लेखक – सतीश काळसेकर
प्रकाशन – लोकवाङ्मय गृह
पृष्ठसंख्या – २९१
मुल्यांकन – ४.२ | ५
वाचणाऱ्याची रोजनिशी. अप्रतिम पुस्तक. संग्राह्य असावं असं. गेल्या दशकात वाचन संस्कृती कशी होती, वाचक काय वाचत होते ह्या बद्दल तपशीलवार लिहिलं आहे. सतीश काळसेकर यांनी त्यांचा ग्रंथभांडार कसा वाढवला, तो डौलारा कसा उभा केला त्याचें रंजक किस्से, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लेखक आणि त्या त्या पुस्तकांचे वाचक कसे घडत गेले ह्याच्या नोंदी ह्या पुस्तकात मुबलक प्रमाणात आहे. सतीश काळसेकर यांचं वाचन प्रचंड दांडगं आहे हे पुस्तक वाचताना आपल्या लक्षात येईलच. सुमारे पांच सहा वर्षात दर महिन्याला एक लेख प्रमाणे ह्या पुस्तकाचं लिखाण आहे. डिसेंबर २००३ ते जानेवारी २००९ पर्यंतचे लेखक ह्यात समाविष्ट आहे. काळसेकरांनी वाचकाला कोणत्या चॅलेंजेसना सामोरी जावं लागतं ते ठळकपणे नमूद केलं आहे. अनेक कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित ह्या पुस्तकांबद्दल नव्याने माहिती मिळाली. ह्या पुस्तकात फक्त कुठल्या ग्रंथांबद्दल लिहून काळसेकर थांबत नाही तर ते त्यातील कविता किंवा उतारा देखील देतात, त्या सोबत अनेक अनियतकालिक, अनेक दिवाळी अंक, मासिकं त्या बद्दल काळसेकर भरभरून लिहितात, त्या त्या (मराठी आणि हिंदी दोन्ही) अंकाबद्दल नुसतं लिहीत नाही तर पुढील संपर्कासाठी तिथला पूर्ण पत्ता, नंबर सगळं देतात.
पॉब्लो नेरुदाची “पोस्टमॅन” कादंबरी, त्यांचा आवडता गार्सीया मार्कवेझची love in the time of colera, one hundred year of solude. मरकॅटर (श्रीकांत लागू), साने गुरुजींचा -कला म्हणजे काय? (ललित लेख), Walter Benjamin – unpacking my library, औदुंबर : पुस्तकांच्या सहवासात, अक्षरनिष्ठांची मांदियाळी – अरुण टिकेकर, मौनराग – महेश एलकुंचवार, रामप्रहर -विजय तेंडुलकर, ब्र – कविता महाजन, दहा बाय दहा – दि.पु.चित्रे, ओरहान पामुक – द अदर्स कलर आणि त्यांना मिळालेलं नोबेल पुरस्काराच्या वेळी केलेलं भाषण, ह्याच सोबत हिंदीतील लेखक कवी, दूधनाथ सिंह, मंगेश डबराल, राजेश जोशी, अरुण कमल, ह्या सारखे अनेक कवी , लेखकांच्या पुस्तकातील उतारे आवर्जून नमूद केले जेणेकरून वाचकाला ते ते पुस्तक वाचायचे प्रचंड मोह आवरता घेणे कठीण होतं, सगळ्याच पुस्तकांची नावे इथे देणं फार कठीण आहे.
हे पुस्तक अजून आवडायचं कारण ह्यात फक्त एका काळातील लेखकांबद्दल नाही लिहिलं, ज्या वेळी विजय तेंडुलकर, अरुण टिकेकर, रवींद्र पिंगे, महेश एलकुंचवार, प्रेमचंद, दि.पु.चित्रे, धुमील, कविता महाजन, गौरी देशपांडे, सारख्या लेखकांबद्दल / लेखकांबद्दल लिहिलं जातं त्याच वेळी निखिलेश चित्रे, अच्युत गोडबोले, जयंत पवार, राजेश जोशी, हरिशंकर सारख्या नवीन दमाच्या (हे ही आता जुने झालेत) लेखकांबद्दल ही लिहिलं जातं. अनेक नव्या माहिती ह्या पुस्तकात मिळाल्या उदाहरण म्हणून काव्यसंग्रह सहसा प्रकाशक आपल्या वाट्याला येऊ देत नाही, एक दोन अपवाद वगळले तर, पण “तुला प्रकाशन” संपूर्णतः फक्त काव्यसंग्रहासाठी वाहिलेली प्रकाशन संस्था आहे, ही माहिती माझ्यासाठी नवीन होती.
काळसेकरांच्या साहित्यात वृत्तपत्रे, नियतकालिके, या नियतकालिके, लोकभाषा, बोलीभाषा तसेंच प्रमाणभाषा ह्यावरील चर्चा येते, लोकांनी केलेलं भाषण, साहित्य संमेलनाचे “प्रमुख” वैशिष्ट्य ह्या पुस्तकात प्रामुख्याने समोर येतं. सतीश काळसेकरांच्या ह्या पुस्तकाला नेटकी परंतु सुंदर अशी अरुण खोपकरांची नितांत सुंदर अशी प्रस्तावना लाभली आहे, गेल्या काही महिन्यात अनेक पुस्तके वाचली त्यात निवडक प्रस्तावना आवडल्या त्या पैकी एक ही आहे. अरुण खोपकर नमूद करतात तसं अनेक उतारे वाचून, अनेक नोंदी वाचून “र्रर्रर्रर्रर्र”, “अरे व्वा” किंवा “अरेच्या” वाचताना मोठ्याने बोललं जातंच. ह्या पुस्तकाला २०१३ सालचं “साहित्य अकादमी पुरस्कार” लाभलं आहे, नसतं मिळालं तर आश्चर्य वाटलं असतं!! मुखपृष्ठावरील वारली चित्रे कमालीची आकर्षित करतात. अस्सल वाचकाने एकदा तरी वाचायला हवं…आणि शक्य असेल तर संग्रही देखील ठेवायला हवं.
समीक्षण – मृणाल जोशी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: