लेखक – भा. द. खेर
समीक्षण – कुमार विश्वजीत
पृष्ठसंख्या – ५१४
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
मुल्यांकन – ४.४ | ५
माझ्या संग्रहात असलेली बरीच पुस्तके जे की धावपळीच्या काळात वाचायची मागे पडली होती ते मला या लॉकडाऊन च्या काळात वाचण्याची एक सुवर्णसंधी म्हणून लाभली. त्यामध्ये भा. द. खेर लिखित हसरे दुःख. विनोद वीर पु. ल .देशपांडे यांचे दैवत जगप्रसिद्ध हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे जीवन चरित्र नुकतच वाचून पूर्ण केलं.
लोकांना नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरचे बालिशपण, निरागसता दिसते पण त्यामागचे दुःख कोणालाच दिसत नाही. पाच वर्षाच्या चार्लीने आईच्या गाण्याचा कार्यक्रम बंद पडू नये म्हणून रंगमंचावर प्रवेश केला तर तो कायमचाच. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत, कष्टमय बालपण, गरिबीशी झुंज देता-देता आईला अधून मधून येणारा वेडाचा झटका, वयाने मोठा असलेला सावत्र भाऊ सिडने याच्या अतोनात प्रेमाच्या बळावर आणि परिस्थिती जरी वाईट असली तरी आईच्या सुसंस्कृत संस्कारामुळे चार्लीच्या अंधकारमय जीवनात सतत प्रकाश पडत राहिला. सतत होणाऱ्या या काळाच्या आघाता मुळे, या दुःखमय प्रसंगातून, दारिद्र्यातून एक प्रगल्भ कलाकार आकार घेत होता आणि त्याच्या कलेला करुणेची झालर चढत होती.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी भाग्याचा दिवस येतोच. तसा चार्लीच्याही आयुष्यात उगवला.एका पात्रासाठी त्याच्या दिग्दर्शकाने त्याला विनोदी पोषाखा करायला सांगितला व तू विनोदी दिसायला पाहिजे असं बजावलं गेलं, तेव्हा त्याने वेशभूषेच्या खोलीत जाऊन मोठी ढगळ विजार अंगावर चढवली. बॅगी पॅन्टवर तंग जॅकेट आणि तंग कटवे कोट, डोक्याच्या आकारापेक्षा छोटी डबी हॅट, हातामध्ये काठी, पायाच्या आकारापेक्षा मोठे शूज आणि या वेशभूषे सोबतच ती फेंगडी आगळीवेगळी चाल अशी संपूर्ण विनोदी व्यक्तिरेखा त्याने उभी केली .या विनोदी वेक्तिरेखेने पुढे ट्रॅप म्हणून जगात प्रेक्षकांच्या मनात घर केले
आश्चर्याची गोष्ट ही की हुकूमशहा हिटलर आणि चार्ली यांचा जन्म एकाच आठवड्यातला. एकाने लाखो माणसं युद्धाच्या दरीत लोटून अनेक संसार उद्ध्वस्त केली, तर दुसऱ्याने त्याच लोकांना हसवून जीवन जगण्यास प्रेरित केलं. चार्लीचा व्यक्तिगत संसार जरी सुकला तरी त्याचा कलेचा अलौकिक संसार मात्र फुलला होता,चार्ली यशाच्या सतत पायऱ्या चढत गेला म्हणून वैयक्तिक संसाराकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं, पण उतरत्या वयात अखेर चॅप्लिनयांच्या चौथ्या पत्नी ऊना(वय १८) यांनी त्यांची अखेरपर्यंत साथ सोडली नाही. कारण बाकी तीन पत्नी सारखे ऊनाने त्यांच्यासोबत हिरोईन बनण्यासाठी किंवा पैशाच्या मोहापायी लग्न केले नव्हते तर तिने त्याच्यासोबत सुखाचा संसार करण्यासाठी, मुलांच चांगल्या प्रकारे पालन पोषण करण्यासाठी लग्न केले होते. उतरत्या वयात तिने त्यांच्या संसाराची घडी नीट बसवली.
पण कलेचे क्षेत्र हे अपूर्ण असतं. कितीही केलं तरी ते एक कलाकाराला कमीच वाटतं. त्यांना वृद्ध काळातही दोन विषयावरचे चित्रपट आवर्जून काढायचे होते (विषय: नेपोलियन आणि येशू ख्रिस्त), पण काळ पुढे चालत होता आणि त्यांची तब्येत साथ देत नव्हती. पण या माणसांनी एवढं ओझं असूनही मनमुराद हसाव कसं हे शिकवले.
अमेरिकेने त्यांना मोठ्या आदराने ऑस्कर या पुरस्काराने सन्मानित केले.माणूस कितीही मोठा असला तरी त्याला कालगती कधी रोखता येत नाही. शेवटी १९७७ सालचा नाताळचा दिवस उजाडला आणि मिस्टर चॅप्लिन शांतपणानं या नाट्यमय जगातून कायमचे निघून गेले.
हसरे दुःख एक महान मूक अभिनय सम्राटाच्या जीवनावरील कादंबरी वाचताना अनेक प्रसंग मनाला भावतील आणि वाचकांमध्ये एक वेगळी उमेद निर्माण होऊन परिस्थितीसमोर न झुकता अपार कष्ट करून जीवनाची उंची गाठण्यास मदत होईल म्हणून वाचकांनी चार्लीचॅप्लिनचे आत्मकथन एकदा जरूर वाचावे.
समीक्षण – कुमार विश्वजीत
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: