pahile prem marathi book review

पहिले प्रेम

पोस्ट शेयर करा:

लेखक – वि. स. खांडेकर

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठसंख्या – १२२

मूल्यांकन – ५ | ५

स्त्री पुरुषाचं नातं म्हणजे कोळ्याने विणलेली एक नाजूक जाळीच; तुटलं तर एका साध्या फुंकरीनेही तुटेल पण टिकलं तर वज्र प्रहारानेही तुटणार नाही. असं म्हणणं अतिशयोक्ती वाटु शकतं पण नात्यांची ही वीण घट्ट करणारी एक भावना माणसांच्या अंतरात खोलवर रुजलेली असते. कधी ती प्रकट होते, कधी होत नाही, परंतु भावना मात्र तीच असते. त्यात मायेचा ओलावा असतो, पावसाचा शिडकावा झाल्यानंतर येणारा मातीचा दर्प असतो, प्रत्येकाला आलेला वेगळा अनुभव असतो, कैकदा तो कळलेलाही नसतो अन त्यालाच आपण सगळे प्रेम भाव म्हणत असतो. म्हणूनच की काय प्रेमाची इतकी लांबलचक परिभाषा माणूस खांडेकरांना वाचल्यानंतर आपसूकच मांडू लागतो. 

पहिले प्रेम हे पुस्तक नावानुसार फक्त आणि फक्त प्रेमाच्याच दृष्टीकोनातून मांडलं असेल असा जर आपला प्राथमिक तर्क असेल तर तो साफ चुकीचा आहे; याची जाणीव पुस्तक संपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही.

“जगणं म्हणजे झोपाळ्यावर बसून झोके घेणं नव्हे. जीवन हे वादळातून होडी हकारण्यासारखं आहे!” या बाबासाहेब नावाच्या पात्राच्या मुखोद्गरातून सुरू होणार हे पुस्तक आपल्या भावविश्वात खूप सारी भर घालून जातं. देवदत्त, प्रभाकर, करुणा, अरुणा, मनोहर, अनुसया, बापू भटजी अशा सगळ्या पात्रांभोवती फिरणारी ही प्रेममय कथा खांडेकरांनी आपल्या विशेष शैलीत मांडली आहे. एकमेकांभोवती फिरणारी ही सगळी पात्र, त्या प्रत्येकाचा प्रेमाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टिकोन, पदोपदी कथेमध्ये जाणवणारी उत्कंठा वाचकाचा भ्रमनिरास करत नाही. पहिलं प्रेम हेच खरं असतं वा खोटं असतं असं लेखक ठामपणे कोठेच सांगत नाही. कारण मुळातच प्रेम ही भावनाच इतकी उत्कट आहे की माणसागणिक त्याची जाणीव सतत बदलत असते. प्रेमा बद्दल बोलताना जेंव्हा करुणा देवदत्त ला सांगते कि, “छाया नि प्रकाश यांच्या मिश्रणातून जसे सुंदर चित्र निर्माण होते, त्याप्रमाणे पुरुष आणि स्त्री यांच्या भावनांच्या मिळणीतून संसाराचे सुख उत्पन्न व्हायला हवे!” तेंव्हा आकर्षण आणि प्रेम यांचा आपण सहज भेद करून टाकतो. दोहोंमधली तफावत आपल्याला सहज समजून येते. 

आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येक वेळी हिरवळीवरूनच चालायला मिळेल असं थोडीच आहे. निराशारूपी वाळवंट देखील कधी कधी ओलांडावा लागेलच मात्र अशावेळी जर हृदयाला साद घालणारा, तप्त वाळवंटात देखील ते शीत ठेवणारा सोबती असला तर प्रवास आपोआप सुखकर होतोच ना! प्रेमात असणारी ही जादू लेखक आपल्याला विविध प्रसंगातून दाखवून देतो. प्रेम हे वैफल्यग्रस्तही ठरू शकतं परंतु त्यातूनही हार न मानता प्रभाकरासारखी उभारी घेण्यास लेखक आपल्याला शिकवतो.

“वादळात ज्या होड्या एकमेकींच्या जवळ येतात, मृत्यूच्या दारात ज्या होड्यांना एकमेकींचा आधार मिळतो, त्याच आयुष्यभर एकत्र प्रवास करतात”. 

स्त्री पुरूषाच्या नात्याबद्दल उलगडा करताना वापरलेल्या या ओळींमध्ये कमालीचा अर्थ दडलेला आहे. मोजक्या आणि रूपक शब्दांतली मांडणी हे खांडेकरांचं वैशिष्ट्य या पुस्तकातून आपणाला नक्कीच पाहायला मिळतं. प्रेम भावनेविषयी त्यांनी मांडलेलं तत्वज्ञान मोहरून टाकल्याशिवाय राहत नाही. प्रेमाच्या ओलाव्याशिवाय असलेलं आयुष्य रंगवताना अनसूयेने आपल्या भावाला (मनोहरला) लिहिलेल्या पत्रातल्या या ओळी- 

“तळ्यात कितीही पाणी असलं, तरी ते साठवलेलं असतं. नदीच्या वाहत्या पाण्याची – मग ते गुडघाभर का असेना त्याला सर यायची नाही. माणसाचं आयुष्य ही नदी आहे; तळं नाही” 

आपणास आयुष्याचं सार सांगून जातात. भाव विश्वात घेऊन जाणाऱ्या या गूढ कथेला वेगवेगळे वळण देत लेखक एका आल्हाददायी वळणावर संपवतो आणि वाचक म्हणून आपल्याला अनेक अंगांनी समृद्ध करून टाकतो.

केवळ एकशे बावीस पानांचं हे पुस्तक जगाकडे, माणसांकडे पाहण्याचा आगळावेगळा दृष्टीकोन, माणसाच्या भावविश्वात घडणाऱ्या नाजूक घडामोडींमुळे होणारी संक्रमणे आणि प्रेमा सारख्या उदात्त, उत्कट भावनेला समजून घेण्याची एक नवी दिशा देऊन जातं. कोणीही वाचावं आणि त्यातच दंग होऊन जावं असं हे “पहिले प्रेम” वाचताना तुम्ही देखील तुमच्या विश्वात हरवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र खरं!

pahile prem girish kharabe v s khandekar mehta vishnu sakharam


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:




संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *