लेखक – मॉर्गन हाऊजेल
अनुवाद – जयंत कुलकर्णी
पृष्ठसंख्या – २२४
प्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन
मूल्यांकन – ४.६ । ५
हॉटेल मध्ये वॅलेटची नोकरी ते कोलॅब्रेटीव्ह फंडाचे पार्टनर असा थक्क करणारा प्रवास, लेखक मॉर्गन हाऊजेल यांनी अनुभवला आहे. जगप्रसिद्ध प्रकाशनांसाठी स्तंभलेखन आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी मॉर्गन हाऊजेल लिखित पैशाचे मानसशास्त्र (सायकोलॉजी ऑफ मनी) हे पुस्तक अनेक अर्थानी महत्वपूर्ण आहे.
पैशांबद्दल असलेला आपला दृष्टिकोन आपल्याच भविष्यावर परिणाम करत असतो. पैशांबद्दल असलेल्या समजुती किंवा गैरसमजुती पुढच्या पिढीच्या मानसिकतेत बिंबवल्या जातात. त्या योग्य आहेत कि नाही याची पडताळणी शक्यतो केली जात नाही. पैशांबद्दल असलेल्या मानसिकतेची उलट तपासणी करणे आणि त्या मानसिकतेबद्दल वाचकांना पुन्हा विचार करायला भाग पाडणे हे या पुस्तकाच गमक आहे.
मॉर्गन यांनी हे पुस्तक २० प्रकरणात विभाजित केलं आहे. प्रत्येक प्रकरण तुम्हाला पैशांविषयक विविध पैलूंची उदाहरणांसहित माहिती देतं. सुरुवातीला अनेकवेळा उदाहरणं पैशांशी संबंधित वाटत नाहीत पण जसजसे तुम्ही उदाहरणं पूर्ण वाचत जाल तसतसे तुम्हाला लेखकाला त्यातून काय सूचित करायचं आहे हे समजेल आणि त्याच बरोबर मॉर्गन हाऊजेल यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचा अदांज येईल. पुस्तकाच्या मध्यावर म्हणजेच दहाव्या प्रकरणात कदाचित तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याची सर्वात सोपी पद्धत मिळेल. २० व्या प्रकरणात मॉर्गन स्वतःची संपत्ती कशी वाढवतात आणि सांभाळतात याबद्दल संक्षिप्त स्वरूपात लिहितात. पुस्कातील लिखाण सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी आहे. लिखाणात असलेली कमालीची स्पष्टता आणि अर्थव्यवस्थेबद्दल काहीही न लपवता वाचकांसाठी सोप्या भाषेत समजावलेले मुद्दे यासाठी मॉर्गन यांना श्रेय द्यायलाच पाहिजे.
जयंत कुलकर्णी यांनी पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद उत्कृष्ट आहे. त्यांनी केलेला हा अनुवाद मराठी वाचकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. एकूणच पैशाचे मानसशास्त्र (सायकोलॉजी ऑफ मनी) हे पुस्तक सर्वानी वाचलंच पाहिजे. हे पुस्तक पुढील काही वर्षांत अर्थविषयक पुस्तकांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. इतर कोणत्याही अर्थ विषयक पुस्तकांपेक्षा हे पुस्तक तुम्हाला अर्थ विषयक मानसिकता तपासून पाहायला जास्त मदत करेल.
तुमचे या पुस्तकाबद्दल काय विचार आहेत ते कंमेंट करून कळवायला विसरू नका!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ