garudzep marathi book review cover

गरुडझेप – एक ध्येयवेडा प्रवास

पोस्ट शेयर करा:

लेखक     – भरत आंधळे

समीक्षण  – श्रुती जागीरदार

पृष्ठसंख्या  – ११२

प्रकाशन   – स्टडी सर्कल प्रकाशन 

मूल्यांकन  – ४ । ५

एक अत्यंत सामान्य, ग्रामीण पार्श्वभूमीत व अठरा विश्वे दारिद्र्यात जन्मलेला, ज्याच्या कुटुंबातील मागील सात पिढ्यांना शिक्षणाचा साधा गंध सुद्धा नसणारा, घरात अनेक संकटे परंतु तब्बल दहा वर्षे त्या संकटांचा सामना जिद्दीने, चिकाटीने करून यूपीएससी च्या परीक्षेत भारतीय महसूल सेवा (IRS) या पदी निवड होऊन घवघवीत यश प्राप्त केलेल्या भरत आंधळे यांची ही प्रेरणादायी आत्मकथा.

मध्यंतरी भरत आंधळे यांचा एक लेख वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात आला आणि मग गरुडझेप पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण झाली. एका मुलाच्या हातात गुरं चारण्याची काठी व दुसऱ्या हातात अभ्यासाचे पुस्तक व डोळ्यात लाल दिव्याच्या गाडीत बसण्याची प्रबळ इच्छाशक्ती हे मुखपृष्ठावरील चित्र पाहूनच आपल्याला लेखकांच्या दृढनिश्चयाचा प्रत्यय येतो. पुस्तकातील रेखाचित्रे वाचकांचे लक्ष वेधून घेतात. तसेच साध्या, सोप्या व ओघवत्या भाषाशैलीमुळे कोणत्याही वाचकास खिळवून ठेवण्याची क्षमता या पुस्तकात आहे.

नाशिक जिल्ह्यातील थाणगाव या एका छोट्याश्या खेडेगावात जन्मलेल्या भरतची आजी म्हणजेच कुटुंबाचा प्रमुख आधार, शेती करून भरतच्या शिक्षणासाठी पैसे पुरवणारा धाकटा भाऊ, लग्न झालेली बहीण, पाठबळ देणारी आई व बायको आणि वेड्याचे झटके येणारा, दारू व जुगार च्या नादात मोठे कर्ज निर्माण करून, घरातील दाग-दागिने, भांडी-कुंडी तसेच शेती विकून पळून गेलेला बाप.

अशा कठीण परिस्थितीत भरतचे आय टी आय चे शिक्षण सुरू असताना त्याला ध्यास लागला युपीएससी चा आणि मग तिथून प्रारंभ होतो त्याच्या एका नव्या प्रवासाचा. या काळात पीएसआय (2003), रेल्वे भरती बोर्ड (2004), सिंचन खाते वरिष्ठ सहाय्यक (2005), एलआयसी डिओ (2006), समाजकल्याण निरीक्षक (2007) या इतक्या परीक्षेत यश मिळवूनही त्याला ओढ लागली होती ती भारतातील सर्वोच्च परीक्षा पास होण्याची! त्यासाठी भरतने कच्ची भाकरी व मिरचीचा चुरा खाऊन, कधी उपाशी पोटी झोपून, गाडी नसल्यामुळे कधी पायी तर कधी सायकल चालवून, समवयस्काकडून होणाऱ्या हेटाळणीतून, रात्रंदिवस अभ्यास करून, परीक्षेच्या पास नापासाच्या खेळातून, स्वतःच्या हिमतीवर, अंतिम ध्येय न विसरता हे हलाखीचे दिवस काढले.

परंतु 2010 मध्ये भरतला त्याच्या प्रदीर्घ मेहेनतीचे, कष्टाचे फळ मिळाले आणि त्याची आय आर एस या पदासाठी निवड झाली आणि क्षणात त्याच्या एका कडवट, वाईट व कठोर जीवनाचा शेवट झाला. इतके प्रचंड यश मिळवूनही हुरळून न जाता, पाय जमिनीवरच ठेवून त्याने ‘विद्या विनयेन शोभते’ ही म्हण सार्थ करून दाखविली. पण भरत तिथेच थांबला नाही. त्याने मराठी तरुणांची अस्मिता जागवण्यासाठी, त्यांच्यात असलेल्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्याचे व्रत स्वीकारले. त्याने स्वखर्चाने अनेक कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना 300 च्या वर मार्गदर्शनपर व्याख्याने देऊन मुलांना आत्मविश्वास व उंच उडण्याचे बळ दिले.

गरुडझेप म्हणजे तरुणाईला दिशा देणारे पुस्तक होय. आबालवृद्धांपर्यंत सर्वांनी वाचावे असेच हे पुस्तक आहे. लेखकांमधील ऊर्जा, प्रचंड इच्छाशक्ती, दांडगा आत्मविश्वास, सहाय्यक वृत्ती आदी गुण अंगिकारण्यासारखे आहेत. सदर पुस्तक वाचल्याने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची ऊर्जा निर्माण होते आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कितीही अपयश आले तरीही त्या अपयशाला न जुमानता नवीन आशेने पाहण्याची शक्ती निर्माण होते. लेखक म्हणतात, “जर आपल्या कामामध्ये देव पाहिला तर अशक्य काहीच नाही”. अवांतर वाचनासाठी हे पुस्तक वाचनीय तर आहेच परंतु तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर अवश्य वाचावे असे हे ध्येयाकडे आकर्षित करणारे व अभ्यासाची जिद्द निर्माण करणारे अप्रतिम पुस्तक आहे.

समीक्षण  – श्रुती जागीरदार

bharat andhale garudzep eka dheyveda pravas study circle shruti jagirdar


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/8392/garudzep—ek-dheyya-veda-pravas—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

4 Comments

  • Dear Sir, Myself Sapna Solanke, PSI, SID pune… just read ur book Garudzhep… its unbelievable but dark truth.. u did.. Very inspiring story and creates positive energy… your story tells to do something unexpected… Thanks for sharing ur Anmol Experience.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *