kali-jogin-marathi-book-review-cover

काळी जोगिण

पोस्ट शेयर करा:

लेखक – नारायण धारप

प्रकाशन – साकेत प्रकाशन

मूल्यांकन – ४ । ५

समीक्षण – प्रज्ञा कडलगनारायण धारप यांच्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. मराठी वाचक रसिकांना खऱ्या अर्थाने भयकथा व रहस्यकथा यांची ओळख करुन देणाऱ्या लेखकांपैकी नारायणजी एक होत. ‘वाचनालयात लोक त्यांचे पुस्तक मिळविण्यास रांगेत उभे राहत’ असे ऐकिवात आहे. त्यामुळेच की काय, त्यांना भयकथेचे अनभिषिक्त सम्राट असे म्हणतात. काळी जोगिण ही अशीच एक कादंबरी.

शहरांनी वैज्ञानिक प्रगती केली असली तरी आपली गावखेडी कित्येक कोस मागे आहेत. तशातच जंतरमंतर, करणी, भानामती,चेटूक अशा चटकदार विषयात लोक खुपच रस घेतात. झटपट प्रगती किंवा पगाराची कमाल मर्यादा, महागाईची चढती श्रेणी व बचत करताना होणारी ओढाताण यांना फाटा देण्यासाठी आडमार्गी पर्याय निवडतात. असच कथेचा नायक अच्यूत सुध्दा साधारण मध्यमवर्गाची पातळी ओलांडण्याची महत्त्वाकांक्षा मनात घेऊन काळी जोगिणीला भेटायला तयार होतो.

या प्रकरणाची सगळी माहिती गोळा केलेली असतानाही मनात शंका असल्याने स्वतः अनुभव घेतलेल्या श्री.परांडे यांना भेटायला जाऊन त्यांची हालत पाहूनही अच्यूत काळी जोगिणीचा अनुभव स्वतःहून घ्यायचा निर्णय पक्का करतो. भेटीनंतर मात्र आता अच्यूत मनात असुनही माघार घेऊ शकत नव्हता. सतत आढ्याकडे एकटक बघत राहणे, कोणत्याही गोष्टीस प्रतिसाद न देणे, हे बदल आता बायको नलिनीच्याही नजरेस जाणवू लागले होते. जसे काय तो ह्या बाह्य जगापासून अलिप्तच झाला होता. डॉक्टरच्या ट्रिटमेंटमुळे त्याच्यामध्ये सुधारणा तर सोडाच, काडीमात्र फरकही जाणवत नव्हता.

अशातच हतबल झालेली नलिनी जेव्हा मुंबईहून गावी येते तेव्हा अच्यूतचा जवळचा मित्र गोपाळच्या म्हणण्यानुसार शेवटचा पर्याय म्हणून ‘भगता’ला पाचारण करण्यात आले. भगताचा उल्लेख होताच अच्यूतमध्ये झालेला भितीदायक फरक, जोगिणीचे अच्यूतवरील नियंत्रण, नलिनीचा आमिष म्हणून केलेला उपयोग, भगत आणि जोगिणीमधला द्वंद्व अशा अनेक गोष्टींमुळे ही कादंबरी जेवढी गुढ होते तेवढाच त्यामधला ‘इंटरेस्ट’ही वाढतो.

नारायण धारप ह्यांच्या ‘नेहमी चांगल्याचाच वाईटावर विजय होतो’ या तत्त्वाप्रमाणे अच्यूतही ह्या संकटातून सहीसलामत सुटतो. तसेच वाईट किंवा आडमार्गाने मिळवलेल्या यशापेक्षा चांगल्या व खात्रीशीर मार्गाने केलेली वाटचाल केव्हाही सरस ठरते, हीच शिकवण ह्यातून मिळते. वाचकाला कथानकेत गुंतवून ठेवण्यात लेखकाचा हातखंडा आहेच व ही कादंबरी म्हणजे त्याचाच एक आविष्कार !

समीक्षण – प्रज्ञा कडलग

kali jogin narayan dharap saket pradnya kadlagपोस्ट शेयर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *