blogchya-aarshapalyad-marathi-book-review-cover

ब्लॉगच्या आरशापल्याड

पोस्ट शेयर करा:

लेखिका – मनस्विनी लता रवींद्र 

समीक्षण – गुंजन

प्रकाशन – शब्द पब्लिकेशन 

पृष्ठसंख्या – १३६

मूल्यांकन – ४. ३ । ५

खरं पाहिलं तर लेखकाची आणि आपली ओळख हि त्याचा किंवा तिच्या लेखणीतून होते. मनस्विनीची ओळख झाली ती मात्र तिच्या विचारांतुन आणि मी अक्षरशः तिच्या प्रेमात पडले. गैरसमज नको, तिचं लिखाण उल्लेखनीय आहे; त्याविषयी लिहीनच पण त्याआधी तिच्यातल्या माणसाबद्दल थोडं… काळानुसार होणारे बदल स्विकारुन सगळेच स्वतःला नवीन विचारसरणीचे समजत असतात पण खऱ्या अर्थाने पुरोगामी म्हणावं अशी माणसं कमीच, माझ्या आयुष्यात तर नाहीच म्हणावं लागेल. मनस्विनीशी तशी कधी भेट झाली नाही, पण तिने लिहिलेले लेख असो, सिनेमे असो, मालिका असो, नाटक; पुस्तक वा दोन ओळींचा संवाद असो, तिच्या विचारसरणीतला तो पुरोगामी माणूस स्वतःच अस्तित्व ठामपणे मांडतोच! आणि हीच गोष्ट मला ह्या पुस्तकापर्यंत घेऊन आली.

हा कथासंग्रह म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यातून टिपलेले असामान्य क्षण आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्याच कथेत भेटणारी मळक्या पायांची मुलगी! कथेच्या नायकाला ही ट्रेनमध्ये भेटते. तिचा एकूण अवतार पाहून नायक तिच्याबद्दल काही अंदाज बांधतो. आता हे अंदाज तिच्यापेक्षा त्याच्या जगातून येणं हे लेखिकेचं कौशल्य. नायक असेच इमले रचत असताना एक घटना त्याला खाडकन भानावर आणते. पाहिलं तर ह्यात काय विशेष? पण ह्या छोट्या गोष्टीतून माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कल्पनांमध्ये रमण्याची खोड, दिखाव्याचा चांगुलपणा आणि समाजाने दुबळी केलेली विवेकबुद्धी इत्यादी बाबी समोर येतात. ह्या कथासंग्रहातील प्रत्येक गोष्ट घटनेच्या एकतर्फी मांडणीने सुरु होते आणि हळूहळू लेखिका त्या घटनेशी जोडले गेलेले सर्व पैलू उलगडत जाते. पण असं करत असताना कोणताही विचार आपल्यावर लादला जात नाही, तुमच्या मताला आकार घेता यावा यासाठी लेखिका पुरेशी जागा सोडून जाते.

वेगवेगळी पात्र, त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची प्रतिक्रिया आणि स्वतःशी असलेली भांडणं खूप सहज आणि सोप्या भाषेत मांडलेली आहेत. लेखिकेची हीच खासियत आहे असं मला वाटतं, कारण उगाच मोठ्ठाले शब्द वापरून अर्थाचा बळी घेण्याचं पाप लेखिका करत नाही. तिची कलेवरची मजबूत पकड तिच्या शब्द निवडीतून आणि वाक्य रचनेतून दिसून येते. ह्या कथासंग्रहासाठी मनस्विनीला ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ हि मिळाला आहे. दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, चहा आणि बनमस्का अशा मालिका, ती सध्या काय करते, रमा माधव सारखे सिनेमे, अमर फोटो स्टुडिओ, सिगारेटस अलविदा ही नाटकं इत्यादी आणि अजून बऱ्याच कथा – पटकथाना तिने आकार दिला आहे.

आजचं मराठी साहित्य वाचायचं असेल आणि आपल्या समाजमान्य पूर्वग्रहांना एकदा पडताळून पाहायचं असेल तर नक्की वाचा ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’.

समीक्षण – गुंजन

blogchya aarshapalyad manaswini lata ravindra gunjan thoravat shabd


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/8018/blogachya-aarashapalyad—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *