gun gayin aavdi marathi book review cover

गुण गाईन आवडी

पोस्ट शेयर करा:

लेखक – पु. ल. देशपांडे

पृष्ठसंख्या – २००

प्रकाशन – मौज प्रकाशन गृह

मुल्यांकन – ४.७ | ५

दुसर्‍याची स्तुती आणि गुणगाण आनंदाने करणारे असे किती लोक आपल्याला भेटतात ?? अगदी बोटांवर मोजण्याइतकेच. आणि त्यातलेच एक म्हणजे पु ल देशपांडे (भाई). मी हे नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्र त्यांना नखशिकांत ओळखतो, अजूनही त्यांच्या प्रेमात जगतो, आणि त्यांना दैवत मानतो. भाईंनी त्यांच्या आयुष्यातील अशाच काही काल्पनिक पात्रांची रसिकांच्या मनात जागा करून दिली आहे ती म्हणजे व्यक्ती आणि वल्ली मधून. आणि त्याच्याच जोडीला वास्तविक आयुष्यात ज्यांच्या कामाने भाई भारावले, ज्यांनी आयुष्यात मौलिक भर घातली अशा काही व्यक्तिमत्त्वांचे पडद्यावरचे अनेक गुण भाईंनी जगासमोर मांडले, त्यांची नवी ओळख करून दिली.

पुलंनी हे गुण गायन इतकं सराईत पणे केलं आहे कि त्या व्यक्तींच्या आयुष्यातील सुराला भाईंनी ताल दिला आहे असं वाटतं. या पुस्तकात पंधरा व्यक्तींच्या आयुष्यातील काही छोटेसे अंश आहेत. बाबा आमटे, वसंतराव, भास्करबुवा, बोरकर, वसंत पवार असे सारेच एकास तोड एक असे लोकं. महाराष्ट्राला, मराठी मातीला या सार्‍यांनी वाहिलेल्या आपल्या आयुष्यातील काही पानांना इथे उजाळा मिळतो. आणि त्या पानांतून आपलही आयुष्य उजळतच जाईल.

समाजाची बंधने तोडून स्वतःच्याच एका वेगळ्या विश्वात गर्क असलेल्या काही लोकांचे व्यक्तिमत्त्व जर आपण निरखून पाहिले, तर आपल्याला ही स्फूर्ती येते. काहीतरी नवं आणि समाजासाठी करण्याचे स्फुरण चढते. आधीच इतकी ताकतीचे व्यक्तिमत्व आणि त्यातून पुलंच्या लेखणीने त्यांना चढवले चार चांद खूप काही शिकवून जातात. भाईंना सापडलेला दुनियेकडे पाहण्याचा लोलक सगळ्यांनाच मिळाला तर, किती वेगळी, माणुसकीची, आपुलकीची आणि सच्ची माणसं वारंवार पाहायला मिळतील. अशा अस्सल माणसांच्या अस्सल पंधरा कथा तुम्हाला थेंबाथेंबाने जाणिवांचा पाट मोकळा करायला मदत करतील. हे पुस्तक कोणत्या एका क्षेत्रासाठी, माणसासाठी, विषयासाठी असं नाहीच मुळी. यात चौफेर स्वच्छंदी विहार केलेले काही पक्षी आहेत, ज्यांच्या प्रवासाचा गोडवा आयुष्याला निरंतर गोडीच लावत रहावा असा आहे. त्यांनी स्वैर गाजवलेल्या दाही दिशा सर्वांनी पहाव्या हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.

नाट्यसृष्टीतील राम गणेश गडकरी, केशवराव दाते. तर संगीताला ज्यांनी महाराष्ट्रात घराघरांत पोहोचवले आणि रूजवले असे पं. वसंतराव देशपांडे, भास्करबुवा बखले, मल्लिकार्जुन मन्सूर. तसेच सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलणारे सेनापती बापट, बाबा आमटे यांसारखी काही माणसे तर कवितांच्या जगात हक्काने जगलेले आनंदयात्री बा. भ. बोरकर, यांसारख्या माणसांच्या काही आठवणी आहेत. ज्यांच्यात काही एक विलक्षण सामर्थ्य आहे, एका पणतीने दुसरी पणती पेटवावी आणि अंधाररुपी आळस, निराशा दूर करत मिणमिणत्या तेजाने का होईना पण जगाला जमेल तितका आनंदप्रकाश वाटत रहावा.

पुलंची लेखनशैली, त्यांची माणसं उभी करण्याच कसब आणि सूक्ष्म निरीक्षण ही या पुस्तकाची खासियत आहे. पुस्तक एकदा हातात घ्यावे, आणि खाली न ठेवता वाचत राहावे अशीच याची लकब आहे, गोडी आहे. वाचून पहा आणि न थकता आनंदाने आवडीने गुण गात रहा!!

gun gayin aavdi pu la deshpande akshay gudhate mauj


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/5471/gun-gayin-awadi—-buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *