लेखक – जयवंत दळवी
पृष्ठसंख्या – ११२
प्रकाशन – साकेत प्रकाशन
मुल्यांकन – ४.५ | ५
आपण सहज एखादं पुस्तक उचलतो; कधीही न पाहिलेलं, न ऐकलेलं. त्या पुस्तकाचं नावही तितकच अनोळखी आणि अर्थ न कळणारं! त्यात त्याच्या मलपृष्टवरूनही त्या पुस्तकात काय असेल हे न समजणारं! आणि असं असून सुद्धा ते पुस्तक आपल्याला भावतं, आपलंसं वाटतं आणि छोटच आहे, बजेटमध्ये आहे असं म्हणून जास्त चिकित्सा न करता आपण ते पुस्तक घरी घेऊनही येतो आणि जेव्हा आपण ते पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला कळतं की, एवढ्या पुस्तकांच्या गर्दीत का ह्याच एका पुस्तकाने आपल्याला खुणावलं होतं; आणि हे सगळं माझ्या बाबतीत घडलं ते म्हणजे ‘एदीन’ ह्या पुस्तकामुळे !
एदीन…! हा सोप्पा पण अवघड गोष्टी सहज सांगणारा, साधा पण माणसातला व त्यांच्या आयुष्यातला विचित्रपणा स्पष्ट करणारा, आणि छोटा पण मोठं काहीतरी मनात रेंगाळत ठेवायला देणारा जयवंत दळवी ह्यांचा एक छोटा कथासंग्रह! एदीन हि ह्या पुस्तकातली पहिली आणि मला सर्वात जास्त आवडलेली कथा. आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळणारी आणि मुखपृष्टावर जिचं चित्र रेखाटलय त्या मुलीची म्हणजेच एदीनची हि प्रेमकथा.
व्यक्त करूनही आपल्या भावना समोरच्याला न कळणाऱ्या ह्या आजच्या काळात आपली ‘अव्यक्तता’ कळणारं कोणी असू शकतं हि हवीहवीशी पण आज सहज न मिळणारी जाणीव हि पहिलीच कथा आपल्याला देते आणि मनात घर करून जाते. फक्त पहिलीच नाही तर पुस्तकातल्या १३ ही कथा आपल्या मनात स्वतंत्र असं स्थान निर्माण करतात आणि त्यांच्या प्रेमात पडतात. एकंदरीतच ह्या पुस्तकातल्या प्रत्येक कथेतून जयवंत दळवी ह्यांनी माणसाच्या आयुषातल्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या प्रेमाच्या जाणीवा प्रचंड ताकदीने आणि सहजपणाने रेखाटल्या आहेत.
ह्या पुस्तकातली प्रत्येक कथा आपल्यलाला एक प्रकारची हुरहूर लावून जाते. कधी हवीहवीशी तर कधी नकोशी वाटणारी हुरहूर, कधी मजेशीर तर कधी अस्वस्थ करणारी हुरहूर, कधी हतबल करणारी तर कधी स्तिमित करणारी हुरहूर. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक कथा आपल्यात एक नवीन जाणीव निर्माण करून जाते आणि लेखकाला आपल्या जवळ पोहचवते.
फक्त ११२ पानांचं हे पुस्तक एकदा तुम्ही हातात घेतलत तर पूर्ण वाचल्याशिवाय तुम्हाला ते खाली ठेवावं वाटणार नाही एवढं मात्र नक्की. तेव्हा “सध्या वेळ नाही” किंवा “पुस्तक घ्यायला पैसे नाही” अशा सबबी सांगून पुस्तक न वाचणार्यांसाठी हे पुस्तक एक उत्तम उपाय ठरू शकतं. तेव्हा झटपट वाचून होणारं हे पुस्तक पटकन मिळवा आणि नक्की वाचा. आणि हो! हा पुस्तक परिचय तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: