लेखक – पै.गणेश मानुगडे
समीक्षण – अभिषेक गोडबोले
पृष्ठसंख्या – १५८
मूल्यांकन – ४.५ | ५
महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची वीरपरंपरा, संतांची समाजसुधारकांची परंपरा, कुस्तीसारख्या जगविख्यात झालेल्या खेळाची परंपरा, विद्वान आणि तेवढेच तळागाळात रुजलेल्या साहित्यिकांची परंपरा म्हणजे आपला महाराष्ट्र!
एक चांगला पहिलवान इतिहासाच्या, शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकांच्या प्रेमातून ‘बाजींद’ सारखी आपली पहिली कादंबरी लिहून लेखन क्षेत्रात पदार्पण करतो हे फक्त याच मातीत घडू शकतं!
‘बाजींद’ हि छत्रपतींच्या काळात घडलेली आणि म्हणून ऐतिहासिक असलेली रहस्यकथा आहे. अत्यंत सोपं आणि म्हणून सतत उत्कंठा वाढवत ठेवणारं लिखाण या रहस्यकथेला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवते.आपले लेखक स्वतः कुस्तीपटू आणि महाराजांच्या इतिहासावर प्रेम करणारे आहेत त्यामुळं ते प्रेम कथा वाचताना सतत जाणवत राहतं.
छत्रपतींच्या स्वराज्यात घडणाऱ्या या कथेमधून स्वराज्याचा कारभार कशाप्रकारे चालत होता हे बघायला मिळतं. आत्तापर्यंत शिवकालावर अनेकविध कथा, कादंबऱ्या,नाटकं लिहिली गेली आहेत पण बाजींद मधील कथा केवळ राज्यकारभार आणि राजकीय डावपेच यापुरती मर्यादित न राहता त्या काळातील सर्वसामान्य माणसाच्या जगात आपल्याला लेखक घेऊन जातात आणि मग सुरु होते एकामागून एक घडणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांची अखंडित मालिका!
सखाराम त्याचे तीन सहकारी, बहिर्जी नाईक, खंडोजी आणि सावित्री अश्या अनेक बहुआयामी पात्रांची हि कथा. बहिर्जींचं युद्धचातुर्य, पराक्रम आणि मराठेशाहीच्या मावळ्यांची स्वामीनिष्ठा यांचं लेखक अगदी सोप्या शब्दांमध्ये दर्शन घडवतात!
कथेतील जवळजवळ सगळेच प्रसंग डोळ्यासमोर चित्र निर्माण करतात आणि आपल्याला काही काळासाठी का होईना त्या काळात घेऊन जातात.
ऐतिहासिक कादंबरी लिखाणामध्ये केलेला हा अभिनव प्रयोग आपल्या महाराजांवर आणि अवघ्या मराठेशाहीवर प्रेम करणाऱ्या आपण सगळ्यांनी एकदातरी अनुभवावा असाच आहे.
समीक्षण – अभिषेक गोडबोले
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
Nice one