लेखक – आनंद यादव
समीक्षण – हर्षाली वरखडे
पृष्ठसंख्या – ४०६
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस पुणे
मूल्यांकन – ४ | ५
मराठी साहित्यातील ग्रामीण संबंध अधिक ठळक करण्यासाठी ज्या साहित्यिकांची नावे आवर्जून घ्यायला हवीत, अशांच्या यादीत यादव आपोआप जाऊन बसले.साहित्यात ग्रामीण आणि नागरी असं मुळातच काही नसतं असं म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे तर मुळातच जाणीव निराळ्या असल्याने त्यांच्यात भेद असणे अपरिहार्य आहे, असं म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे. साहित्याच्या या वर्गात ‘आनंद यादव’ हे ग्रामीण फळीचे नेतृत्व करतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच आपल्याला दिसून येईल एका देवळीत काही पुस्तके आणि एक छोटा दिवा ठेवलेला आहे,आणि मलपृष्ठावर पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेले कौतुकाचे शब्द आहेत.
पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या शीर्षकाचा,झोंबी या शब्दाचा, खरा अर्थ उमगतो.’झोंबी’ हे डॉ.आनंद यादव यांचे आत्मचरित्र आहे. डॉ.यादव यांचे आत्मचरित्र हे चार वेगवेगळ्या भागात विभागले आहे, त्यात झोंबी’ हा पहिला भाग आहे.यामध्ये आनंद यादव यांचा कागल ते कोल्हापूरपर्यंतचा,शिक्षणाचा पूर्ण प्रवास लिहिला आहे.हि आत्मकथा सत्य आणि भावना या धाग्यांनी विणलेले तलम, रेशमी वस्त्राचाच नमुना आहे.
बिगारी ते मॅट्रिकपर्यंतच्या प्रवासात नायकाला भोगाव्या लागणाऱ्या असंख्य दुःखांचा आणि अगणित अडचणींचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. ग्रामीण जीवनात येणाऱ्या समस्या ह्या शहरी जीवनापेक्षा कितीतरी पटीने वेगळ्या असतात हे सांगताना लेखक म्हणतात कि,’पुस्तक लिहणाऱ्यांना कधीतरी माझं जीवन भोगायला सांगावं म्हणजे त्यांना फरक कळेल’. यामध्ये त्यांनी २-३ मुलानंतर हि आईच्या-ताराच्या- मनाविरुद्ध झालेली मुले, आधीच गरिबी असल्याने एवढ्या जणांमुळे डबघाईला येत चालेलं त्यांचं कुटुंब, यामध्येच ‘हम करे सो कायदा’ या थाटातच वागणारा त्याचा शेतकरी बाप हि पात्रं आपल्याला कथानकात गुंतवून ठेवतात.लेखकाने आपल्या आईवडिलांचा उल्लेख एकेरीच केलेला आढळतो. ‘मातृदेवोभव ,पितृदेवोभव’ हे ऐकण्याची सवय असलेल्या कानांना जन्मदात्यांचा असा उल्लेख वाचल्यावर भुवया अनपेक्षितपणे उंचावल्या जातात.
यामध्ये काही इयत्तांमध्ये मदत करणारे गावाकडचे शिक्षक पण वरच्या इयत्तांमध्ये गेल्यावर बदलले शिक्षक, त्यांचा ग्रामीण पोरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या सगळ्यामुळे होणारी कुंचबणा लेखकाने अगदी समर्पक मांडली आहे. बऱ्याच वेळा इतर वाईट गोष्टींच्या आहारी गेल्यानंतर हि परत सन्मार्गाकडे वळून खडतर अडचणींमधून वाट काढत पुढे चालवलेले शिक्षण नकळत आपल्या चेहऱ्यावर हि समाधान पसरवते.शाळेत असतानाच कविता करण्याची त्यांना लागलेली सवय, केवळ पुस्तके वाचायला मिळावी म्हणून केलेल्या चोऱ्या अन त्यावरून खाल्लेला मार हे सगळं अशा रीतीने मांडले गेले आहे कि, पुस्तक वाचताना आपण हि त्या विश्वात गुंगून जातो.
यादवांचे हे लेखन, वाचकाला त्यांच्या आयुष्यातील उपरेपणाची जाणीव करून देते.मातृप्रेम, पितृप्रेम, कुटुंबाचा जिव्हाळा या भावनांचा जीवनात कधीही स्पर्श न झालेली कथा कि कोरडेपणानेच सांगितली जाणार. तरीही वाचकाला कुठेही उगाच भावनाविवश न करता, वाचकाच्या डोळ्यात सहानुभूतीचे अश्रू उभे करण्याच्या फंदात पडत नाही. हि संपूर्ण आत्मकथा हि ग्रामीण भाषेत सांगितलेली असल्याने काही शब्दांचे, विशेषतः शेतीसंदर्भात असलेले शब्द शहरी वाचकाला समजण्यास अवघड जाऊ शकतात. ग्रामीण आणि नागरी जीवनातील भिंती या पुस्तकाने नक्कीच ढासळल्या आहेत. तेव्हा मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोठा वाटा उचलेले हे पुस्तक वाचायलाच हवे.
समीक्षण – हर्षाली वरखडे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: