लेखक – ख़ालेद हुसैनी
समीक्षण – गुंजन
प्रकाशक – ब्लूम्सबरी
पृष्ठ – ३७२
मूल्यांकन – ४ | ५
अनेक कथा न्याहाळत चालत असताना, आयुष्यात काही कथा जणू आपल्या अनुभवाचाच भाग असाव्यात इतक्या खोल रुजतात. ‘काईट रनर’ हि त्याच अनुभावांपैकी एक, असं म्हणनं वावगं ठरणार नाही. प्रेम, असूया आणि पश्चातापाची हि कथा, अगदी पहिल्या पानापासून वाचकाला धरून ठेवते.
हि कहाणी आहे आमिर आणि हसनची. दोघेही जिवाभावाचे मित्र, मित्र कशाला भाऊच म्हणा ना! काबूलमध्ये राहणाऱ्या सर्वच लहान मुलांप्रमाणे ह्या दोघांनाही ह्यावर्षी पतंगोत्सवात जिंकायचं आहे. ह्याच पतंगोस्तवापासून कथा एक वेगळं आणि अकल्पित वळण घेते. नात्यांमधली गुंतागुंत, प्रेमासाठीची धडपड आणि स्वतःशी असलेली भांडणं; सारंच उघड्यावर पडतं. अफगाणिस्तानमधील जातीय वादाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा कॅनवास हाती घेऊन, लेखकाने त्यावर आमिर आणि हसनची आयुष्यं चितारली आहेत.
आमिर आणि त्याच्या वडिलांचं नातं थोडं अस्थिर आहे. त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी, त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी आमिर प्रयत्न करताना दिसतो आणि अशाच एका प्रयत्नात, त्याच्यावर स्वतःहूनही अधिक प्रेम करणारा, त्याचा जिवाभावाचा मित्र; हसन विनाकारण बळी पडतो. त्यातच युद्धजन्य परिस्थितीमुळे आमिर आणि त्याचे वडील अमेरिकेला निघून जातात. तिथे त्यांचं आयुष्य स्थिरस्थावर होतं खरं पण हसनवर केलेल्या अन्यायाची खंत आमिरला आतून पोखरायला सुरुवात करते. पश्चातापाच्या शोधात तो परत अफगाणिस्तानला येतो आणि त्याच्या समोर उभं राहिलेलं सत्य त्याला अवाक करून जातं.
लेखकाने कथेची बांधणी आणि उकल इतकी सुंदर केलीये कि पुस्तकापासून एक क्षण हि दूर राहवत नाही. राजकारण असो, धर्मकारण असो किंवा वैयक्तिक स्वार्थ असो ख़ालेद हुसैनी यांनी सगळ्याच गोष्टींना कथेत अलगद गुंफलं आहे. आमिरच्या दृष्टिकोनातून कथेकडे बघत असताना आपण कधी आमिरचे होऊन जातो कळतच नाही. हीच लेखकाची किमया आहे, त्याने शोधलेली पात्र इतकी प्रभावशाली आहेत कि पुस्तकाचा उल्लेख जरी झाला तरी आपल्या डोळ्यासमोर निरागस हसन ती पतंग घेऊन उभा राहतो आणि म्हणतो ‘फॉर यु, अ थाऊजंड टाइम्स ओव्हर’.
लेखक म्हणतो कि सगळ्यात मोठं पाप आहे ‘चोरी करणं’ आहे. मला विचाराल तर तुमच्या आणि माझ्यामध्येही एक चोर लपलेला आहे. कधी भेटला आहात त्याला? भेटायचं असेल तर नक्की वाचा ‘द काईट रनर’.
समीक्षण – गुंजन
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ