लेखक – सुरेश खेडेकर
समीक्षण – गुरुदत्त वाकदेकर
प्रकाशन – ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठसंख्या – १७०
लेखक सुरेश खेडेकर यांचे “डोहमृग” हे पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण झाले. ग्रंथालीने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह रोचक आणि वाचनीय झाला आहे. त्यास सतिश भावसार यांचे अप्रतिम मुखपृष्ठ लाभले आहे. एक वाचक म्हणून मला या पुस्तकाबद्दल जे वाटले ते मी आपल्यापुढे मांडत आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून आपल्याला जो टवटवीतपणा आकर्षित करतो, त्याच मुखपृष्ठावरूनच आत काय आहे, याची पुसटशी कल्पना येऊ लागते. “डोहमृग” म्हणजे खोल पाण्याने भरलेली भयाण काळोखात लपलेली एक विहीर. कुठेतरी जंगली वन्यप्राण्यांच्या अधिवासात दुर्लक्षलेल्या लतावेली आणि वृक्षांच्या गुंत्यात अडकलेल्या माणसांच्या रितेपणाची चाहूल देणारी गूढता खेडेकरांच्या या कथांमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे लेखक कोणत्याच नात्याला चांगलं किंवा वाईट हे लेबल लावत नाही, उलट प्रत्येक नात्यांत चांगली वाईट माणसं असतात, हे प्रभावीपणे दर्शवतात. नाती वाईट नसतात, तर ती नाती निभावणारी माणसं नात्यांना चांगलं किंवा वाईट बनवत असतात.
“डोहमृग” कथासंग्रहात नऊ कथा आहेत. प्रत्येक कथेत एक पात्र आपल्याशी बोलून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या, जीवनाला कलाटणी देणाऱ्या काही घटना सांगून, त्या त्या घटनांत त्यांनी कसा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्यात त्यांचं “काय चुकलं?” किंबहुना “काही चुकलं का?” हा प्रश्न आपल्याला विचारतात. अर्थात त्यांना आपल्याकडून “नाही! तुमचं चुकलं नाहीच!” अशी दिलासादायक सहानुभूतीची थाप पाठीवर हवी असते, हे मात्र नक्की!
खेडेकरांच हे पहिलं पुस्तक असूनसुद्धा अप्रतिम आणि वाचनीय झालं आहे. या कथासंग्रहाची जातकुळी भिन्न आहे. स्त्रीच्या रुपरेखा दर्शविणाऱ्या, स्त्रीच्या सौंदर्याच्या, निर्मळतेच्या स्वप्नाळूपणाविषयी, तसेच तिच्या अप्रतिम लावण्याविषयी आपल्या कथांमधून खेडेकर अवतरतात; तेव्हा त्यांनी काय काय अनुभवलंय याची साक्ष पटते. तसं पाहिलं तर या कथांमधून स्त्रीयांची दुःखे खेडेकर रेखाटतात. स्त्रीयांना घडलेला वनवास त्यांच्या प्रत्येक कथेतून प्रतिबिंबीत होतो. या कथा काल्पनिक असल्या तरी वास्तवाशी सांगड घालणाऱ्या आहेत. त्या कथा खेडेकरांच्या ठाई ठाई प्रत्ययाला आलेल्या अनुभवांच्या साक्षीदार आहेत. यातील प्रत्येक कथेत प्रेमालिंगनाचे विविध अनुभव आणि पुरावे आलेले आहेत. या संग्रहातील कथात्व माणसाच्या विषेशत: स्त्रीच्या सुख – दुःखाबद्दलचे अनेक पदर संयतपणे उलगडताना दिसून येतात. काही कथांमध्ये पात्रांच्या संपूर्ण आयुष्यात घडलेल्या घटना आहेत, तर काहींमध्ये आयुष्यातील फक्त छोटे प्रसंग आहेत. यातील कथा जरी काल्पनिक आहेत तरी अशा घटना हमखास आपल्या अवतीभवती किंवा खुद्द आपल्यासोबत घडल्याचे आपल्याला नक्की प्रत्ययास येईल!
“डोहमृग” मधील कथा वाचकांस संभ्रमीत करणाऱ्या जादूई कथा वाटतात, त्यातल्या त्यात “दुर्दैवी विठाका” ही विलक्षण ह्रदयस्पर्शी कथा वाटते. स्त्रीच्या जीवनातील हास्याचे, विलापतेचे, शौर्य कर्माचे, नैराश्याचे, हतबलतेचे विलक्षण दिलखेचक कंगोरे या कथेत दिसून येतात. “नियतीचा प्रसाद” ही त्यांची पहिलीच कथा, यात कॉपोरेट कंपनीत काम करणारा चंद्रकांत कुडाळकरच्या प्रेमाचे अनुभव रेखाटले आहेत. त्यातून अनेक वर्षांचा विरह काळ आणि पुन:मिलन व एका स्त्री वंशास सांभाळण्याची जबाबदारी रोजचीच वाटते; पण चंद्रकांत कुडाळकर सारखा एक जबाबदार अधिकारी ती जबाबदारी टाळू शकत नाही. त्यापासून दूर पळून जाऊ शकत नाही. ही पुरुषाची जबाबदारी खेडेकरांनी मनापासून जपली आहे. लेखकाची प्रगल्भ जीवनदृष्टी आणि सकारात्मक संवेदनशीलता यामुळे या कथा वाचनीय आणि चिंतनीय झाल्या आहेत. तहानलेला मग पाणी तरी किती पिणार? हा प्रश्न खेडेकरांच्या प्रत्येक कथेत विचारला गेला आहे. तसेच स्त्रीने कोणासाठी जन्म घ्यावा? कोणासाठी राबावे? कोणासाठी पान्हा फोडावा? ह्या सर्व प्रश्नांनी त्यांनी वाचकांना विचार करायला भाग पाडले आहे. बाईने जगावे तरी कोणासाठी? आणि मरावे तरी कोणासाठी? या प्रश्नांची उत्तरे मात्र प्रत्येक कथेच्या आधाराने देऊन मोकळे झाले आहेत. इथे लेखक काही ठिकाणी निवेदकाची भूमिका घेऊन पात्रांशी संवाद साधतात. काही कथांमध्ये कधी दोन ठिकाणी आणि दोन भित्र काळात घडणारे प्रसंग एका आड एक गुंफत त्यांची रचना साकारते. तसेच कधी कथानक “फ्लॅशबॅक” पद्धतीने उलगडत जाते. या कथा मला खूप वेगळ्या आणि अतिशय भावनिक अशा वाटल्या. तुम्हालाही तशा नक्की वाटतील.
शल्य, अकल्पीत, अभागी, दुदैवी अशा या कथा प्रेरक, दाहक आणि नव उन्मेषशालिनी वाटतात. खेडेकरांचा भाषेचा फुलोरा फुलविण्याचा ‘पिंड’ नाही, पण काही ठिकाणी प्रतिमांचे उपयोजन केलेले आढळते. खेडेकर कोकणातल्या निसर्गाच्या सहवासात निवृत्तीचा काळ घालवत आहेत. म्हणून पदोपदी त्यांच्या साहित्यात तळी, विहिरी, सागराची गाज, केळी, कर्दळी, निर्सग आणि मानव निर्मित बहरलेल्या बागा, घरासमोरील मधुमालतीचे अंगण यात रममान झालेले आढळतात. खेडेकरांचा पानाफुलांवरील निधिध्यास मोठा असल्याने, तसेच निर्सगावरील आणि केलेल्या नोकरीवर असलेल्या प्रेमामुळे त्यांच्या या कथांमध्ये अनुभव रेखांकीत झाले आहेत. अनुभवांच्या अनुभूतीचे विविधांगी कंगोरे “डोहमृग” या कथासंग्रहात आपल्याला प्रत्ययास येतात.
“डोहमृग” हा स्त्री केंद्री कथांचा ऐवज मराठी साहित्यात अंकुरला आहे. यातील सर्वच कथा मनाला भिडतात. खेडेकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगतात म्हटल्याप्रमाणे “(स्वतःचे) अंतरंग ढवळून विचार बाहेर प्रकट करणे ही काही साधी गोष्ट नाही” आणि येथे तर खेडेकर आपल्या प्रभावी लेखणीतून “इतरांच्या” मनाला ढवळून त्यातील विचार समर्थपणे लेखणीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. कोणत्याही गोष्टीचं पाल्हाळ न लावता नेमक्या शब्दांत कथा आणि व्यथा प्रभावीपणे मांडण्यात खेडेकर यशस्वी ठरले आहेत! तर मग, तुम्ही कधी वाचताय हे पुस्तक?
समीक्षण – गुरुदत्त वाकदेकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: