लेखक – रणजीत देसाई
पृष्ठसंख्या – २७२
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन – ४.७ | ५
राधेय म्हणजेच कर्ण आणि मराठी माणसांच्या मनात त्याचे स्थान अगदी जवळचे आहे. राधेय बद्दल लिहताना आणि बोलताना रणजीत देसाईंनी म्हटलं आहे की ‘राधेय’ मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही, प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरून त्यांनी या पुस्तकात कर्णाचे काय रूप दाखवले असेल याची आपण कल्पना करू शकता. त्याच वेगळेपण विलक्षण सामर्थ्याने आणि कमालीच्या हुशारीने सिद्ध केलेले या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल.
देसाई म्हटलं की नात्यांची अलगद वीण आणि त्यांची तशीच हळुवार, कोमल, नाजूक उकल पाहायला मिळते. कर्णाचे राधा मातेशी, कुंतीशी, वृषालिशी असलेले नाते एक मनात आदरभाव निर्माण करून जाते. तसेच कृष्ण आणि दुर्योधन यांच्याशी त्यांची असणारी मैत्री मनात एक हक्काचं घर करून जाते. दुर्योधन खरच इतका वाईट होता का?? या प्रश्नाचं अगदी सुरेख उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळेल. तसेच अनेक नाते, अनेक लोक, अनेक घटना आपल्याला घडताना दिसतात त्यातली गंमत, त्यातले अनेक नवनवे भाव पाहायला मिळतात आणि पुस्तक वाचत असताना मांडलेले तत्वज्ञान या पुस्तकाचा केंद्रबिंदू बनला जातो. कृष्ण कर्णाची भेट जेंव्हा घेतो, त्यावेळी दुर्योधन कर्णाला विचारतो की कृष्ण का भेटला तुला ?? त्यावरच्या सहज या उत्तराला दुर्योधनाने दिलेलं स्पष्टीकरण मी पुस्तक वाचून १०-१२ वर्ष होऊन गेले आहेत. पण तरीही जसे च्या तसे डोक्यात आणि मनावर बिंबले आहे. ही त्या लेखकाची आणि लेखणीची ताकत आहे. दुर्योधन म्हणतो, “जगात कोणतीही गोष्ट सहज घडत नसते, त्यामागचे प्रयोजन, त्यामागील संदर्भ आपल्याला माहित नसतो म्हणून ती आपल्याला सहज वाटते.” आणि जरासंध कसा कृष्णाचा शत्रू आहे आणि तुझा मित्र आणि तू त्याला परास्त केले आहेस आणि कृष्णाला त्याने १७ वेळा युद्धातून पळायला भाग पाडलं आहे. हा असा संदर्भ आणि बारीक बारीक गोष्टींचे सखोल संशोधन आणि अभ्यास पुस्तकाला अजूनच समृद्ध बनवते.
मराठी साहित्यातील अनेक नावाजलेल्या कलाकृतींपैकी ही एक आहे यात शंकाच नाही. आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. अनेकांच्या मनातील एकटेपणाचा हा एक उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोन असलेल्या साहित्याचा नमूना म्हणायला नक्कीच हवा. कर्णाचे एकटेपण त्याची त्यातील गंभीरता त्याला गवसलेले अनेक पैलू या साऱ्यांनी कादंबरी अगदी ओतप्रोत भरलेली आहे. मनातली इच्छा आणि प्रश्न, आयुष्याने त्यावर अनवधानाने दिलेले सौंदर्य, यश, एकाकीपण आणि काहीसे भ्याडपण देखील या साऱ्याच मिश्रण आहे इथे. खात्री आहे नक्की आवडेल असच हे पुस्तक आहे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडीओ