bangarwadi marathi book review cover

बनगरवाडी

पोस्ट शेयर करा:

लेखक – व्यंकटेश माडगूळकर 

प्रकाशक – मौज प्रकाशन गृह 

पृष्ठसंख्या – १३०

मूल्यांकन – ४.८ | ५

बाह्यजगाशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या, तो असावा याची जराही तसदी न घेणाऱ्या, आपल्या मेंढ्यांची खांड वाढविण्यात व त्या जोगविण्यासाठी रानोमाळ भटकून मावळतीला घरी परत घेऊन येणाऱ्या मेंढकांची (धनगरांची) कथा आपल्याला बनगरवाडी या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकातून वाचायला मिळते. नुकतीच सातवी पास झालेल्या एका पोरसवदा माणसाची मास्तर म्हणून बनगरवाडीत नेमणूक होऊन कथेला सुरवात होते. पाच पस्तीस घरांच्या वाडीत शाळा चालवण्याचं महादिव्य मास्तर  कसं पेलतो? गावाचा विश्वास मिळविण्यात मास्तर कसा यशस्वी होतो? याची सुयोग्य मांडणी लेखकाने बनगरवाडीतून केली आहे. कुठेही रटाळ न वाटणारी ही कथा वाचकाला अनेक ठिकाणी खिळवत ठेवत पुढे पुढे जात राहते.

पोटासाठी अन पोटापूरत्याच लहान सहान चोऱ्या करणारा आनंदा रामोशी, ज्याचा कोणीही नाही व ज्याला झोपण्यासाठी ना छप्पर हवं असतं ना जमीन असा आयबु मुलाणी, मास्तरवर डोळे झाकून विश्वास ठेवणारा व त्याच्याकडून बंद पडलेल्या रुपयाची मोड घेणारा रामा बनगर, वयाने थकलेला असून देखील गावचा कारभार रितसर हाकणारा म्हातारा कारभारी आणि गावात टगेगिरी करत फिरणारा बालट्या अशा एक ना अनेक पात्रांना आपण बनगरवाडीतून भेट देतो. बंद पडलेली गावाची शाळा पोरं गोळा करून मास्तर कशी सुरू करतो? तालुक्याला जाऊन सगळ्या वाडीची कामे कशी त्याला करावी लागतात? वाडीतल्या सगळया गोष्टींमध्ये मास्तरच्या शब्दाला वजन कसं प्राप्त होत जातं? हे वाचत असताना वाचक आपोआपच वाडीचा एक सदस्य होऊन जातो. आपल्याच भन्नाट कल्पनेतून गावासाठी तालिमीची इमारत बांधताना मास्तरला करावी लागलेली धडपड, आपापल्या परीने गावकऱ्यांनी त्यासाठी लावलेला हातभार आणि त्याच उदघाटन करण्यासाठी बनगरवाडीत येणारा राजा हा सगळा प्रवास लेखकाने उत्तमरीत्या रंगवला आहे. 

ऐन तारुण्यात एकट्याच्या जीवावर लांडगा मारणाऱ्या सता नावाच्या विद्यार्थ्याची अचानक एक दिवस शाळा बंद होऊन; एकतरी विद्यार्थी तालुक्याला पाठविण्याची मास्तरांची महत्वकांक्षा धुळीस मिळते. मास्तरने पुष्कळ समजावून देखील त्याचा बाप त्यासाठी तयार होत नाही यावरून वाडीतल्या धनगरांचा शिक्षणाबद्दल असणारा दृष्टिकोन लेखक दाखवून देतो. मास्तरच्या वाईटावर टपून असलेल्या बालट्याला कोणामुळे अंथरून धराव लागतं? एक हंगाम पाऊस न झाल्याने सुखसंपन्न वाडीची काय दशा होते? घर दार सोडून अनेक धनगर देशोधडीला का लागतात? आणि या सगळ्यात शाळा चालवणाऱ्या मास्तरचं नक्की पुढे काय होत असावं? हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचनच जास्त उचित ठरेल. प्रसंगवर्णन करताना जे बारकावे माडगूळकरांनी मांडले आहेत ते अवर्णनीय आहेत. तसेच भाषेचा जो लहेजा त्यांनी पुस्तकाच्या सुरवातीपासून शेवटापर्यंत टिकवून ठेवला आहे तो वाचक म्हणून आपल्याला पुस्तकाशी व कथेशी सतत बांधून ठेवण्यात यशस्वी होतो.

एक हलकी फुलकी, धनगरांच्या आयुष्याबद्दल, बनगरवाडीबद्दल सहानुभूती जागृत करणारी ही कथा नक्कीच वाचण्यासारखी आहे. आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन अनेक वळणांवरती कसा बदलत जातो हे बनगरवाडी आपल्याला शिकवून जाते. त्यातील अनेक पात्र समाज जीवनात जगत असताना आपण पाहत असतो वा कैकदा आपणही त्याचाच एक भाग असतो. त्यात सकारात्मकताही असते व नकारात्मकताही असते. मात्र आयुष्याच्या टप्प्यावर पुढे पाऊल टाकत असताना आपल्याला ज्याची मदत होते; ती फक्त सकारात्मकताच असते असा बोध मला तरी बनगरवाडीने दिला. तुम्हाला तो मिळेल कि नाही हे जाणण्यासाठी एकदा बनगरवाडी वाचून तर बघा!

bangarwadi vyanktesh madgulkar mauj girish kharabe


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/2161/bangarwadi—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

4 Comments

  • सहजता म्हणजे काय हे बनगरवाडी कादंबरी वाचल्यानंतर समजते. व्यंकटेश माडगूळकर ह्यांनी आपल्या मोठ्या भावाकडून (म्हणजेच गदिमा) लेंगरवाडी ह्या धनगर वस्तीबद्दल ऐकलं आणि त्यांनी त्यातील काही प्रसंग घेऊन हि सुंदर कादंबरी लिहून काढली. हे त्यांनी आपल्या एका सोलापूरच्या कार्यक्रमात भाषण केले तेव्हा सांगितलं होत.

    हि कथा साधारण १९३८ ह्या काळाची आहे. कथा एक शिक्षक आणि गावकरी ह्यावर रेखाटली गेली. बनगरवाडी ह्या गावात एक शिक्षक जवळच्या गावातून हा आलेला असतो. नुकताच सातवी पास झालेला हा तरुण. गावात गेल्यावर गावकरांशी ओळखी होतात तो त्यांना शाळा चालू करायचं म्हणून सांगतो. आणि एका खोलीत शाळा चालू होते. वाडीतील बरेच लोक मास्तर ला मानत असत आणि तो सर्वाना मदत करणारा होता.

    गाव धनगरांच होत गावात बरेच लोक हे मेंढीपालन करणारी होती आणि त्यांचा रोजगार हि त्यावर अवलंबून असे. सर्वांची दिनचर्या हि सारखीच सकाळी सूर्य उगवायला आलं कि उठणे मेंढ्या घेऊन रानात जाणे आणि संध्याकाळी परत येणे. जेवण झाल्यानंतर ह्या लोकांची पारावर रोज बैठक भरत आणि तंबाखू, सुपारचा खांड खात गप्पा बरेच वेळ रंगत असत. पावसाळी बरेच लोक शेती करत आणि वर्षभर पुरेल इतकं धान्य पिकवत असत.

    माडगूळर यांचं खर गमक हे ग्रामिक व्यक्तिरेखा ठळक आणि जिवंतपणे वठवण्यात आहे, त्यामुळे कथा हि जिवंत वाटते. बनगरवाडीत त्यांनी चितारलेली कारभारी, आनंदया, आयबु असे बरेच लोक हे जीवन वाटतात त्यांच्यामध्ये असेलेला निरागसपणा दिसून येतो. आणि हेच बनगरवाडीला विशेष बनावत.
    मास्तर यांच्या मनात गावात एक तालीम बनवावी असं वाटत आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो आणि कथेचा हा भाग सुद्धा लेखकाने छान रंगवलं आहे त्यात गावकरांचे विविध रूपाच दर्शन होत. त्यापुढे घडणारी घटना हि विलक्षण आहे.

    बघता बघता गावात दुष्काळ येत आणि पूर्ण गाव विस्कटून जात आणि राहत ते फक्त उजाड आणि ओसाड पडलेली घर.

    पुस्तकात बरेच रेखाचित्र आहे ते ह्या कादंबरीला अजून विशेष बनवत. एकाच बैठकीत वाचून काढता येणारी हि कादंबरी एकदा प्रत्तेक वाचकाने हातात घेतलीच पाहिजे.

    • होय,खूप सुंदर कादंबरी आहे

  • #बनगरवाडी:

    अनेक लोक म्हणतात “मी उडत्या पाखरांचे पंख मोजणारा आहे!! मला नको शिकवू…”

    मी आत्ताच बनगरवाडी वाचलं.. मला सांगण्याचा मोह आवरत नाहीये.. हा माणूस उडत्या पाखरांच्या पंखांचे तर सोडाच, त्या एका एका पंखांवरचे केस सुद्धा मोजू शकतो यावर माझा विश्वास बसलाय!!

    जब्बरदस्त प्रसंगवर्णन, बारीक सारीक गोष्टींचे उत्तम जाणकारी आणि यासोबतच किंबहुना इतकं असून देखील यत्किंचितही कथेला धक्का नाही! कथा तशीच पुढेही जाते आणि आणि सावलीप्रमाने सोबतही देते!!

    -© अक्षय सतीश गुधाटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *