balut marathi book review cover

बलुतं

पोस्ट शेयर करा:

लेखक – दया पवार

समीक्षण – शैलेश भुतनर

पृष्ठसंख्या – १९२

प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन                                              

मुल्यांकन – ४.७ | ५

महाराष्ट्रातील अलुते, बलुते, भटके, फिरस्ते, शेतमजुर अशा उपेक्षित व तेंव्हा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील लोकांच्या आयुष्याविषयी भान निर्माण करणारे व त्यांच्या वेदनांची जाणीव निर्माण करून देणारे पुस्तक, म्हणजे दया पवार यांच बलुतं. चार ते पाच दशकांपूर्वी समाजाला गोचिडा सारख्या चिकटलेल्या जातीमुळे काही समाजातील लोकांची तथाकथित उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या समाजाकडून होणाऱ्या शोषणाची कथा, भारतीय समाजात त्या काळात असणारी विषमता, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-परंपरा, जुनाट चालीरीती, ग्रामीण आणि शहरी भागातील दलित व स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या यातना आणि त्यांचे त्या यातनांवर मात करीत जगणे, त्या जगण्यातील भयानक विदारकता बलुतं ने आपल्या समोर मांडली आहे. आपलाच समाज आपलीच माणसं ज्यांनी आपल्या कल्पना ही थिट्या पडाव्यात इतके कष्ट पिढ्यानपिढ्या सोसलेत, ज्या नरक यातना त्यांनी भोगल्यात, प्राण्यांपेक्षाही भयंकर आयुष्य त्यांनी जगलेत ते केवळ महार समाजातील आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतल्यामुळे आणि त्याला जबाबदार आपण तर नाही ना ? असा प्रश्न बलुतं वाचताना नकळत आपल्या मनात येत असतो.

दगडू मारुती पवार यांच्या वाट्याला आलेलं हे दुःखाच भलं मोठ गाठोडं हे त्या काळातील भारतीय समाजव्यवस्थेने जन्मताच त्यांच्या पाठीशी बांधलेले होते. दया पवार नावाच्या लेखक, साहित्यिक म्हणून उदयास आलेल्या व्यक्तीच्या आत शरीरामध्येच कुठेतरी दगडू मारुती पवार बसलेला आहे. एकाच शरीरात राहणारी ही दोन जुळी व्यक्तीमत्व आहेत. घर, संसार, आत्ता कुठे स्थिरावलेलं अस सुखासीन आयुष्य उपभोगू न देता दगडू मारुती पवार हा दया पवारांना दगडूचे आयुष्य पुस्तक स्वरूपात लिहायला भाग पाडतो. अफाट कष्ट सोसलेल्या दगडू मारुती पवार यांच्या पाठीवरचे दुःखाने भरलेल गाठोड दया पवार हे आपल्या लेखणीतून खुलं करीत जातात.

जो समाज हजारो वर्षे उपेक्षित, वंचित राहिला, अज्ञान, अंधश्रद्धा, येसकर पाळी यांच्या गर्दीत ग्रासून निघाला अशा महार समाजातील आई-वडिलांच्या पोटी दगडूचा जन्म होतो. दगडूचे बालपण मुंबईतील कामाठीपु-याच्या शेजारील कवाखान्यात आणि धामणगावच्या महारवाड्यात जाते. त्यामुळे खेळण्या, बागडण्याच्या आणि संस्कार घडण्याच्या वयात दगडूने महानगरीय ताणेबाणे तर अनुभवलेच पण त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी लाचार झालेला धामणगाव चा महारवाडा देखील पाहिलेला असतो. धामणगावचा महारवाडा, तेथील चावडी, महारवाड्यातील पटांगण, तेथील खेळ, दगडूचे सवंगडी, महारवाड्यातील भांडण-तंटे ह्या सर्व आठवणी दगडूच्या भावविश्वात खोलवर रुतून बसलेल्या आहेत. महार जातीतील लोकांना गावात दवंडी पिटवणे, गावाेगावी मयताचा सांगावा पाठवणे, मोठ्या अंमलदारांच्या घोड्यापुढे धावणे,गावातील मोठ्या असामींच्या घरी त्यांच्या जनावरांची देखभाल करणे, मेलेली जनावरे ओढणे, लाकडे फोडणे, गावातील जत्रेत डफली वाजवणे अशी गावकीची कामे करावी लागत आणि या कामाचा मोबदला म्हणून जे धान्य किंवा वैरण मिळायची त्यालाच बलुतं म्हणत.

मुंबईत वास्तव्याला असताना दगडू कामाठीपु-या शेजारील कवाखाण्यात एका खोलीत रहात असे. या कवाखान्यात रहाणार्‍या दलित समाजाचे विविध रंग, तेथील लोकांचे भयावह जगणे हे दगडूने जवळून पाहिलेले असते. कवाखान्यात सट्टा, बेटिंग, बार, दारूच्या भट्ट्या लावणे अशी कामे अगदी सामान्य समजली जायायची. जुगाराचे अड्डे, संभोग विषयक चर्चा या ठिकाणी अगदी उघडपणे केली जात असे. दगडू देखील या चर्चेचा या समाजाचा एक भाग होता. लेखकाकडून दगडूचे आत्मकथन मांडत असताना नकळत दगडूच्या अपमानित समाजाचेही आत्मकथन मांडले जाते, त्यामुळे व्यक्ती दर्शन आणि समाजदर्शन या दोन्ही अंगाने पुस्तकाला मूल्य प्राप्त होते.

दगडुच्या कुटुंबातील आणि सहवासातील व्यक्तींचे पात्रे अत्यंत प्रत्ययकारी आणि जिवंत वाटावीत अशा पद्धतीने लेखकाने ती पुस्तकात उतरवीली आहेत. सतत कष्ट उपसणारी आई, ज्या वयात दगडू शाळेत ‘सत्य बोलावे’ शिकत असतो त्याच वयात दगडूला चोरीचा माल विकायला शिकवणारे व्यसनी दादा (दगडूचे वडील), आजी, वडाळ्याच्या झोपडपट्टीत राहणारी बहिण, आपली वासना भागविण्यासाठी कडुनिंबाचा रस करून पिणारी काकू, अफवा उठवणारा उमा आज्या, मार्ग चुकलेली सई, नवऱ्याने सोडून दिलेली बानु, भ्रमनिरास झालेला रोकडे, कवाखाण्यातील बायकांच्या मदतीने आपली हनिमून रात्र साजरी करु पाहणारा सयाजी, नक्षत्रासारखी रेणू, कलावंत सदाशिव, सट्टा बेटिंग खेळणारा चंदर, हिस्टेरिया झालेली सीता, परिस्थितीमुळे वेश्या बनलेली मावशी, रस्ता चुकलेल्या दगडूला आयुष्याची नविन वाट दाखवणारी सलमा अशा कितीतरी व्यक्तिरेखा आपल्याला पुस्तकाच्या पानोपानी भेटत जातात.

संवेनात्मक निवेदनशैली, साधी, सोपी, ओघवती, आणि अनलंकृत भाषा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्ये. बलुतं प्रकाशित झाला तेंव्हा या साहित्य प्रकाराला म्हणायचे तरी काय? हा प्रश्न साहित्यातील जाणकारांना पडला होता. आत्मचरित्र म्हणता येणार नाही कारण आत्मचरित्राच्या साऱ्या कक्षा ओलांडून ही साहित्यकृती अवतरली होती. कादंबरी म्हणावे तर लेखकाने कल्पकतेचा तिळमात्र स्पर्श न होऊ देता दगडूचे आयुष्य जसेच्या तसे या पुस्तकात मांडले आहे आणि तशी सुचना त्यांनी पुस्तकाच्या पहिल्याच पानावर दिलेली आहे. “या पुस्तकातील प्रसंग, घटना व पात्रे कुणाला काल्पनिक वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा” ही ती सुचना. तेंव्हापासून मग ‘आत्मकथन’ हा नवीन साहित्यप्रकार मराठी साहित्यात रूजू झाला. 

१९७५ ते १९८० च्या काळात स्वान्तसुखाय आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या संवेदनशीलतेला काटा टोचावा इतके जबरदस्त काम (कोणतीही वैयक्तिक टिका टिप्पणी न करता) बलुतं ने केल. शब्दांची जाण असुन पण साहित्यापासून कित्येक पिढ्या वंचित राहिलेल्या समाजाला आपणही लिहू शकतो हे आत्मभान देऊन, आपले दुःख आपल्या वेदना अतिशय संवेदनशीलपणे कशा मांडाव्या याचा परिपाठ दलित साहित्यिकांना घालून देऊन त्यांच्यासाठी मराठी साहित्य जगताच्या बुलंद राजवाड्याचा दरवाजा कायमचा खुला करून दिला तो बलुतंनेच. बलुतं ने येथील समाजाच्या शेवटच्या माणसाचे दुःख चव्हाट्यावर आणले त्यामुळे बलुतं मराठी भाषेपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या सीमा ओलांडून जगभरातील शोषितांच्या दुःखाशी आपलं नातं सांगू लागल. बलुतंची अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, जर्मन, फ्रेंच यासारख्या युरोपियन भाषेत भाषांतरे झाली.

पु. ल. देशपांडे यांनी बलुतंला “दुःखाने गदगदलेल झाड” असे का म्हटले आहे? किंवा  कोणीही तयार केलेल्या ‘प्रसिद्ध मराठी पुस्तकांच्या यादीत मध्ये बलुतं हे पुस्तक कायमच का असते? या प्रश्नाचे उत्तर समजण्यासाठी आयुष्यात एकदातरी बलुतं नक्कीच वाचायला हवं. शेवटी जाताना मला आवडलेल्या पुस्तकातील काही ओळी  “रिकामा वेळ खायला उठायचा. वाचनाचा लहानपणापासून नाद होताच. पण हवी ती पुस्तकं मिळायची नाहीत. अन्नाची जेवढी भूक लागायची, तेवढीच वाचनाची लागायची.”

समीक्षण – शैलेश भुतनर

balut daya pawar granthali shailesh bhutnar


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/6304/balut—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]इंग्रजी आवृत्ती


संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

2 Comments

  • प्रभावी आणि टोकदार विचार सर.

  • जो पर्यंत एखादा वाचक एखाद्या साहित्यकृती शी एकरूप होत नाही तो पर्यंत त्या वाचकाला इतके प्रभावी समीक्षण करणे शक्य नाही.शैलेश तू अत्यंत मुद्देसूद व सोप्या शब्दांत हे समीक्षण केले आहेस. त्यामुळे माझी व इतर वाचकांची देखील हे पुस्तक वाचण्याची उत्कंठा नक्कीच वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *