swami marathi book review

स्वामी

पोस्ट शेयर करा:

लेखक – रणजीत देसाई
पृष्ठसंख्या – ४३८
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन – ४.९ | ५

स्वामी म्हणजे तारक, आधार, जी आपल्यासाठी खास आणि आदरयुक्त अशी व्यक्ती असते. रणजीत देसाई यांनी स्वामी या कादंबरीला आपली मानसकन्या म्हटलं आहे. हे नाव रयेतेने एका माणसाला बहाल करावे किंवा या नावाने संबोधावे यातच त्यांच्या पराक्रमाची व्यक्तिमत्वाची एक छोटीशी झलक मिळते. ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या वयाच्या १७ व्या वर्षी पेशवाईच्या वस्त्रांचा भार ज्यांनी आपल्या देहावर सांभाळला. पानिपतात शहीद झालेल्या जवानांच्या सगळ्या कुटुंबियांना ज्यांनी सहारा दिला, आपल्या सदैव शांत, लोभस स्वभावाने आणि निरपेक्ष वृत्तीने सगळ्यांना मोहून टाकले, आणि ज्यांच्या अकाली मृत्युने सारा हिंदुस्तान हळहळला, असे नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव पेशवे.

ऐतिहासिक कादंबरी म्हटल की अनेक पात्र आणि त्यांची अचूक उकल हे पुस्तकाचे मूळ गमक असते. प्रसंगवर्णन आपल्याला भारावून टाकते परंतु यात तुम्हाला प्रसंग त्यांच्या अनेक बाजू एकाच वेळी लक्ष्यात घ्याव्या लागतात. प्रत्येक वाक्याचा काहीतरी अर्थ आहे आणि तो पुढे कुठेतरी नक्कीच एक कोड सोडवून जातो. रणजीत देसाई यांच्या या कथा मांडण्याच्या आणि बारकावे हाताळण्याच्या अद्वितीय शैलीचे तुम्ही आवर्जून कौतुक कराल. पुस्तकातील बुद्धिबळ खेळण्याची पद्धत त्यामागे लपले असलेले नात्यांचे राजकारण अबोल चालींमधील बोलके भाष्य. या सगळ्याचे तुम्हाला लवकरच अनुभव येतील आणि लेखकाने अतिशय सुरेखरित्या योग्य अशा व्यक्तींचा केलेला सहभाग तुम्हाला रोमांचक थरार आणि नाट्य अनुभव देईल.

अतिशय कमी आयुष्य लाभलेल्या या महान नायकाची कहाणीच काही औरच आहे. ११ वर्षाच्या राजकारणात अनेक सक्रिय लढाया ८ वर्षाहून अधिक परगावी मोहिमा आणि तरीही विखुरलेला समाज बांधणीचे काम गृहकलह मिटवण्यात आलेलं त्यांना यश आणि आजन्म फुललेलं पती पत्नीच प्रेम, ज्याची गाथा वर्षानुवर्षे लोक गात आहेत. या कादंबरीवर आधारित मराठी नाटक, सिनेमा आणि आता मालिका देखील सुरू आहे. इतकी लोकप्रिय आणि मराठी माणसांनी पोथी मानून जपलेल्या या कादंबरीचे अनेक पैलू तुम्ही बघाल. सरतेशेवटी क्षयरोगाने ग्रासलेले ते रूप आणि लोकांचे त्यांच्यावरील प्रेम डोळ्याला पाण्याच्या धारा लावून जातात. पत्निप्रेमाचे प्रतीक म्हणून निपुत्रिक असून दुसरे लग्न न करणारे माधवराव म्हणावेत की पतीप्रेमापोटी सती गेलेल्या रमाबाई ??

मराठ्यांचा इतिहास रंगवलेल्या आणि प्रेमाचे प्रतीक बनलेल्या या कादंबरीला माझ्या मनात अविस्मरणीय स्थान आहे.

swami ranjeet desai mehta peshwa peshwe peshva peshva madhavrav madhavrao ramabai panipat kadambari akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1392/swami—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

3 Comments

 • #स्वामी

  मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे थोरले माधवराव पेशवे. पानिपतच्या रणसंग्रामानंतर मराठी साम्राज्याची विस्कटलेली घडी माधवरावांनी सुरळीत केली. आणि मराठी साम्राज्याचा दरारा पुनश्च एकदा प्रस्थापित केला. असे हे थोरले माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्यावर आधारलेली विलक्षण ऐतिहासिक प्रेमकहाणी. याच कादंबरी मुळे रणजित देसाई यांना ‘स्वामी’कार म्हणुन संबोधले जाते.

  कादंबरी वाचत असता माधवरावांच्या चरित्राचा प्रत्यय येत जातो. त्यांचा करडी शिस्त, दक्षता, राज्यकारभारावर जातीने लक्ष इत्यादी गुणांचे दर्शन होत जातात. निजाम, हैदर आणि इंग्रज ह्या परकीय सत्तांशी लढताना चुलते रघुनाथराव ( राघोबा दादा ) आणि इतर घरभेद्यांशी दिलेला लढा देखील कादंबरीत वाचकांना वाचायला मिळतो. पुण्यावर निजामाने केलेली चाल, पुण्याची लुट आणि त्यात निजामाला मदत करणारे आपलेच स्वकीय, राक्षसभुवनची लढाई हे प्रसंग वाचत असताना तुम्हाला त्याच कालखंडात वावरत असल्याची प्रचिती येते.

  ह्या सर्व घटना घडत असताना त्यांच्या वयक्तिक आयुष्यातील घडामोडी दाखवण्यास ‘स्वामी’कार विसरले नाहीत. पेशवे घरातील अन्य कुटुंब सदस्य जसे की रमाबाई, पार्वतीबाई ( सदाशिवराव भाऊंच्या पत्नी ), गोपिकाबाई ( माधवरावांच्या मातोश्री ), आनंदीबाई ( राघोबादादांच्या पत्नी ), राघोबादादा, नारायणराव ( माधवरावांचे धाकटे बंधू ) ह्यांचे स्वतंत्र असे व्यक्तिचित्रण रणजित देसाई यांनी रेखाटले आहे.

  स्वकीय आणि परकीय ह्यांच्याशी माधवरावांचा यशस्वी लढा चालू असतानाच हा तरुण पेशवा क्षयाने ग्रस्त होतो. आणि तिथूनच त्याच्या शेवटच्या प्रवासाची सुरुवात होते. पण तिथेही त्यांना एक सोबती मिळतो. होय, त्यांची अर्धांगिनी रमाबाई. मृत्यूनंतरही आपली सोबत तशीच रहावी असा जणु त्यांनी निश्चयच केलेला असतो. आपला मृत्यू आता जवळ आला आहे, ह्याची जाणीव होताच माधवराव ‘ थेऊर ‘ गावी जाण्याची इच्छा व्यक्त करतात. कारण चिंतामणी गणेशाच्या साक्षीने आपण आपला देह ठेवावा असे त्यांना वाटत असते. दि. १८ नोव्हेंबर, १७७२ रोजी ‘ श्रीं ‘ च्या सभामंडपी रावांनी आपला देह ठेवला. आणि मृत्यूनंतरही सोबत राहण्याचे वचन दिलेल्या रमाबाई सती गेल्या. आणि तिथून त्यांच्या प्रवासाला नव्याने सुरुवात झाली.

  ‘ स्वामी ‘ हे इतिहासाच्या ललित लेखनाचे आणि मराठी साहित्याचे स्वर्णलंकार आहे. आणि त्याचे स्वर्णकार आहेत ते ‘ रणजित देसाई.’

  – सौरभ नायकवडी

 • कादंबरीचा शेवट फारच हृदयद्रावक आहे, मन विक्षिन्न होते. स्वामीकारानी रेखाटलेला तो प्रसंग अक्षरशः काळजाला चटका लावून जातो. पतीपत्नीच्या अविरत प्रेमाचा एक मतीगूंग करणारा अविष्कार, कडवा चरित्रवान शिस्तप्रिय द्रष्टा प्रशासक आणि निष्ठवंत गणेश भक्त “श्रीमंत माधवराव पेशवे” यांचे जीवनचरित्र म्हणजेच “स्वामी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *