ranmitra-marathi-book-review-cover

रानमित्र

पोस्ट शेयर करा:

लेखक     –  डॉ. प्रकाश आमटे

पृष्ठसंख्या  – ११७

प्रकाशन   – समकालीन प्रकाशन

मूल्यांकन –  ४.२ | ५

समीक्षण – वैष्णवी सुरडकरहेमलकसा  येथील लोकबिरादरी प्रकल्प, तेथील ‘प्राण्यांचं गोकुळ’, त्यांच्यासाठी  प्रकाश आमटेंनी उभं केलेलं कार्य याचा प्रवास या  पुस्तकात  मांडला आहे . डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे या दाम्पत्याने काही कार्यकर्त्यांच्या मदतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हेमलकसा येथे काम सुरु केलं. निर्जन जंगल, सोयीसुविधांचा अभाव आणि असंख्य अडचणी समोर त्यातच अंधश्रद्धांचा पगडा असलेले आदिवासी त्यांना सहज स्वीकारायला तयार नव्हते, अशा या सुरुवातीच्या खडतर प्रवासात प्राण्यांनी त्यांना जगण्याची उमेद  दिली.

पूर्वी आदिवासिंना पोटासाठी प्राण्यांची शिकार हा एकमेव पर्याय होता.  त्यामुळे जखमी  किंवा अनाथ असेच प्राणी त्यांच्या प्रकल्पावर यायला सुरुवात झाली. पहिल्यावहिल्या प्राण्यापासून झालेली सुरुवात आणि पाहता पाहता त्यांनी जंगलाच्या राजाशीही दोस्ती केली ,सापही आमचे सोयरेच असं म्हणत त्यांचं गोकुळ वाढत गेलं.

अस्वल, बिबट्या यांचा दुधपोळी हा आहार, कुत्रा आणि माकडाची मैत्री, बिबट्यांचा त्यांच्या घरातील वावर हे वाचून आपण चकित होतो. नेगल, बबली, कालू अशा अनेक प्राण्यांबद्दल वाचतांना कधी ते आपलेसे होतात हे कळतही नाही! अनाथालयात  प्राण्यांना जगवणं आणि त्यांच्याशी जुळवून घेणं हे एवढं सोपं नव्हतं.  त्यामुळे त्यांनी बहुतांश प्राण्यांसाठी ‘ट्रायल ऍण्ड एरर ‘ पद्धत वापरली. एकूणच, प्राण्यांना सांभाळताना प्रकल्पावर आलेल्या कैक अडचणी आणि त्यांनी शोधून काढलेले उपाय, त्यांना जगवण्यासाठी, आपलंस करण्यासाठी केलेले प्रयोग वाचण्यासारखे आहेत.

आपल्याला प्राण्यांविषयी खरी माहिती कमी आणि गैरसमजच जास्त असतात, ते या पुस्तकातून  दूर होतात. ‘प्राणी हल्ला करतात तो स्वतःच्या संरक्षणासाठी, आपण त्यांच्याशी कसे वागतो यावर ते प्रत्युत्तर देतात’ हे लेखक वारंवार त्यांच्या अनुभवातून  सांगतात.

पुस्तक वाचताना  आपण प्राण्यांच्या त्या विश्वात जातो. एवढंच नाही तर प्राण्यांविषयी भरपूर माहितीही मिळते. पुस्तकातील फोटोग्राफ्स मुळे पुस्तकाला जिवंतपणा आला आहे. ओघवत्या भाषेमुळे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.    एकीकडे वन्यजीव-माणूस संघर्ष टोकाला जात असतांना हेमलकसा मध्ये असलेले वाघ, सिंह, अस्वल यांचा माणसांशी असलेला सहसंबंध केवळ थक्क करणाराच नव्हे तर प्रेरणादायी सुद्धा आहे. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संघर्ष आणि कार्य बघून आपलाही आदर दुणावतो आणि प्राणीप्रेम, निसर्गप्रेम वाढतं एवढं निश्चित!तेव्हा ‘माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची’ ही अद्भुत गोष्ट नक्की वाचा!

समीक्षण – वैष्णवी सुरडकर

ranmitra prakash amte samkalin vaishnavi suradkarसंबंधित व्हिडिओ


                                            

पोस्ट शेयर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *