लेखक – रस्किन बॉण्ड
समीक्षण – अभिषेक गोडबोले
पृष्ठसंख्या – १७८
प्रकाशन – पेंग्विन बुक्स
मूल्यांकन – ४.९ | ५
रस्किन बॉण्ड…लालसर गोरा चेहरा,गुबगुबीत शरीरयष्टी आणि निळ्या मिश्किल डोळ्यांचा! डोळ्यातला मिश्कीलपणा त्याच्या लिखाणात जागोजागी असतो आणि प्रत्येकवेळी तेवढीच मजा देऊन जातो! रस्किनचं वयवर्ष जवळपास पंच्याऐंशी तरी असेल तरीपण त्याचा उल्लेख एकेरीच करावासा वाटतो, हा त्याचा अवमान अजिबात नाही तर त्यानं त्याच्या प्रेमळ पण खट्याळ व्यक्तिमत्वातून आणि लिखाणातून अनेक पिढ्यांशी साधलेली जवळीक आहे!
आयुष्यातला अत्यंत महत्वाच्या अश्या पहिल्या एकवीस वर्षांपर्यंतचा प्रवास लेखकानं या पुस्तकात लिहिलेला आहे. हि वर्ष यासाठी महत्वाची कारण याच काळात कधीतरी तो पहिल्यांदा प्रेमात पडला, याच काळात त्यानं आपण लेखकच व्हायचं हे ठरवलं आणि याच काळात त्यानं आपण कायम याच देशात आणि या देशाचा नागरिक म्हणून राहायचं हेही ठरवलं! आता हे का ठरवलं आणि या सगळ्याला कुठल्या घटना,कुठल्या व्यक्ती कारणीभूत ठरल्या हे कळायला तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल!
मराठी माध्यमात शिकलेल्या प्रत्येकाला इंग्लिश वाचायची विनाकारण भीती वाटते, हि भीती घालवण्यासाठी आणि इंग्लिश वाचायला सुरुवात करण्यासाठी रस्किन बॉण्डसारखं सोपं आणि तरीही समृद्ध इंग्लिश लिहिणारा लेखक शोधून सापडणार नाही!
‘ द रूम ऑन द रूफ’ हि रस्किनची पहिली कादंबरी. त्या कादंबरीमधली कथा जिथं घडते ती जागा,त्या कथेतल्या पात्रांशी साम्य असलेल्या रस्किनच्या आयुष्यातल्या व्यक्ती असं सगळं आपल्याला या पुस्तकात बघायला मिळतं. ‘द रूम ऑन द रूफ’ त्यानं लिहायला सुरुवात केली तेव्हापासून ते ती छापून आली तिथपर्यंतच्या प्रवासात त्याला आलेले अनेक अनुभव यामध्ये आहेत.
रस्किन त्या कादंबरीचा,त्यातल्या पात्रांचा,त्यांचा खऱ्याखुऱ्या व्यक्तींशी असलेल्या संबंधांचा उल्लेखसुद्धा करतो. रस्किनला काही कारणांमुळं आलेल्या एकटेपणातून वाचनाची आणि त्यानंतर लिहिण्याची निर्माण झालेली आवड, त्याचं आणि त्याच्या वडिलांचं एक खूप छान, हळवं नातं या सगळ्याचे अनेक किस्से आणि गमतीजमती या पुस्तकात आढळतात.साधारणतः एकोणीसशे त्रेचाळीसच्या काळातून सुरु होऊन पुढील अनेक वर्षांचा आढावा रस्किन यामध्ये घेतो.
एखादी ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा मागं वळून पाहत आपल्या भूतकाळाबद्दल लिहिते आणि त्यातही ती व्यक्ती स्वतः एक लेखक असेल तर ते लिखाण उपदेशात्मक होण्याची सहज संभावना असते पण इथं अपवाद हा आहे कि हि व्यक्ती आहे ‘रस्किन बॉण्ड’ आणि त्याचं लिखाण उपदेशात्मक कधी होऊच शकत नाही आणि त्यामुळं त्याच्या इतर लघुकथांप्रमाणं,भयकथांप्रमाणं हेही लिखाण तेवढीच मजा देऊन जातं.
या पुस्तकातली त्यानं लिहिलेली पत्रं खरंच वाचण्यासारखी आहेत. त्यानं आपल्या वडिलांना लिहिलेलं पत्र तर अगदी प्रत्येकानं वाचायला हवं असं मला वाटतं!
त्या काळात त्यानं आपल्या डायरीत लिहिलेल्या नोंदीही या पुस्तकात आहेत.ते वाचून रस्किन हा लेखक म्हणून यशस्वी होणारच होता हि खात्री आपल्याला पटते.
या पुस्तकात मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकरणाला दिलेली नावं! ती नावं वाचूनच प्रकरणाबद्दलची उत्सुकता वाढत जाते.जे पुढं जाऊन लेखक होऊ इच्छितात त्यांना उत्तम मांडणी,सोपी भाषा,शब्दांची निवड अशा अनेक गोष्टी यातून शिकता येतील.
एक उत्तम लेखक कसा तयार होतो हे जाणून घेण्यासाठी एकदा तरी हे पुस्तक नक्की वाचायला हवं!
समीक्षण – अभिषेक गोडबोले
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ