man me hai vishwas marathi book review cover

मन में है विश्वास

पोस्ट शेयर करा:

लेखक – विश्वास नांगरे-पाटील

समीक्षण – नितिश पारकर

पृष्ठसंख्या – २०४

प्रकाशन – राजहंस प्रकाशन

मुल्यांकन – ४ | ५

मन में है विश्वास हे पुस्तक वाचण्याआधी विश्वास नांगरे-पाटील यांची जुजबी ओळख एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून होती. जरी त्यांचे अनेक व्हिडिओस यूट्यूब वर उपलब्ध असले तरी ते काही पहिले नव्हते. केवळ एका सुप्रसिद्ध पोलीस अधिकाऱ्याविषयी असलेल्या कुतूहलापोटी हे पुस्तक वाचावयास घेतले आणि या पुस्तकानेही निराश केले नाही.

बहुतांश पुस्तक हे त्यांचे बालपण ते IAS अधिकारी या प्रवासाबद्दल आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर ही गोष्ट आहे वारणेच्या काठावर उमललेल्या एका रानफुलांने परिस्थितीशी दोन हात करून UPSC चे तख्त भेदले त्याची. एका लहानश्या खेडेगावात गेलेले बालपण, तरुणपणी शिक्षणांनिमित्त कोल्हापूर-मुंबई सारख्या शहरात केलेला संघर्ष, ते देशातील अतिशय खडतर अशा परीक्षेत संपादन केलेले यश, असा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे इंग्रजी सुधारण्यासाठी करावे लागलेले प्रयत्न, शहरात, विशेषत: मुंबईत, राहण्यासाठी केलेली खटपट, UPSC व MPSC ची तयारी, आणि त्यासाठी घेतलेले परिश्रम यांचे विस्तृत वर्णन या पुस्तकात आहे. प्रसंगी बोलणी खाऊन, अपमान झेलून, खचून ना जाता आलेल्या परिस्थितीशी सामना करून पुढे कसे यायचे ह्याचीही बरीच उदाहरणे या पुस्तकात मिळतात.

पोलीस दलात त्यांनी आतापर्यंत अनेक मोहिमांचे नेतृत्व केले असले तरी त्यातील सर्वात महत्त्वाची, ज्यासाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले, अशी कामगिरी म्हणजे २६/११ च्या हल्यात दहशतवाद्यांशी केलेला सामना. ताजमधील त्यांच्या कारवाईचे थोडक्यात वर्णन या पुस्तकात वाचावयास मिळते. पोलीस सेवेत समाजातील विविध घटकांशी आलेला संबंध व त्यावरून हल्लीची सामाजिक परिस्थिती, तरुणाईची जीवनशैली अशा विविध विषयांवर त्यांनी केलेले भाष्य विचार करण्यास प्रवृत्त करते.

संपूर्ण पुस्तक गंभीर आहे असे नाही. आपल्या या प्रवासातील हॉस्टेलवरच्या आणि मित्रांसोबतच्या गंमतीजंमतींचे अनेक किस्से त्यांनी मांडले आहेत. त्यातील सामंथाचा किस्सा तर बराच मजेदार आणि त्यांच्या चातुर्याची पावती देणारा आहे. किशोरवयातील प्रलोभनांपासून ते अलिप्त होते असेही नाही. कधी कधी चुकीचा मार्ग पकडला गेला याची प्रांजळ कबुलीही दिली आहे. पण त्यांच्या सुदैवानं वेळोवेळी कानउघाडणी करणारी माणसे भेटली आणि गाडी रुळावर राहिली.

सुरुवातीला पुस्तक थोडं आत्मकेंद्रित वाटलं. बऱ्याच ठिकाणी ‘motivational quotes’ चा सढळ वापर केला आहे तेही थोडं खटकलं. पण जसजसं त्यांचं आयुष्य उलगडत जात तसतसं ह्या सर्वांचा विसर पडतो, आणि आठवणीत राहते ती फक्त घेतलेली मेहनत आणि दाखवलेली जिद्द. जर तुम्हाला आत्मचरित्रे वाचायची आवड असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. UPSC किंवा MPSC ची तयारी करत असाल तर जरूर वाचा.

समीक्षण – नितिश पारकर

man me hai vishwas nangare patil ips nitish parkar rajhans


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/6746/man-main-hai-vishwas-vishwas-nangare-patil-rajhans-prakashan-buy-marathi-books-online-at-majesticreaders-9788174349620″]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *