लेखक – व्यंकटेश माडगूळकर
पृष्ठसंख्या – १४०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन – ४.२ | ५
का कोण जाणे, एखादा लेखक आपल्या मनाला भिडला की आपण त्यांचीच अजून पुस्तके शोधू लागतो. काही समानता प्रस्थापित करण्याचा उगाचच प्रयत्न करू लागतो. माझंही तसच झालं. व्यंकटेश माडगूळकर लिखित “बनगरवाडी” हातात आली… अक्षरशः भाषेच्या, निसर्ग वर्णनाच्या आणि त्यांच्या सक्षम आणि अगदी तीक्ष्ण नजरेने हरलेल्या बारकाव्यांच्या प्रेमातच पडलो. आपसूकच उत्साहाने “कोवळे दिवस” हातात घेतली, आणि आजुन एक विलक्षण प्रवास सुरू झाला.
पहिली काही पाने भ्रमात पडणारी होती, नक्की पुस्तकाचं स्वरूप काय आहे समजेना, कशावर आहे समजेना, पुस्तकाचा मजकूर नावाशी संबंधित असलेल्या गोष्टींशी मेळ खाईना. पण नंतर मात्र कथा पुढे झपाट्याने सरसावली. रात्रीची अंधुक वाट हळू हळू उजेडाने पाउलापुरती दिसावी, तशी एक एक पात्र कथा मजबूत करत होती. आणि लेखकाचा खास हातखंडा असलेली गोष्ट जाणवू लागते. राजा नावाच्या एका स्वातंत्र्य पूर्व चळवळीत सक्रिय असणाऱ्या एका तरुणाच्या अनुषंगाने विविध घटना मांडल्या जातात. त्या वेळेची राजकीय, नायकाच्या घरातील परिस्थिती यावर एका तरुण मुलाची मते आपल्याला पुस्तकातून पाहायला मिळतात.
माडगूळकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो, स्वच्छ सुंदर निसर्ग आणि त्यात आपण बुडून जातो. या पुस्तकातही अनेक प्रकारे निसर्गाशी मैत्री असणारा कथेचा नायक तो आजुंच खुलवून दाखवतो. प्राणी, पक्षी यांची बारीक निरीक्षण वाचून हैराण व्हायला होतं. कथेतील नायकाला असणारी चित्रकलेची गोडी.. त्याने त्यासाठी निवडलेले विषय आणि त्यावर रेखाटलेली चित्र आपल्या लेखणीतून वाचकांच्या अंगी भिनत जातात.
कोवळे दिवस एका तरुणाची कथा आहे. त्यात त्याच्या मनात भेडसावणारे सारे प्रश्न आहेत, स्वतःशी प्रामाणिक संवाद आहे, स्वतःकडून अपेक्षा आहेत, आणि देशाप्रती समाजाप्रती बांधिलकी देखील. मधेच माणसांच्या घोळक्यात एकटा पडलेला एक नायकही आहे. आणि अगदीच जाणून बुजून भाष्य न केलेले मनातील प्रेम देखील आहे. पुस्तक वाचून आपणही निसर्गाकडे नवीन प्रकारे बघतोच पण तरुण्याकडेही बघतो. एक उत्तम वाचण्याजोगे आणि वाखाणण्याजोगे पुस्तकं. नक्की वाचा!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: