार ओळी, “घरकामात आईला मदत म्हणून लग्न करायचं, ऐकून मला शिसारी आली. म्हणून मी (पांडुरंग सांगवीकर) वडिलांना म्हणालो, ‘पोरं होऊ न शकणारी मुलगी, बायको म्हणून बघा.’… “

    • अतिशय अचूक, सुंदर आणि कुतूहल निर्माण करणार समीक्षण आहे…????????

  • #कोसला-

    “भटकते भुत कोठे हिंडते?
    पूर्वेकडे? की उत्तरेकडे.
    पश्चिमेकडे? की दक्षिणेकडे.
    देवांचे अन्न पृथ्वीच्या कोपऱ्याकोपऱ्यांत विखुरले आहे आणि तुला ते खाता येत नाही, कारण तू मेलेला आहेस ये, हे भटकत्या भुता, ये. म्हणजे तुझी सुटका होईल आणि तु मार्गस्थ होशील.” .
    “कोसला”.

    जेवढं ऐकलेलं तितकीच किंबहुना त्याहूनही अप्रतिम आहे कोसला. ऐन पंचवीशीतल्या खान्देशातील तरुणाने हातात प्रथमचं लेखणी धरावी आणि १७चं दिवसात कोसला लिहावी. नंतर तीच कादंबरी पुढे ५६ वर्ष म्हणजे आजतायगायत तिने क्रांती घडवत रहावी आणि ह्या कादंबरीमुळे लेखकाला पुढे जाऊन ज्ञानपीठ पुरस्कार मिळने हेच थोरच्या पलीकडे आहे. एक वाचक म्हणून आपल्या बुकशेल्फमध्ये भरमसाठ पुस्तके असतात.

    त्यांतील काहीच आपल्या अगदी हृदयाजवळची असतात. २-३ वेळा वाचली तरी ती सतत आपल्या डोळ्यांसमोर रहावीत अशी आपली अतीव इच्छा असते. त्यांपैकी एक म्हणजे “कोसला”. ”एका पराभूत नायकाची कथा-कोसला” आणि तो नायक म्हणजे पांडुरंग सदाशिव सांगवीकर. समाजाने ठरवून दिलेल्या साच्यात न बसणार आयुष्य आणि त्याच्या आक्रोशाची कहाणी म्हणजे कोसला. आयुष्याचा अर्थ न लागण्याचा आक्रोश. अशी कोसलाची व्याख्या केली तरी चालेल. म्हणूनच की काय पांडुरंग सांगवीकर आणि त्याचा आक्रोश थेट काळजाला भिडतो. कोसला मला जास्त जवळची वाटते त्याचे कारण म्हणजे कोसलाचे लेखक ‘भालचंद्र नेमाडे’ जे आमच्या खान्देशातले आहेत (जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील सांगवीचे) पण हा माझा फक्त भ्रम आहे.कोसला कादंबरीला कुठल्याही वयातील वाचकाने जवळ घेतलं तरी त्याला ती तितकीच जवळची वाटेल.

    (तेवढी विशेष आहेच ती) “कोसला” प्रकाशित झालेल्या तारखेपासून (१९६३) म्हणजे ५६ वर्षं म्हणजेच आज तिला अर्धशतक होत आले आणि आजही ती तितक्याच उत्साहाने, उत्कटतेने ह्या कादंबरीवर लिहिले, बोलले, चर्चिले जाते. यातच तिचे आगळे-वेगळेपण ठासून दिसते.
    विशीतील ज्या वाचकांनी ह्या कादंबरीची पहिली आवृत्ती वाचली होती ती पिढी आता सत्तरीत आली आहे, पण “कोसला” मात्र म्हातारी व्हायला तयार नाही. “हे म्हणजे भलतेच”, “उदाहरणार्थ”, “वैगरे” आदी वाक्यप्रयोगामुळे ही कादंबरी अजून शोभून दिसते.
    शेवटी,
    .
    मुनहसिर मरने पें जीसकी उम्मीद
    नाउम्मीदी उसकी देखा चाहीये.
    (मरणावर केंद्रित ज्याची उमेद असेल
    त्याची नाउमेद पाहण्यासारखी असते)

    • वा… मस्त लिखाण आहे तुझ पियुष !!

  • “कोसला” मुळात नेमाडेंची ओळख सुरु होते ती येथून. कोसला म्हणजे कोष ज्यात एक जीव धडपडून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. १९६३ साली नेमाडेंनी वयाच्या २५ व्या वर्षी हि कादंबरी लिहली आणि अल्पवधीत ती खूप प्रसिद्ध झाली. लेखनाची साचेबंद चौकट मोडून केलेलं लेखन अप्रतिम वाटत. हि कादंबरी नेमाडेंच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नावाचा नायक आपल्या शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवन आणि त्यानंतर गावाकडील काही वर्ष हे सर्व आपल्या कादंबरीत मांडलेले आहे.

    एक युवक ज्याला गावाकडील निरुत्साही वातावरण न आवडणारा त्याला त्याबद्दल वाटणारा तिटकारा, पण तरीही गावासाठी काहीतरी थोर करावं असं त्याच स्वप्न. पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधील. आणि त्यात बरीच केलेल्या उठाठेवी जसे कॉलेजच्या निवडणुकीत मित्राच्या सांगण्यावरून भाग घेणे, स्नेहसंमेलनात पुढाकार घेऊन पैसे अडकणे अश्या नाना प्रकारच्या गमती होतात आणि पुढे नीट अभ्यास करावा हा ध्यास.

    मणी नावाची त्याची धाकटी बहीण आणि ती देवीच्या साथीने मरण पावते ह्या क्षणाबद्दल लेखकाने इतक्या तिडकीने लिहाल आहे कि आपल्याला हि त्या भावना जाणून येतात. कादंबरीवरील मुखपृष्ठ हे ह्याच भागावर आहे, हा भाग तर इतक्या सुंदरतेने लिहला आहे की जणू आपल्या समोर ह्या सर्व गोष्टी होत आहेत. आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. रमी विषयच प्रेम आहे, बुंदी विषयी वाटणारी वेगळी भावना आहे हे नायकाने येथे ठळकपणे दर्शवल आहे.

    प्रत्येक विषयावर आपली रोकठोक मते कोसला कादंबरीत लेखकाने मांडले आहेत. आई आणि वडील याती सवांद असो किव्हा कॉलेज मधील मित्र असो.

    कॉलेज मधेच अर्थवट सोडून आल्या नंतर गावात बरीच शी थू होते ते सहन करत आणि गावातील काही मित्र आणि लोकांना पाहिल्यानंतर बदलेले विचार हे खर ह्या कोसलाच सार आहे. नक्की वाचून पहा अशी हि कादंबरी.

    • अतिशय नीट-नेटक आणि सुव्यवस्थित समीक्षण आहे. खूपच सुंदर समीर !!

  • ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. ‘..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले.’
    .

  • खुपच छान ही कादंबरी मला सोलापूर विद्यापीठात एम.ए इंग्रजीला होती.
    खुपच छान कादंबरी आहे

  • ‘चेवानं लिहिण्याच्या झपाट्यात आपल्याला मिळेल ते रिचवत समोर येईल त्याला वेढत बुडवत उचलत लोटत नदीसारखं पुढेच जात राहिलं की आपोआप त्या त्या मजकुराची अंगची शैली तयार होते…’

    कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत नेमाडे कोसला काय झपाट्यानं लिहला हे सांगताना वरील उद्गार काढतात. १९६३ साली वयाच्या २५व्या वर्षी नेमाडेंनी कोसलाला जन्माला घातलं. ही मराठीतील नुसती क्रांतीच नव्हती तर मराठीवर नेमाडेंनी केलेले अनंत उपकार होते. होय उपकारच होते… तो काळ लघुकथांचा होता. अनेक सुमार दर्जाच्या लघुकथा ह्याच काळात मराठीत धुमाकूळ घालत होत्या. आता हे नेमाडेंचं निरीक्षण.. आणि ते तितकं खरं ही आहे. भाषेतील तोच तो गुळगुळीतपणा नेमाडेंनी पहिल्या प्रथम खरखरीत करून टाकला. तो कोसलाच्या रूपाने… कोसलाचा शब्दनशब्द नेमाडेंची बंडखोरीचं दाखवून देतो. तसा महाराष्ट्रला बंडखोरीचा मोठा इतिहास लाभलेला आहे. चक्रधर स्वामी आणि माउलींनी सुरू केलेली ही गंगोत्री वाहत वाहत आणि विस्तारत नेमाडेंच्या पर्यंत येऊन ठेवते आणि पुढे जातही ही राहते. हे नेमाडेंच थोरपण… ते मी काय वर्णावं…

    ….

    मागच्या वर्षी कधीतरी तुळापुरात महाराजांच्या समाधी स्थळावर गेलो होतो. विकास, विशाल आणि मी. दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. तिथे एक पुस्तकांचा स्टॉल होता. अर्थात मी आणि विकास तिकडे वळलो. विशाल काहीतरी पाहत बसला. स्टॉल वर गेलो. अर्थात सगळी पुस्तक धूळ खात पडली होती. कोसलाने लक्ष वेधलं. ३०० च पुस्तक त्यानेच २७० ला देऊन टाकलं. बर वाटलं, घसाघीस केलेली मलाही आवडत नाही. घेतलं आणि घरी आलो. मग बराच दिवस कोसला माझ्याकडे पडून राहिला. मग एक दिवस ठरवून वाचायला घेतला आणि हळू हळू करत वाचून काढला. माझं सगळंच संथ असतं त्यामुळे कोसला ही संथपणे वाचला. अर्थात हा कोसलाचा मला नंतर अपमान वाटला. पण ठीक आहे म्हंटल.. तस पाहायला गेलं तर कोसला मी खूप उशिरा वाचला. इतका उशिरा कोसला वाचणं म्हणजे ते वाचकांनी (अर्थात माझ्यासारख्या) स्वतःच दारिद्र्य मानायला हवं. वाचणाऱ्या प्रत्येकाने कोसला नुसता नजरेखालून नाही तर मना खाली घालून काढायला हवा. तसा तो नुसता नजरेखाली घालून चालणार ही नाही. त्याला मनाच्या पटलावर उतरवावं लागतं, स्वतःत बंडखोरी निर्मावी लागते. हे असच का..? म्हणून स्वतःलाच रोखठोक प्रश्न विचारावे लागतात.. तेव्हा कोसला समजतो, आपल्यात उतरतो…

    …..

    ही कथा म्हणे भालचंद्र नेमाडे या प्रखर माणसाच आयुष्यच.. ते स्वतः पांडुरंग सांगवीकर ह्या नायकाच्या रुपात आपल्या समोर ठाण मांडून बसतात आणि स्वतःच्या आयुष्यातील अनेक बारीकसारीक प्रसंग आपल्याला सांगतात.. सांगतात कसले प्रश्न उपस्थित करतात. निरर्थक जीवनाविषयी आणि भंपक समाजव्यवस्थे विरोधातील हे प्रश्न आपल्याला ही विचार करायला भाग पडतात. आपली परंपरा आणि दिले जाणारे ज्ञान हे निरर्थक आणि अर्थशून्य आहे. हे पटवून देण्यात पांडुरंग यशस्वी होतो. आधुनिकतेच वारं वाहायला लागलं होतं तेव्हा पांडुरंगचा जन्म सांगवी या सातपुड्याच्या पायथ्याशी रूढ आर्थने मागास असलेल्या खेड्यात झाला. लहान पणा पासून वडलांचं आणि याच कधी पटलचं नाही. एकुलता एक आणि पाठी तीन बहिणी असल्याने वडील याला उगाच वंशाचा दिवा म्हणून पोसत होते. हे याला अजिबात पटत नसे. तो तस बोलून दाखवयाचा. वडलांच प्रेम स्वार्थी आणि एकुलता एक म्हणून… बाकी आई त्यातल्या त्यात बरी पण कधी कधी तिच्याही प्रेमाचा याला वीट यायचा. आजी वडलांसारखी.. थोडीशी खाष्ट..

    पुढे कॉलेज साठी पांडुरंग पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतो. त्याच व्यक्तिमत्त्व फुलतं बहरतं ते इथेच.. इचलकरंजीकर, सुरेश, मधू, देशमुख, काळ्या असे अनेक मित्र त्याला इथे प्रत्येक टप्प्यावर भेटत जातात. नव्या जुन्यांची ये जा सुरू असते. काहीं येतात- जातात-राहतात-परत-येतात… यातील अनेकांबरोबर तो शेवटी शेवटी भांडतो. त्यामुळे रूढ अर्थाने पांडुरंग सांगवीकर माणूसघाण्याच ठरतो. कारण झालेली भांडण तो स्वतःहून सोडवायला ही जात नाही आणि कोणी आलं तर, ,हे तू मला का सांगत आहेस…?’ अस म्हणून त्याला हाकलून ही देतो.
    कॉलेज मध्ये चमकण्यासाठी तो बरेच नको ते प्रयत्न करतो. कॉलेज ची निवडणूक लढतो वगैरे, हॉस्टेलच्या मेस चा हिशोब ठेवतो वगैरे, वादविवाद आयोजित करतो वगैरे, कॉलेजमध्ये गॅदरिंगच नियोजन करतो वगैरे, त्यात हिशोबात घोळ होतो वगैरे, मग त्याच्यावर पैसे लांबवल्याचा आरोप होतो वगैरे, खिशातून पैसे टाकून त्या प्रकारणातून बाहेर येतो वगैरे, मग अभ्यास वगैरे- होत काहीच नाही मग घरी येतो. लोकांचे टोमणे- एवढं शिकून पोरगं पुण्याहून परत गुर वळायला गावी आलं-मग काय- मग यांची परत पुण्याला रवानगी… परत अभास-डायरी लिहणं- काहीच घडत नाही परत गावी- गावातील लोक-सगळं सगळं व्यवस्थित- सत्य-वास्तव मांडत कादंबरी संपते.

    वर वर पाहता कादंबरी समजणारच नाही. त्यात काही विशेष वाटणारच नाही. पण त्या मागील विचार समजून घेतला की कादंबरीचा आवाका लक्षात येतो.

    …..

    नेमाडेंची भाषा शैली ही मुळात त्यांची ओळख. कुणाचीही भीडभाड न ठेवता, कुणाच्याही मोठेपणाची मिजास न ठेवता ते लिहितात. पांडुरंग सांगीवकर ज्या ताकदीने ते उभे करतात त्या मागचं गमक इथे समजून घेणं महत्त्वाच आहे. सडेतोड आणि रोखठोक भाषा. ऐन विसीतील तरण्याबांड पोरांचा खरा खरा परखड संवाद. पांडुरंगच्या मनातला प्रत्येक वाक्यागणिक जाणवणारा प्रचंड गोंधळ समाजाने घालून दिलेली समाजव्यवस्था किती कुचकामी आणि किती भंपक आहे हेच सांगून जातो.
    पांडुरंग सांगवीकर हा चंचल वाटतो. अनेक गोष्टी त्याच्या हातात असूनही तो परिस्थिती सांभाळू शकत नाही अस वाटत. पण पांडुरंग सांगवीकर हा काही आदर्श घ्यावा असा नायक नाही. त्यामुळे अशा अपेक्षा त्याच्या कडून ठेवण निव्वळ चूक. तो आयुष्यात रूढ अर्थाने अयशस्वी झालेल्या लाखो तरुणांचा प्रतिनिधी म्हणून कादंबरीचं नायकत्व स्वीकारतो. त्या प्रकारचं अपयश आपणही कधी तरी अनुभवलेलं असतं म्हणून पांडुरंग सांगवीकर आपल्यातीलच वाटतो. मुळात यशस्वी होणं म्हणजे काय…? हे समजून घेतलं की मग पांडुरंग सांगवीकर आणि त्याची तडफड कळते आणि त्याची बंडखोरी उमगते.
    जन्माला यावं.. मर मर शिकावं.. कुठे तरी नोकरीला लागून आई बापच पांग फेडावं.. लग्न करून जोडीदाराला सुख देण्यासाठी धडपड करावी… पोरं काढावी…त्यांना पोसावं… म्हातारं व्हावं आणि असंच कधीतरी मरावं हे असलं जीवन यशस्वी असलं तरी सुद्धा पांडुरंग सांगवीकरला नकोय.
    बऱ्याचदा आपण ही तेच करत असतो जे आपल्याला करायचं नसतं. आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण कधीच नसतो. समाजाने आणि घरादाराने घालून दिलेल्या फुटकळ आदर्शवादावर आपली जगण्याची धडपड सुरू असते. पांडुरंग सांगवीकर इथेच बंडखोर होतो आणि ससेहोलपट सहन करून लढत राहतो…

    …..

    पांडुरंग सांगवीकर कसाही असला तरी त्याचे स्त्रियांविषयी असलेले विचार मात्र उच्च वाटतात. प्रेमाविषयी तो हळवा वाटतो. रमी वर असलेलं प्रेम जाणवतं आणि रमीचंही प्रेम जाणवतं पण नेमाडे त्या प्रकारात फारच कमी खेळतात. पण जितके खेळतात तितक्या वरून बरच काही समजतं. रमी आणि पांडुरंग सांगवीकर यांची शेवटची भेट वाचनीय झालेली आहे.
    शेवटच्या भेटीत रमीकडे पाहता पाहता पांडुरंग सांगवीकर मनात विचार करतो, “समजा, रमीनं आता विचारलं– आपण घर करू. तर ? तर मी निरुत्तर. आपल्या हाताशी काहीच लागत नाही. चांगलं तर नाहीच नाही.”
    यातून रमी बद्दल असलेला आदर जाणवतो.

    पांडुरंग सांगवीकरची सर्वांत लहान बहीण मनी. ती देवीच्या रोगाने मरण पावते. हे पांडुरंगला पुण्याला आई पत्र पाठवून नंतर सांगते. त्याला प्रचंड धक्का बसतो. त्यावेळचा प्रसंग नेमाडेंनी इतक्या ताकदीने लिहला आहे की त्याला तोड नाही. नेमाड्यांचे शद्ब काळजाला लागून जातात, घरं पडतात आणि आपल्या ही डोळ्यात चटकन पाणी उभं राहतं. प्रचंड रागाने लालेलाल झालेल्या पांडुरंग सांगवीकरची आपल्याला दयाच येते.
    पुस्तकाच मुखपृष्ठ याच प्रसंगावर आधारलेलं आहे.

    हे सगळे प्रसंग निव्वळ वाचनीय झालेले आहे.

    ….

    अशा कादंबरींना शेवट नसतो. कोसला सुद्धा संपत नाही. जो पर्यंत वाचक म्हणून आपल्यातला पांडुरंग सांगवीकर जिवंत आहे तोपर्यंत कोसला संपत नाही, संपू शकत नाही. बरा वाईट असा कुठलाही शेवट कादंबरीला नाही. कोषातून बाहेर पडण्याची धडपड जो पर्यंत संपत नाही तो पर्यंत पांडुरंग सांगवीकर आपल्यला प्रत्येक टप्प्यावर भेटत राहणार. कधी दुसऱ्यात तरी कधी आपल्यात. त्याच क्षणी चवताळून उठता यायला हवं. स्वतःच्या भोवती असलेला कोसला तोडून बाहेर येता यायला हवं. कोसलातून काय शिकावं…? तर एवढंच…!

    ‘आपापली वर्ष पुढे अचूक शिल्लक असतातच.’ शेवटी लिहून भालचंद्र नेमाडे कोसलाला पूर्णविराम देतात. पुढे वाचकांच्या हाती सोपवून ते मोकळे होतात.

    प्रस्तावनेत नेमाडे कोसलाला उद्देशून एक अपुरी कविता लिहितात. तिचा शेवट असा आहे,

    “कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्या बरोबरच सती जातात,
    तु मात्र मला पुरून उर..”

    मला विश्वास आहे, कोसला फक्त नेमाडेंनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला आणि मराठी साहित्य विश्वाला पुरून उरेल…

    ——
    शुभम संदीप सोनवणे
    पुणे (दि. २०/०४/२०२१)
    #सत्यशामबंधू

Leave a Reply

Your email address will not be published.