लेखक – द. मा. मिरासदार
पृष्ठसंख्या – १६०
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मूल्यांकन – ३.५ | ५
मिरासदार हे एका वेगळ्या घाटणीचे लेखक. हलके फुलके विनोद तरी काहीसं नवीन शिकता येईल असं लेखन. मिरासदारांच्या अनेक गंमतीशीर पुस्तकांपैकी हे एक खास आवडीचं . भोकरवाडीच्या गोष्टी म्हणजे भोकरवाडी या गावात घडून गेलेल्या काही मजेशीर गोष्टी. २०११ साली हे पुस्तक मी वाचलं आणि त्या नंतर कित्येकवेळा कंटाळा आला कि एखादी ह्यातली गोष्टी वाचून चेहऱ्यावर हसू नाही आले तर विशेष च म्हणावे.
१४ मजेदार प्रसंगांच्या १४ गोष्टी असा या पुस्तकाचा आराखडा आहे. साधारण पहिल्या २-३ गोष्टींमधून संपूर्ण गावाची कल्पना आपल्याला येते आणि विविध पात्रांची ओळख सुद्धा होते. एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्याला सगळी पात्र खिळवून ठेवतात आणि एक आपुलकीचे भाव निर्माण होतात. छोट्या गावाची गोष्ट असल्यामुळे या पुस्तकाची भाषा ग्रामीण च आहे. गावाचे सरपंच, काही मोठी माणसं , पारावार चकाट्या पिटणारे तरुण, नवऱ्याला कटकट करणाऱ्या मजेशीर बायका आणि काही लहान मुलं अशा सगळ्या प्रकारच्या पात्रांचा समावेश पुस्तकाची मजा वाढवतो .
गोष्टी अगदी सध्या आहेत आणि त्या लिहल्या सुध्या तितक्याच साधेपणाने आणि त्यातच त्याची खरी मजा आहे. गावात झालेली मारामारी अगदी साधी पण ती सुद्धा सगळ्या पात्रांच्या समावेशाने अधिक रंजक कशी करता येईल हे मिरासदार च करू शकतात. उगीचच पारावरच्या गप्पांमधून अफवा पसरून सगळ्या गावाची झोप उडवणाऱ्या काही गोष्टी माझ्या विशेष लक्षात आहेत ते त्याच्या मांडणीमुळे.
सगळ्या गोष्टी वाचेपर्यंत प्रत्येक पात्रांविषयी आपलं काही मत होऊन जातं आणि त्यांच्या अडचणी आपल्याला आपल्या वाटू लागतात. आता ‘हि कसा करेल हे?’ किंवा ‘ह्याला सापडेल का ते?’ असे प्रश्न आपोआप गोष्टीची रंगत वाढवतात . साधारण गावाची राहणी, तिथल्या काही विशिष्ठ सवयी ह्यांचा हुबेहूब वर्णन मिरासदारांनी केलेलं आहे आणि ती या पुस्तकाची जमेची बाजू म्हणूयात.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या शहरी आयुष्यात हि गावाच्या गोष्टींची विनोदी सांगड घातली तर नक्कीच एक आनंदी आयुष्याची सुरुवात होईल. कधीतरी सध्या सरळ आणि सोप्प्या गोष्टी वाचून मन शांत होतं असा म्हणतात आणि हे पुस्तक नक्कीच त्यासाठी मदत करेल अशी माझी खात्री आहे. तर मिरासदारांच्या वाचक संघात प्रवेश करून ह्या गंमतीची साक्षीदार व्हा आणि अखंड हसत राहा !
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ