लेखक – डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार
समीक्षक – विक्रम चौधरी
पृष्ठसंख्या – १५८
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्यांकन – ४.८ | ५
छत्रपती संभाजी महाराज..!! हे नाव आपल्या डोळयांसमोर कोणती प्रतिमा उभी करतं?? झंझावाती, शूरवीर योध्दा, अध्यात्मशास्त्र, शृंगारशास्त्र व राजनीतिशास्त्र ह्यात पारंगत असलेला शिवपुत्र, कलेवर व तलवरीवर निस्सीम प्रेम असणारा कलावंत, गृहकलहास बळी पडलेला राजा की एक बेजबाबदार, रंगेल आणि क्रूर युवराज? तुमच्या मनात जी कोणती प्रतिमा असेल तिची निर्मिती झाली ती इतिहासकारांनी काही न पडताळलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांतून, तुम्ही पाहिलेल्या नाट्यकलाकृतीतून.. संभाजी महाराजांची विकृत करण्यात आलेली प्रतिमा, त्याची कारणमीमांसा डॉ. पवार ह्यांनी पुराव्यासकट आपल्या ह्या प्रस्तावनेरूपी पुस्तकात खूप सोप्या भाषेत मांडली आहे. खरंतर हे पुस्तक संभाजी महाराज स्मारक ग्रंथ ह्या पुस्तकाची प्रस्तावना म्हणून लिहिण्यात आले असले तरी संभाजी महाराजांचा खऱ्या चरित्राचा शोध घेण्यात एक मैलाचा दगड आहे..
डॉ. पवार ह्यांनी संभाजी राजांबद्दल उपलब्ध असलेल्या सर्व बखरी (सभासद, रामराव ई.) प्रवासवृतांत, पत्रव्यवहार, मराठी व मोगल चरित्रकारांनी (खाफीखांन, साकी मुस्तेदखान ई.) रचलेली औरंगजेब व संभाजी राजांची चरित्रे इथपासून ते आधुनिक काळातील चरित्रकार (वा. सी. बेंद्रे, कमल गोखले ) ह्यांनी रंगवलेली चरित्रे इत्यादींची केलेली ही एक सत्यशोधक चिकित्सा आहे.. ह्यात लेखकाने स्वतः तटस्थ भूमिकेने सगळ्या ऐतिहासिक पुराव्यांकडे पाहून वाचकांसमोर आपले मत मांडले आहे व त्याचा अन्वयार्थ शोधण्याचे कार्य वाचकांवरच सोपवले आहे. प्रत्येक घटनेचा तपशील पडताळून त्या बद्दलची संदर्भसूची प्रत्येक प्रकरणांनंतर दिलेली आहे.
संभाजींनी सतत 8 वर्षे स्वगृहकलह सांभाळत एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी दिलेल्या झुंजा पाहता त्याचा ठायी असलेली अचाट इच्छाशक्ती व शौर्य कुणीही नाकारू शकत नाही. पण हेच सगळं सांभाळताना शिवरायांसारखी दूरदृष्टी व आवेगाला मुरड घालण्याची कला संभाजीना अवगत नव्हती आणि संगमेश्वराला त्यांना अकस्मात झालेली अटक व नंतर झालेली क्रूर विटंबना व हत्या हे ह्याचेच परिमाण आहेत. प्रत्येक पातळीवर आत्मतेजाचे प्रखर असे दर्शन घडवणाऱ्या व शिवपुत्र ह्या नावाला साजेसा असा नावलौकिक कमावणाऱ्या ह्या राजाची मालिन झालेली प्रतिमा आपण इतके शतकं मान्य करत आलोय हीच आपली खरी शोकांतिका आहे.. किंबहुना जी आपल्या साठी सोयीची ति प्रतिमा आपण स्वीकारत आलोय आणि क्षात्रतेजाच्या ह्या सूर्याचा कधी गैरसमज व स्वार्थाच्या गहिऱ्या रात्रीतून उदय होऊ दिला नाही..
अश्या ह्या वादळी आयुष्य लाभलेल्या आपल्या छत्रपती संभाजी राजांची खरी व समर्पक ओळख करून घेण्यासाठी नक्कीच हे पुस्तक प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसांनी वाचायलाच हवे..
समीक्षक – विक्रम चौधरी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
Nice review