लेखक – अनिल अवचट
समीक्षण – मृणाल जोशी
प्रकाशन – समकालीन प्रकाशन
मूल्यांकन – ३.५ । ५
सर्वात आधी प्रांजळपणे कबूल करतो कि अनिल अवचट यांचे ह्या एका पुस्तकांव्यतिरिक्त दुसरं एकही पुस्तक वाचलं नाही अर्थातच तो दोष माझा आहे आणि ह्या क्षणी त्याचं वाईट देखील वाटत आहे. समाजातले ज्वलंत विषयांवर अगदी पोटतिडकीने लिहिणारा लेखक, स्वतःचे लेखन साचेबद्ध न ठेवता, एका वर्तुळात किंवा एका कोष्टकात न लिहिणारा लेखक, स्वतःला वाटेल तसं लिहिणारा, स्वतःच्या अटींवर नियमांवर लेखन करणारा, कोणत्याही अडथळ्यांना न भिता त्या विषयांना सरळ भिडणारा लेखक, कलासक्त मन जपणारा, फुलात पानात वावरणारा, लहान लहान मुलांमध्ये नाचणारा गाणारा लेखक – कलावंत. हे सारं “माझ्या लिखाणाची गोष्ट” वाचताना जाणवतं. मुळात कोणत्याही वाचकाला लेखकांच्या सुरवातीपासूनच लेखन वाचायला हवे त्यामुळे लेखक कसा घडत गेला हे आपसूक समजतं, पण माझी गल्लत झाली ती अशी कि मी ह्या लेखकाचं “लेटेस्ट” पुस्तक आधी हाती घेतलं..ते एका अर्थाने बरं झालं असं म्हणायला देखील हरकत नाही, त्या मुळे त्यांची एकूण ग्रंथ संपदा कशी घडत गेली ते कळलं.
३८-३९ पुस्तकं अनिल अवचट यांची अतुलनीय अशी ग्रंथ संपदा आहे ह्या साऱ्या लिखाणाची गोष्ट ह्या पुस्तकात मोठ्या खुबीने मांडली आहे, एकीकडे इतर लेखक तत्वज्ञान – ललित लिखाण – गोडी गुलाबीने कथासंग्रह किंवा काव्यसंग्रह लिहितायेत आणि अशी पुस्तकं मुबलक प्रमाणात आपल्या चहूबाजूला उपलब्ध आहेत, अश्यावेळी अनिल अवचट वेगळ्या धाटणीच्या विषयांना हाताळताना दिसतायेत, विषय कोणताही असो त्या विषयासाठी त्यांचा कमालीचा अभ्यास दिसून येतो,अनिल अवचट यांचे लिखाण सत्यत्येशी निगडित आहे, त्या लेखांसाठी प्रचंड भटकंती करणारा हा लेखक, एका एका लेखासाठी मैलोन्मैल प्रवास करणं, त्या लोकांच्या घरात राहणं, त्याच्या संसारात – आयुष्यात डोकावणे हे फार अचाट अनुभव आहे, हे लिहायला आपल्याला सोप्प वाटत असेल तरी कृती म्हणून अत्यंत कठीण काम आहे. स्वतःच्या लिखाणात तेच तेच जुने पुचाट शब्द न घेता, जुन्या प्रकाराने विषयांची मांडणी न करता कोणी तरी आपल्याला कानात ह्या लेखांच्या गोष्टी सांगतोय असं वाचताना वाटतं.
घटनांविषयी, माणसांविषयी, प्रांताविषयी, स्वतःविषयी “ब्रॉड माईंड” ने लिहिलेले लेखन अवचटांच्या लिखाणाचा मूलभूत पाया असला पाहिजे. आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर वेगवेगळे विषय कसे सामोरी आले, कधी हमाल लोकांसाठी, कधी दलितांसाठी, कधी व्यसनी लोकांसाठी, कधी प्राण्यांसाठी, कधी स्वतःसाठी, कधी पुण्यासाठी, काही आयुष्यात आलेल्या व्यक्तींसाठी, कधी आपल्या गुरूसाठी, काही धार्मिक अंधविश्वासावर सडेतोड प्रश्न करत त्यातील मूळ हेतू सर्वांसमोर आणण्यासाठी, कधी वैश्यावस्तींच्या स्त्रियांसाठी, आदिवासी लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, स्वतःच्या कलेसाठी, आयुष्यात खूप उशिराने आलेल्या किंवा भेटलेल्या कवितांसाठी, कधी छोट्या मुलांसाठी, मुक्तांगणचे बीज कसे पेरले गेले त्यासाठी, कधी मुक्तांगणच्या सदस्यांसाठी, कधी ओरिगामी – बासरी – लाकडाच्या कलेसाठी, कधी मित्रांसाठी, कधी घरच्यांसाठी तर कधी खुद्द स्वतःसाठी अनिल अवचट यांनी अप्रतिम असं लिहिलं आहे, वेगळ्या वेगळ्या लेखांमध्ये पुस्तकांमध्ये ह्या एवढा प्रचंड आवाका लिखाणाचा, त्याहून जास्त निरीक्षणाचा – विविध लोकांशी बोलण्याचा, त्या लोकांचे सुख – दुःख जाणून घेण्याचा, त्यांच्या विवंचनांना बोलकं केलं ह्या पुस्तकांमार्फत. लेखनासाठी कुठलाही विषय वर्ज्य नसतो हे अनिल अवचट यांच्या ग्रंथ संपदांच्या आकडेवारीवरून सिद्ध होतं.
ह्या लेखांमध्ये त्या त्या काळातील राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा उत्तम आढावा घेतला गेला आहे, त्या काळातल्या अनेक लोकांच्या अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडणारे नेते यांच्या बद्दल लिहिलं त्याच सोबत फाटे फोडणारे आणि मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांबद्दल देखील एकदम खडे बोल लावून मांडलं आहे.
अनिल अवचट एक लेखक म्हणून एक कलावंत म्हणून एक समाजसेवक एक माणूस म्हणून कसे घडले ह्या बद्दल फार सुंदर ह्या पुस्तकात मांडलं आहे, अगदी सहज सोप्या भाषेत सगळे विषय त्याच उत्कटतेने समजावून सांगितले आहे, हे सगळे विषय त्यांच्या समोर कसे आले कोणामुळे आले, अश्या कोणत्या घटना किंवा माणसं कारणीभूत ठरले ह्या सगळ्याबद्दल फार नेटकं लिहिलं आहे. एका लेखकाने स्वतःच्या लेखनप्रक्रियेबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे. इतकं सगळं लिहून अनिल अवचट आजही त्यांच्या घरात – जिथे ते वावरताये तिथे कधी कागदावर लिहीत बसलेले दिसतात, कधी त्यांच्या बासरीचे सूर आपल्या कानी येतात, कधी कोणत्या मुलाला ओरिगामी कलेतून सुंदर कागदांचे नमुने बनवून दाखवतात, कधी लाकूड कोरताना दिसतात…माध्यम कुठलं ही असो…व्यक्त होणं महत्वाचं असतं..इथे तर प्रचंड मोठा आवाका..असं काही लिहायला हवं..जे आपल्या साठी असेल, ज्यातून आपल्याला आपल्यासाठी आनंद शोधता येईल…आणि तोच महत्वाचा असतो न…हळू हळू अनिल अवचट यांचे इतर पुस्तकं देखील वाचणार आहेच…
समीक्षण – मृणाल जोशी
अमॅझॉनवरून विकत घ्या
संबंधित व्हिडिओ