लेखक – सुहास शिरवळकर
प्रकाशन – दिलीपराज प्रकाशन
पृष्ठसंख्या – १७२
मुल्यांकन – ४.६ | ५
प्रेम आणि प्रेमकथा म्हणजे एक अजब रसायन असतं. आपण कितीही तिटकारा करणारे असलो तरी त्यात गुरफटत मात्र नक्की जातो. किशोरवयीन प्रेम.. बालसुलभ इच्छा.. प्रथमदर्शनी एखाद्याला पाहून होणारी जीवाची घालमेल, या सगळ्याच गोष्टी प्रत्येकाच्या मनातल्या असतात. कोणी त्या अनुभवल्या असतात, तर कोणाला त्या अनुभवायच्या होत्या म्हणून मनाला घट्ट चिकटून असतात. अशीच ही प्रेम कथा, दोन किशोवयीन प्रेमी युगुलाची. अचानक नको म्हणता सामोरी आल्याने प्रेम होते आणि त्यातून घडणारी सुंदर कथा आणि त्याहून कैक पटीने अधिक सुंदर कथेची मांडणी.
सुहास शिरवळकर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक सुंदर पुस्तकं येतात.. दुनियादारी, समांतर.. आणि असे कित्येक.. प्रत्येक पुस्तकाची एक खास बाजू.. आणि त्यातही एक वेगळेपणा.. प्रेमकथा आणि त्याला जोडूनच सतत हेलकावे खाणारी गोष्ट, बदलते संदर्भ, मनाला खिळवून ठेवणारे संवाद, उत्सुकता शिगेला पोहचवत बुध्दीला विचारात घेऊन जाणारी कथेची मांडणी, म्हणजे सुहास शिरवळकर यांची जमेची बाजू. यांचं कोणतंही पुस्तकं घेतलं तरी मला का कोणास ठाऊक अजून कधीच खाली ठेऊ वाटलं नाही. नेहमी पुढेच वाचत राहावं वाटतं.
चंद्रवदन, गंधाली, किशोर, आणू मावशी, नाना, दादासाहेब आणि काही जोड पात्र. इतकी मोजकी पात्र, पुणे आणि नाशिक हेच दोन ठिकाणं आणि यातच रंगलेली ही कथा आपल्याला खिळवून ठेवते. लहान वयात झालेलं प्रेम त्या वेळेची उत्सुकता आणि सर्व लहान सहान अनुभव या पुस्तकातून अगदीं डोळ्यांसमोर उभे राहतात. काही लेखक फक्त पुस्तकातून फिरवून आणत नाहीत.. तर ते.. आयुष्याचे सारे रंग, सुगंध, पाऊस, वारा चांदण्या.. प्रत्यक्ष कशा अनुभवायच्या असतात ते शिकवतात. आणि सु.शी. माझे यामुळेच खूपच आवडीचे एक लेखक आहेत.
ज्यांना कोणाला प्रेमकथा आवडतं असतील, सुंदर कथेची बांधणी आणि उत्कंठा वाढवणारी पुस्तकं आवडतं असतील तर त्यांनी हे पुस्तकं जरूर वाचावं. मला वाटतं हे पुस्तक तुम्हाला कमीत कमी एक दिवसात एका आयुष्याचा आनंद देणारं आहे. म्हणून मला वाटतं सर्वांनी हे पुस्तकं नक्की वाचायला हवं. ज्यांना प्रेमकथा आवडतं नाहीत, त्यांनीही हे वाचून पहा, आणि तुम्हालाही आवडेल आणि तुमचही हे पुस्तक नक्कीच लाडकं होईल यात शंका नाहीच. हे पुस्तक मला आवडलं आहेच, तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
khup sunder kaadambari ah, apratim pustak ah
Ho kharach!!!