gothanyatlya-goshti-marathi-book-review-cover

गोठण्यातल्या गोष्टी

पोस्ट शेयर करा:

लेखक – हृषिकेश गुप्ते

प्रकार – लघुकथा

प्रकाशन – रोहन प्रकाशन

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

पृष्ठसंख्या – २२३

मूल्यांकन – ४.८ | ५

वाचक म्हणून एकाच प्रकारची पुस्तकं आपण वाचत असतो, त्यामुळे आपलं अनेक सुंदर सुंदर पुस्तकांकडे दुर्लक्ष होतं. असंच अगदीं विशेष पुस्तकं म्हणजे “गोठण्यातल्या गोष्टी”. मी असं पुस्तक मागच्या काही वर्षात वाचल्याचं मला आठवत नाही. अतिशय सुंदर आणि मनमोहक अश्या लघुकथा. तितकीच सुंदर आणि लोभस भाषा. यात एकाच गावातील अनेक पात्र अगदी सुक्ष्मतेन उतरवली आहेत. या पुस्तकात सर्व काही आहे.. चरित्र वर्णन आहे.. दंतकथा आहेत.. अख्यायिका आहेत.. आपल्याला हवं असणारं मनोरंजन आहे.. अनेक परंपरा, सण.. अनेक खेळ.. गावातील अनेक लहानसहान गोष्टी लेखकाने अगदी बारकाईने आपल्या निरीक्षणात आणून दिल्या आहेत. माझ्यासारख्या वाचकाला अंतर्मुख होऊन माझ्या गावची आठवण झाली.. प्रत्येक शब्दागणीक या पुस्तकात अडकत मला हे गाव माझं वाटू लागलं. ही या लेखकाच्या लेखणीची जादू आहे.

हृषीकेश गुप्ते यांनी काही पात्र निवडली आहेत.. त्यांच्या खुबी सांगता सांगता त्यांनी आपल्या समोर संपूर्ण गाव उभा केला आहे. त्याला समर्पक अशी रेखटनाची जोडही लाभली आहे त्यामुळे पुस्तक अजूनच खुलून येतं. प्रत्येक कथेत सगळी पात्र डोकावतात. गावाप्रमाणेच पुस्तकही आहे. त्यात सर्वांचा समावेशही आहे, सरमिसळही आहे आणि तरीही प्रत्येक किरदार आलिप्तही आहे. पुस्तक वाचताना कुठेच ते खाली ठेऊ वाटतं नाही त्याला कारणही तसच आहे, प्रत्येक पात्र आपलीच बालपणीची एक सुप्त इच्छा जागी करत आहे असं आपल्याला सतत वाटत राहतं.

सुलतान पेडणेकराचा मस्तमौला बेलगाम जगणं असो.. की जिताडेबाबांची जिद्द.. जयवांताच्या मृणालचचा थेटपणा असो.. की खंडूचा धीटपणा.. मॅटिनी मोहम्मदच सिनेमा वरील प्रेम.. रंजनची कलात्मक पण मूर्ख वागणूक.. एका अकस्मात भोवऱ्यात अडकलेला गोलंदाज.. आणि या सर्वात एक समान धागा पकडून गावाला कलाटणी देणारे.. बापटांचे साडू. असे एक ना अनेक पात्र गावातील गोष्टी रंगवताना लेखकाने खुलवले आहेत, प्रत्येक गोष्टीला एक तर्क आहे.. पात्रांना योग्य तो वाव दिला आहे.

खरं सांगायचं तर मला हे पुस्तक इतकं आवडलं आहे की यावर एक सिनेमा होऊ शकतो असं मला वाटतं. किंबहुना तो व्हावा. सिनेमाप्रमाणेच यात सारे भाव आहेत.. रसिकता.. कलादर्षण… मनोरंजन… क्रिकेट.. एकमेकांच्या कुरघोड्या.. एकमेकांचे सलोखे. लेखकाचे, सांगितल्याप्रमाणे पुस्तकातील कथा या स्वयंभू असल्या तरीही गावं हा या पुस्तकाचा मसावि आहे. वाचकाच्या मनाची अवस्था हे पुस्तकं सांभाळतं असं मला वाटतं, त्यामुळे गावात राहणाऱ्या आणि गावं समजून घेऊ इच्छणाऱ्यांसाठी हे पुस्तकं एक सुंदर पर्वणीच आहे असं मला वाटतं. तुम्ही हे पुस्तकं वाचलाच अशी मला अपेक्षा आहे.. तुम्हाला हे पुस्तक कस वाटलं हे आम्हाला नक्की कळवा.

समीक्षक – अक्षय सतीश गुधाटे

gothanyatlya gosht hrushikesh Gupte rohan akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *