कवयित्री – अरुणा ढेरे
प्रकाशक – सुरेश एजन्सी
पृष्ठसंख्या – ११२
मी स्वतः कविता लिहीत असल्याने, अरूणा ढेरे ह्यांचं निरंजन हे पुस्तक वाचायला घेतलं आणि वाचताना मला खूप काही शिकायला मिळालं…
अनेक विषयांना हात घालत, शब्दांचा नेमकेपणा, भावनांमधील आर्तता, जीवन जगताना त्यातील अंतस्थ भाव त्यांनी त्यातून सहजपणे मांडले आहेत… घरादाराला, नात्यांना एकत्र बांधण्यासाठी पदर खोचून जीवनास लढा देणारी बायो असो किंवा निरंजन बाय असो… त्या प्रत्येकामधून अरुणा ढेरे आपल्याला त्यांच्या भावविश्वात घेऊन जातात. जीवन जगत असताना, दुःखाशी चार हात करताना, एखादी वेळ अशी येते कि आपल्याला समजूतदारपणे निराशा स्विकारावी लागते आणि तेच “आपापल्या आयुष्याशी सांग भांडायचे किती ?” ह्या कवितेतून समोर आल्याशिवाय राहत नाही…
“साध्या माणसाकरता” हि कविता वाचताना तर अंगावर काटाच येतो.
आजूबाजूला घडणाऱ्या अयोग्य गोष्टींची बोचणी आपल्याला हलवून टाकते… साध्या माणसासारखं जगणं किती दुर्मिळ झालं आहे हे प्रकर्षाने जाणवू लागतं! निरंजन मधली एकेक कविता वाचताना जगण्यातील विश्वास, सकारात्मकता आपल्यात खोलवर भिनत जाते… प्रत्येक कविता वेगळा विचार मांडता मांडता कोमलतेने मनाचा ताबा घेऊन एक वेगळाच दृष्टिकोन मागे ठेवून जाते…
स्त्री – पुरुषांच्या जाणिवांबद्दल अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या, सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या संपन्न व्यक्तिमत्वाचं दर्शन ह्या काव्य संग्रहातून आपणास होतं. मानवी आयुष्यातल्या अनेक भाव भावनांचं मिश्रण कवयित्रीने आपणासमोर मांडलं आहे, याची जाणीव प्रत्येक कवितेगणिक होत राहते म्हणून एकदा तरी निरंजन जरूर वाचून बघा!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
अप्रतिम लिहिले