लेखक – फ्रॅंक बंकर गिलब्रेथ (ज्यू.), अर्नस्टाईन गिलब्रेथ कॅरे
अनुवाद – मंगला निगुडकर
पृष्ठसंख्या – १३८
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्यांकन – ४ | ५
खरंतर १९८६ मध्ये ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पण पुढे १४ आवृत्त्या करीत २०१६ पर्यंत ह्या पुस्तकाने मजल मारली. २०११ साली मी हे पुस्तक विकत घेतलं ते त्याच्या वेगळ्या नावामुळे. आणि खरोखरच नाव आणि पुस्तकाचा इतका वेगळा संबंध असेल हे मला ते वाचायला लागल्यानंतर समजले. तसं बघायला गेला तर हि एक आत्मकथा च आहे पण दोन भावंडांनी लिहलेल्या जुन्या आठवणी म्हणाले तर जास्त आपुलकीचं वाटेल. इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद असला तरी मंगला निगुडकरांनी अतिशय सोप्या भाषेत ह्याची मांडणी केलेली आहे. विशेष करून २ भावंडं कशी गोष्ट लिहू शकतात ह्याकडे कुठेही दुर्लक्ष झालेला नाही. पुस्तकाच्या कथेची मांडणी इतकी सुयोग्य आहे कि त्यांचा घर, ती १२ मुलं, आई-वडील आणि इतर पात्र आणि ठिकाण अगदी डोळ्यासमोर उभी राहतात आणि एक वाचक म्हणून हीच एखाद्या पूस्तकाची खरी पारख असते.
हे पुस्तक सलग नसून वेगवेगळ्या भागात विभागले आहे. बालपण , शाळा, कॉलेज अशा टप्प्यांमध्ये लिहलेले असल्याने वाचणारा कुठेही अडत नाही. पुस्तकाचा मूळ विषय कौटुंबिक आहे आणि म्हणूनच मनाला आपलासा वाटणारा आहे. साधारण कथेचा सारांश १२ मुलांचे कुटुंब अधिक आई बाबा आणि बाकी विविध पात्र ह्यांची गोष्ट असा आहे. आहे कि नाही गम्मत १२ मुलं ? अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ह्या गिलब्रेथ कुटुंबाच ब्रीद वाक्य असू शकतं . आता तुम्हाला पुस्तकाच्या नावाचा अंदाज आला असेल.
कोणतीही गोष्ट डझन घेतली कि स्वस्त पडते आणि हाच विचार गिलब्रेथ आई बाबांचा होता. हे पुस्तक वाचून मी स्वतः ४-५ नव्या गोष्टी शिकले ज्या आपलं रोजचं आयुष्य सुखकर करू शकतात. १२ मुलांना सांभाळणं हि काही सोपी गोष्ट नाही आणि म्हणूनच घरात केलेले नियम, कामाची वाटणी ह्या गोष्टी अगदी शिकण्याजोग्या आहेत. उदाहरणार्थ अंघोळ करताना जर्मन, फ्रेंच, इ. भाषांच्या टेप रेकॉर्डस् ऐकणे, घरात निवडणूक घेऊन समित्या स्थापने, कामाची विभागणी योग्य बक्षिसे देऊन करणे हे वाचायला विचित्र वाटलं तरी विचार केल्यास खूप सोप्या कल्पना आहेत हे कळेल.
आयुष्यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम काम करून विविध गोष्टींमध्ये आपली मुले कशी अव्वल होतील ह्याबाबतची माहिती ह्यातून मिळते. अतिशय दूरदृष्टी असलेले फ्रॅंक गिलब्रेथ आपल्या पत्नीबरोबर १२ मुलांचा संसार कसा पेलतात हे नक्कीच वाचण्याजोगे आहे. गमतीशीर स्वभावामुळे कुठेही गिलब्रेथ ह्यांच्या मुलांना वाढवण्याच्या संकल्पनेवर शंका येत नाही. हे ह्या पुस्तकाचं श्रेय आहे.
शिक्षण आणि घरकाम कसा महत्वाचं आहे हे मुलगा आणि मुलगी असा भेदभाव ना करता ह्यात सांगितले आहे जे कि कौतुकास्पद आहे. म्हणूनच आई वडील आणि मुलं ह्यांनी हे पुस्तक वाढत्या वयात वाचन अगदी योग्य आहे. पण म्हणून इतर वाचक वर्ग सुद्धा ह्या पुस्तकाच्या आधारे आपल्या आयुष्यात चांगले बदल नक्कीच करू शकतो हे नक्की.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
एक वेगळी संकल्पना आणि तितकंच उत्तम समीक्षण ✍️