inside-marathi-books-shikast-marathi-book-review-cover

शिकस्त

पोस्ट शेयर करा:

लेखक – ना.सं.इनामदार

प्रकाशन – कॉन्टिनेन्टल प्रकाशन

प्रकार – कादंबरी

समीक्षण – गिरीश अर्जुन खराबे

पृष्ठसंख्या – ५७८

मूल्यांकन – ४ | ५

ही कथा आहे पानिपतात हरवलेल्या वीर योध्याच्या वीर पत्नीची, जिने मराठी दौलतीची तिसऱ्या पानिपतच्या लढाईत झालेली अतोनात हानी आपल्या डोळ्यादेखत अनुभवली.

पानिपतात हरवलेले सदाशिवराव भाऊ आणि त्यांच्या मागे त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत वाट पाहणाऱ्या पार्वतीबाईंची खरंतर ही कहाणी. नानासाहेबांपासून ते सवाई माधवरावांपर्यंतची पेशवाई त्यांनी अनुभवली, दौलतीतले अनेक बखेडे उभे आडवे होताना त्यांनी पाहिले. परंतु पतीच्या दर्शनासाठी झालेली त्यांची तगमग, त्यातून होणारी हेळसांड ‘शिकस्त’ मधून लेखकाने मांडली आहे. तत्कालीन इतिहासात डोकावताना लेखकानी रेखाटलेली पात्र, तत्कालीन राजकारण, तोतया प्रकरणं आणि कारभाऱ्यांच पेशवाई भोवतीच गारूड वाचताना आपण पुस्तकातच खिळून राहतो. पुरुषप्रधान पेशवाई मध्ये होणारी स्त्रियांची होरपळणुक उत्तमरीत्या रेखाटण्यात आली आहे. जर पेशव्यांच्या स्त्रीची अवस्था अशी असेल तर सर्वसामान्य स्त्री जीवनाची कल्पना आपण न केलेलीच बरी.

तत्कालीन कार्यकाळात उभी राहिलेली भाऊंची, जनकोजी शिंद्याची तोतया प्रकरणं व त्यातुन दौलतीत फोफावणारं राजकारण ह्या पुस्तकातून चोख रंगवण्यात आलं आहे. एकंदर संपूर्ण कथानक हे पार्वती बाईंभोवती फिरत असल्यामुळे आपल्या मनात त्या पात्राबद्दल सहानुभूती उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. पतीच्या मृत्यूनंतर सती न गेलेल्या स्त्रीला जिवंतपणे कशा नरक यातना भोगाव्या लागायच्या याचं चित्र आपल्यासमोर प्रखरपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाला आहे.  पती दर्शनासाठी शेवटपर्यंत प्रयास करणाऱ्या पार्वतीबाईंची शिकस्त वाचण्यासारखी आहे. पती हयात असण्याच्या केवळ आश्वासनावर जगणाऱ्या एका पत्नीची ही साहसकथा आहे. साहसकथा यासाठी कारण समाजाला अंगावर घेऊन, कारभाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता सौभाग्यवतीच जीवन पार्वतीबाई मरेपर्यंत जगल्या.

मराठ्यांच्या इतिहासात सदाशिवराव भाऊंपाठोपाठ हरवलेल्या पार्वतीबाईंच्या व्यक्तिमत्वाला जिवंत करण्यात लेखकाने कुठेही कसूर केलेली नाही. अशी ही स्त्रिगाथा आपण वाचकांनी नक्की वाचायला हवी. मानवी जीवनाचे अनेक पैलू त्यात आपल्याला पाहायला मिळतील. स्वार्थ, ईर्ष्या, सहानुभूती अशा कितीतरी मानवी भावनांच उच्चाटन ना.सं.इनामदारांनी शिकस्त मधून केलेलं आहे. पार्वतीबाईंची ससेहोलपट आणि भाऊंसाठी त्यांनी केलेली शिकस्त मनाला चटका लावुन जाते एवढं मात्र नक्की!

समीक्षण – गिरीश अर्जुन खराबे

shikast N S Inamdar Nagnath Girish Kharabe continental kadambari panipat


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *