लेखक – अतुल कहाते
पृष्ठसंख्या – २००
प्रकाशन – मेहता प्रकाशन
मूल्यांकन – ४ । ५
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुंतवणूकदार आणि “सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या” जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावणारे वॉरन बफे हे एक अवलिया व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊनसुद्धा फक्त आणि फक्त स्वतःच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेवर आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी प्रचंड मोठी मजल मारली. एक सर्वसामान्य वृत्तपत्र विक्रेता ते जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
वॉरन यांचा स्वभाव लहानपणापासुनच शांत आणि आणि अबोल आहे. असं असलं तरीही पैसे कमावण्यावर त्यांचं जीवापाड प्रेम आहे. त्यांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय जोमाने उभा केला (आणि पुढे जाऊन वॉशिंग्टन पोस्ट मध्ये मोठी गुंतवणूक देखील केली). बेंजामिन ग्रॅहम (द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर पुस्तकाचे लेखक) हे वॉरन यांचे गुरु. बेंजामिन ग्रॅहम यांच्या गुंतवणूक संकल्पनांना पाया मानून वॉरन यांनी आपली कारकीर्द सुरु केली. पुस्तकात वॉरनच्या यशस्वी आणि अयशस्वी अशा दोन्ही गुंतवणुकींबद्दल लिहिलं आहे. त्याच सोबत त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल थोडक्यात वर्णन केलं आहे. वॉरन यांचं पैश्यांवर जीवापाड प्रेम असलं तरीही बिल अँड मालिंडा गेट्स फौंडेशन ला त्यांनी दिलेली देणगीची रक्कम बघून आपण थक्क होतो.
लेखक अतुल कहाते लिखित वॉरन बफे यांचं संक्षिप्त चरित्र त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य न्याय देत. एकूणच मराठी भाषेत अर्थ विषयक पुस्तकांची असलेली कमी लक्षात घेता हे पुस्तक महत्वाच ठरत. या पुस्तकात वॉरन यांचा जीवनप्रवास तर आहेच पण त्या सोबतच लेखकाने जागोजागी गुंतवणूक क्षेत्रातील क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या आहेत. अतुल कहाते यांनी वॉरन यांच्या गुंतवणुकीच्या पद्धतींचा अभ्यास करून गुंतवणूक कशी करावी यावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे. या पुस्तकात जितक्या सोप्या भाषेत संकल्पना सांगितल्या आहेत तितक्या शोधूनही सापडणे केवळ अश्यक. वॉरन बफे यांचा संक्षिप्त जीवनप्रवास, गुंतवणूक क्षेत्रातील संकल्पना आणि गुंतवणुकीशी संबंधित सल्ले अशा तिहेरी बाजूंमुळे हे पुस्तक एक वेगळं स्थान निर्माण करत. प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं आणि पुढील पिढीला अर्थविषयक गोष्टींबाबत जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या संकल्पना योग्य करण्यासाठी त्यांना देखील वाचण्यास सांगितलं पाहिजे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ