लेखक – वि. स. खांडेकर
पृष्ठसंख्या – ४२०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्यांकन – ४.४ | ५
मराठी माणसाच्या मनात घर करून असलेली व जनमानसांकडून चर्चा ऐकलेली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी! कुरु वंशातील राजा ययाती आणि त्याच्या जीवनचरिताचा आधार घेऊन मानवी जीवनातील अनेक पैलू, वलये व संक्रमणे यांना ही कादंबरी अलगद स्पर्श करते. पिढ्यानपिढ्या वाचणाऱ्या वाचकाला ती नेहमीच समकालीन वाटते याचे गूढ वि.स.खांडेकरांनी रेखाटलेल्या पात्रांच्या धाटणीत लपलेलं आहे. इंद्रावर विजय मिळवणारा राजा नहूष स्वर्गाचा राजा झाल्यावर उन्मादाने इतका हुरळून जातो की ऋषींनाच तो आपल्या पालखीचे भोई बनवतो. “नहुषाची मुलं कधी सुखी होऊ शकत नाही” हा त्यातल्याच एका ऋषीकडून मिळालेल्या शापाने यती आणि ययाती यांच्या वाट्याला येत ते केवळ अन केवळ अतृप्त आयुष्य! असा हा राजा नहूष आपल्यातही असतो आयुष्याच्या अनेक प्रसंगात तो आपण जनमानसात पाहतही असतो. वासनांध ययाती, गर्विष्ठ देवयानी, कोपिष्ट आचार्य शुक्राचार्य, आयुष्याचं तत्वज्ञान कळलेला कच, पितृआज्ञेपोटी दासीत्व स्वीकारणारी शर्मिष्ठा व दोष नसतानाही हलाखीतलं मरण लाभलेली सोनेरी केसांची अलका आजही अवतीभवती आपल्याला सहज पाहायला मिळतात.
माणसाच्या ठायी असणाऱ्या दुर्गुणांना तो जोपर्यंत जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करतात आणि हे सांगताना खांडेकर म्हणतात कि, “वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत जाते!” आचरणात आणाव्यात अशा कित्येक गोष्टी ययाती आपणास सहज देऊन जाते फक्त वाचणाऱ्याकडे तो घेण्याचा दृष्टिकोन हवा. सामान्य वाचकाला ती फक्त वासनेने भरलेली अश्लील कहाणी वाटू शकते आणि तीथेच खरेतर आपली वाचक म्हणून लेखक कसोटी पाहतो! यात तुम्ही जिंकलात तर आयुष्यातही जिंकाल यात शंका नाही.
आपल्या बापाच्या कृत्यामुळे आपण कधीच तृप्त होऊ शकत नाही या भयाने ऐन उमेदीत राज्य, ऐशोआराम, विलासी आयुष्य या वासनेने भरलेल्या गोष्टींपासून यती दूर जंगलात निघून जातो पण त्या ब्रह्मचर्यातही त्याला तृप्ती लाभत नाही. संकटांपासून पलायन करून ती कधी संपत नाही याच हे उत्तम उदाहरण लेखक आपल्याला देतो. त्याग केला म्हणजे सुख मिळेलच असं नाही, जोपर्यंत लालसा मरत नाही तोवर तृप्ती लाभत नाही हे जीवनसुत्र ययाती आपणास देऊन जाते.
ययाती सारखा राजा नवरा मिळून देखील देवयानीला तो कधीच मिळाला नाही. आपण शुक्राचार्यांची कन्या आहोत आणि हा ययाती मला सोमरस प्राशन करून स्पर्श करतो हे तिच्या गर्विष्ठ मनाला पटत नाही. पदोपदी ती त्याला आपण कसे श्रेष्ठ आहोत याची जाणीव देत असते. शरीरसुखासारख्या नाजूक क्षणी देखील नवऱ्यापुढे तिच्यातला अहंकार विजयी ठरतो. या न अशा कित्येक कारणांमुळे ययाती तिच्यापासून दूर होऊन व्यसनात अडकत जातो, यात दोष केवळ देवयानीचा नाही पण तिचा अहंकार त्याला कारणीभूत ठरतो हेही नाकारता येत नाही. राजकन्या असूनही दासीत्व स्वीकारणाऱ्या शर्मीष्ठेचा समोर येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता तोंड देण्याच्या गुणाला लेखक पुरेपूर न्याय देतो हे कथेच्या शेवटी ध्यानी येतं.
हरएक पात्र साकारताना मानवी जीवनाला भुरळ पाडणाऱ्या कित्येक प्रसंगांना आपण कसं सामोरं जावं याच जिवंत विश्लेषण म्हणजे ययाती!
ययाती वाचताना आपण रमून जातो ते याच कारणांमुळे. आपल्याच जीवनातल्या काही मोहाच्या, अतृप्तीच्या वासनांध क्षणांना आपण स्वतः ययाती बनून भेट देतो ते केवळ अन केवळ खांडेकरांनी त्यात ओतलेल्या भाषेच्या विविध रसांमुळे, अलंकारांमुळे. अशी विविध रूपांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे मराठी वाचकाला मिळालेली पर्वणीच. तिचा आपण यथेच्छ लाभ घ्यायलाच हवा कारण ययाती सारख्या रचना ह्या रोज रोज घडत नसतात आणि त्यातून लाभणारा ठेवा हा इतरत्र सापडत नसतो!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
हिंदी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या
वि.स.खांडेकर लिखित ययाती ही कादंबरी पौराणिक संदर्भ आणि कथेच्या आधारावर लेखकाने मानवी आयुष्यची शाश्वत मुल्ये आणि भौतिक सुखाचा क्षण भंगुरपणा, ययातीच्या जीवन प्रवासातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. या कथेमध्ये असलेलेया पात्रांच्या आधारे कादंबरी ही विभागली गेली असून, प्रत्येक विभाग त्या त्या पात्रांची असणारी भूमिका मांडतो.या कादंबरीमध्ये ययातीची कामुकता, देवयानीची संसार दक्षता, कचाची भक्ती निष्ठा आणि शर्मिष्ठच्या प्रेमाची उत्कटता मांडली आहे.
लेखकाने सर्वच पात्रांचे केलेले शब्द चित्रण हे वाचणार्याला कथेशी जोडून घेते, लेखकाने ही कथा लिहितानाच ‘ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,’ असा आशावाद वाचकांकडून अभिप्रेत केला आहे.
या पुस्तकामध्ये मांडलेली philosophy ही अगदी नवख्या वाचकालाही बुद्धीला फार ताण न देता समजू शकते.कथेतला साधेपणा, त्याची सुटसुटीत मांडणी आणि भिडणारे शब्द या मुळेहे पुस्तक अनेकांच्या संग्रही असल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. या कादंबरीसाठी वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेले आहे. या कादंबरीमधील मला आवडलेला एक उतारा खालीलप्रमाणे,
मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिय हे घोडे, उपभोगाचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिय आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्यांचा भोक्ता आहे.
रथच नसला तर धनुर्धर बसणार कुठे? तो त्वरेने रणांगणावर जाणार कसा? शत्रूशी लढणार कसा? म्हणून व्याक्यीने शरीर रुपी रथाची किंमत कधीच कमी लेखता कामा नये.
अशी ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी आपण सर्वांनी एकदा तरी जरूर वाचावी आणि आपली प्रतिक्रिया कळवावी.
मागील आठवड्यात मी ही कादंबरी वाचली. लेखक वि. स. खांडेकर यांनी अतिशय सुरेख पद्धतीने प्रत्येक प्रसंगाचे वर्णन केले आहे. शरीराची पूजा आणि इंद्रिय सुख हीच सर्व श्रेष्ठ सुखे समजणाऱ्या कामुक मनुष्याला ययाती राजाचे उदाहरण खरंच लक्षात घेण्यासारखे आहे. धन्यवाद
खूपच छान आहे मी बऱ्याच वेळा वाचली आहे सर्वांनी वाचावी !
मी ही कादंबरी वाचली तेंव्हा मला वाटले की बुध्दी,भावना, आणि शरीर यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन.
तसेच प्रत्येक मनुष्याचा आत्मा शरीराच्या पिंजऱ्यात कोंडून पडलेला असतो आणि माणसाचे अंतर्मन हे त्याचे वैरी असते.
वासना आणि प्रीती ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत.
परंतु उपभोग घेऊन वासना कधीही तृप्त होत नाही . अहुतीनी अग्नी जसा अधिकच भडकतो ,तशी उपभोग याने वासनेची भूक अधिक वाढते हे त्रिवार सत्य.
मला वी. स. खांडेकर यांची ही कादंबरी वाचताना शरीर आणि आत्मा यांचे नाते समजले.