लेखक – वि.स. खांडेकर
समीक्षण – तन्मय मांडरेकर
पृष्ठ संख्या – १९२
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
मूल्यांकन – ४.१ | ५
निरस अवकाशात केवळ निपचीत पडून राहणाऱ्या तारकांना लुकलुकने निरर्थक वाटते.. केवळ अरुणोदयाच्या रंगात रंगून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा आपले जीवन इतरांसाठी सुपूर्द करणाऱ्या त्या पृथ्वी कडे घेतलेली एक झेप.. काही तारका अवकाशातच जळून खाक होतात..तर काहींची झेप सार्थकी लागते. दगड म्हणून का होईना पण पृथ्वी च्या कुशीवर खेळतात.. एक उल्का गर्विष्ठ अवकाशाचा माज उतरवते.
खरेतर आदर्श, तत्वे ही माणसाच्या विकासासाठी, उन्नतीसाठीच असतात. एक सफलतेचे आयुष्य जगण्यासाठी ही तत्वे कारणीभूत ठरतात. या तत्वांच्या, मूल्यांच्या नावेवर स्वार होऊन आपण जीवनाचा सागर पार करू असे पुस्तकी ज्ञान सांगते. पण जीवन हे पुस्तक नव्हेच. तिथे पैशाची नशा सर्वांचा असते.. तिथे या मूल्यांची पायमल्ली होते.. अन् मग संघर्ष चालू होतो. पैशांचा अन मूल्यांचा?
याच प्रश्नांचं गहन उत्तर देणारी कादंबरी उल्का. तशी ही कादंबरी ही १९३३ च्या कालखंडातील आहे. वि.स.चीं उल्का ही अशी ध्येयनिष्ठ.. आपल्या आदर्शांवर ठाम असणारी. ही उल्का भाऊसाहेबांची कन्या. लहानपणापासून आदर्शांच्या, मूल्यांच्या वाटेवर जाणारी. भाऊसाहेब स्वतः आदर्शांची त्यागाची मूर्ती. ज्ञानदानासाठी शेकडो रुपयांवर लाथ मारून शिक्षकी पेशा स्वीकारणारे. उल्केची सोबती नीरा ही अठराविश्वे दारिद्र्य असणाऱ्या घरातील मुलगी तर इंदू ही सुवर्णाच्या राशीत वाढलेली. या दोहोंत होणारी उल्केची ससेहोलपट. चंद्रकांत हा लहानपणापासूनच आदर्शांसाठी आपले जीवन वाहलेला मुलगा. प्रसंगी स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेला योगी. तर वसंत, माणिकराव हे व्यावहारिकरित्या उल्केच्या मनाचा कोंडमारा करणारे व्यक्ती.. यात उल्केची व्यवहार(पैसा) व आदर्श यांच्यातील तारेवरची कसरत.
‘उल्का’ एक प्रेमकथा आहे ,संघर्ष कथा आहे. दारिद्र्याचे चित्रण आहे.मानवी वृत्तीचे दर्शन आहे. जरी कथा २० व्या शतकातील असली तरी आज तंतोतंत लागू पडते. तो एक प्रवास आहे.. संघर्षाचा.. आदर्शांचा.. त्यागाचा!! वि.स. खांडेकर यांनी आपल्या कलात्मक शब्दांनी ही कादंबरी फुलवली आहे. काही वेळी तशी ती खूप तत्वज्ञानी वाटते. परंतु वाचनाच्या ओघात त्याचे अनेक पैलू उलगडतात. सुंदरतेने मांडलेली नात्याची गोफ अन् मानवी स्वभावाचे हळवे दर्शन हाच या कादंबरीचा मतितार्थ असावा.
समीक्षण – तन्मय मांडरेकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: