लेखिका – अंजली जोशी
समीक्षण – श्रद्धा वझे
पृष्ठसंख्या – ३३६
प्रकाशन – शब्द प्रकाशन
मूल्यांकन – ४.५ । ५
अंजली जोशी यांचं “विरंगी मी, विमुक्त मी” हे पुस्तक वाचताना एक वेगळंच जग उलगडतं…
अमेरिकेतल्या ‘कॅन्सस’ शहरातल्या विचिटा गावात १९२९ मध्ये जन्मलेली पुस्तकातली नायिका ‘बेटी’ ही एक पाश्चात्य बंडखोर स्त्री…लैंगिक मुक्ती हा स्त्रियांचा केंद्रबिंदू असल्याचं धाडसानं प्रतिपादन करणारी एक झुंजार न्यूड चित्रकार आणि कार्यकर्ती… न्यूड चित्रकलेत कारकीर्द करण्यासाठी ती न्यूयॉर्कला येते आणि तीच तिची कर्मभूमी होते…स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी खळबळजनक, पुरोगामी विचार मांडत कामक्रीडांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवते तसंच न्यूयॉर्क मध्येच सलग तीस वर्षं लैंगिकतेचं प्रशिक्षण देणारी कार्यशाळा चालवते…त्यावर तिनं लिहिलेल्या पुस्तकांचा सात भाषांमध्ये अनुवाद होतो… हजारो प्रती खपतात…आणि हे सगळं घडतं आजपासून तब्बल पंच्याहत्तर वर्षांपूर्वी… प्रस्थापित नितिनियमांशी टक्कर देणाऱ्या बेटीचा अचंबित करणारा प्रवास या कादंबरीतून लेखिकेनं उलगडलाय…
महिलांना लैंगिकदृष्ट्या शिक्षित करणं, हेच कार्यक्षेत्र असणाऱ्या बेटी नावाच्या धाडसी स्त्रीची जडणघडण कशी झाली, याचं यथार्थ वर्णन या पुस्तकातून वाचायला मिळतं… अमेरिकेसारख्या अत्याधुनिक आणि मुक्त वातावरणातही ज्यावेळी हस्तमैथुन हा शब्द उच्चारणं म्हणजे पाप समजलं जायचं त्या काळात ‘हस्तमैथुन हा स्त्रियांच्या लैंगिक मुक्तीचा केंद्रबिंदू आहे’ असं थेट विधान करत त्याचाच प्रचार करण्याचं जिवीतध्येय ती निर्भीडपणे निवडते, ही तिची जीवनगाथा या पुस्तकातून उलगडते….
नग्नता आणि लैंगिकता या दोन्ही गोष्टींकडे निर्मळपणे बघण्याची गरज असल्याचं सांगत, स्वतःचे पठडीबाहेरचे विचार बेधडकपणे मांडणारी, चाकोरी झुगारणारी, बेबंद आयुष्य जगणारी बेटी, ‘स्वच्छंदी’ असली तरी ‘उच्छृंखल’ नसून ‘खरी’ असल्याचं पटतं आणि वाचताना हळूहळू ती वाचकांच्या मनात घर करू लागते…तिचं व्यक्तिमत्व कृतीप्रधान आणि बहिर्मुख असल्याची जाणीव वाचकाला झाल्यानं तो तिला स्वीकारायला लागतो… मग वाचकाला ती अधिक सच्ची, कोवळी, निरागस, कौमार्यावस्थेतली मुलगी वाटते….परंतु जेव्हा ती कार्यशाळेतल्या स्त्रियांना म्हणते की, ‘मनातली पूर्वसंस्कारांची जळमटं काढून टाकल्याशिवाय तुम्ही मोकळेपणानं कामवासनेचा आनंद घेऊ शकणार नाही’ तेव्हा लज्जा, दडपण, संकोच या तटबंदीतून मोकळी होत धैर्यानं समाजाचं वैचारिक परिवर्तन घडवणारी परिपक्व स्त्री म्हणून समोर उभी राहते….
पुस्तक वाचताना अमेरिकेतली तत्कालीन समाजस्थिती, त्याकाळी महिलांना दिली जाणारी विषमतेची वागणूक, त्यांची होणारी लैंगिक घुसमट, त्यावेळचे पुरुष धार्जिणे कायदे आणि त्यापार्श्वभूमीवर बेटीनं उचललेलं स्त्री चळवळीचं शिवधनुष्य, तिचं उद्दिष्ट, तिचं कार्य, तिने उठवलेली वादळं यात वाचक गुंतत जातो….बालमैत्रिणीं मधल्या ‘गर्ल्स टॉक’ मधून बेटीचं काळापुढे जाऊन विचार करणारं व्यक्तिचित्र आपल्या समोर उभं राहतं…. सर्वसाधारण कुटुंबात वाढताना घरातल्या जाणत्या स्त्रियांनी मुलींना दिलेली समजुतीची शिकवण आपल्या संस्कृतीशी मिळती-जुळती वाटते …. लहानपणी बाप-लेकीचं घट्ट नातं हळूहळू माय-लेकीच्या म्हणजेच दोन स्त्रियांच्या नात्याकडे झुकू लागतं, तो प्रवास वाचकाला सुखावून जातो… न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर सुरुवातीला घरच्या आठवणींनी तिची झालेली घालमेल वाचकालाही बेचैन करते… पण त्यानंतर तिचं नग्न-चित्रकारितेचं जग, विवस्त्र मॉडेल्सच्या समोर बसून कॅनव्हासवर चितारलेली चित्रं, त्यांच्या नैसर्गिक-शारीरिक प्रतिक्रिया आणि एक न्यूड चित्रकार म्हणून नग्नतेकडे बघण्याचा तिचा प्रगल्भ दृष्टिकोण, सरावलेली नजर वाचकांना एका वेगळ्याच जगताची सफर घडवून आणते … ह्या आडवळणाच्या कार्यक्षेत्राचा आई-वडिलांवर काय परिणाम होईल, या विचारानं अस्वस्थ झालेली बेटी तुमच्या-आमच्यातली एक साधी मुलगी वाटते…परंतु सगळे पूर्वग्रह, झापडं बाजूला ठेवून न्यूड पेंटिंगचं क्षेत्र जेव्हा ती ‘व्यवसाय’ म्हणून निवडते तेव्हा एक मुरलेली व्यावसायिक चित्रकार वाटते…वडिलांच्या निधनानंतर बेटीनं आईला एक स्त्रीशिक्षक म्हणून दिलेला ‘मुक्त लैंगिक जीवनाचा’ सल्ला वाचून वाचक आवाक होतो… पण त्याचवेळी माय-लेकीतलं नात्यापलीकडचं एका अनोख्या मैत्रीचं नातं वाचकाला अधिक भावतं… प्रेयसी, पत्नी, घटस्फोटिता आणि चळवळीत झोकून देणारी सामाजिक कार्यकर्ती अशी बेटीची निरनिराळी रूपं वाचकाच्या नजरेसमोर उभी राहतात… काटेरी वाटेवरची बेटीची संघर्षमय वाटचाल लेखिका अंजली जोशी यांनी या कादंबरीतून वाचकांसमोर अत्यंत समर्थपणे मांडली आहे…
कथा परदेशातली असूनही लेखिकेनं दिलेल्या मातृभाषेच्या मुलाम्यामुळे ही कादंबरी रंजक झालीये …विषय चाकोरीबाह्य असला तरीही ही कादंबरी आंबटशौकिनांसाठी अजिबातच नाही, उलट या विषयावर वासनेपलीकडे जाऊन गांभीर्यानं विचार करण्यास वाचकांना प्रवृत्त करण्याचा लेखिकेचा उद्देश त्या सुरुवातीलाच प्रस्तावनेत सांगतात … इतक्या वेगळ्या विषयावर लिहिताना लेखिकेच्या लेखणीचा कुठेही तोल सुटलेला नाही, लिखाण जराही अश्लीलकडे झुकत नाही, ही त्यांच्या लेखणीची ताकदच म्हणायला हवी… अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचा या कादंबरीला मिळालेला ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ हे लेखिकेचं यश आहे…आजच्या एकविसाव्या शतकात देखील ज्या देशात लैंगिकता या विषयावर वैद्यकीयदृष्ट्याही उघडपणे बोललं जात नाही अशा आपल्या देशातल्या वाचकांनी हे दर्जेदार पुस्तक आवर्जून वाचायला हवं, हे नक्की…!!!
समीक्षण – श्रद्धा वझे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ