mi-aani-nathuram-marathi-book-review-cover

मी आणि नथूराम

पोस्ट शेयर करा:

लेखक – शरद पोंक्षे

प्रकाशन – शब्दमृत प्रकाशन

पृष्ठसंख्या – २४६

मुल्यांकन – ४.७ | ५

‘धोका पत्करण्याची जो तयारी दाखवतो त्यालाच यश मिळतं. माझी आशी धारणा अहे की ‘संधी’ प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच येते फक्त ती बरोबर उचलता आली पाहिजे. त्याचं टायमिंग चुकलं की संपलं सगळं.’ असं म्हणणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे ह्यांनी १९९८ साली नथूराम गोडसेंच्या भूमिकेच्या रुपात आलेली संधी स्वीकारून अचूक टायमिंग साधलं आणि त्या अचूक साधलेल्या टायमिंगमुळेच आज ते स्वतःसाठी लेखक होण्याची संधी स्वतःच निर्माण करू शकले आहेत. आलेली संधी स्विकरण्यापासून ते स्वतः संधी निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास त्यांनी ‘मी आणि नथूराम’ ह्या पुस्तकातून मांडला आहे.

‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ ह्या नाटकाची आणि ह्या पुस्तकाची सुरुवात सारख्याच वाक्यांनी होते (“नमस्कार, आपण सर्वजण मला अनोळखी आहात, खरंतर अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे. अनोळखी या शब्दातच अभावाने का होईना ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही सगळेजण मला नवीन आहात, हां, पण नवीन आहात म्हणजे परके नव्हेत.”) आणि ती वाक्य वाचताच आपला परकेपणा गळून पडतो व आपण लेखकाशी कनेक्ट व्हायला लागतो.

गांधीजींची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेंची बाजू मांडणारं नाटक लिहिणं, ते बसवणं आणि ते सादर करणं; तेही एकदाच नाही तर सातत्याने सादर करत राहणं हे आजच्या काळात शिवधनुष्य पेलण्याइतकच कठीण काम आहे. पण हे शिवधनुष्य लेखक प्रदीप दळवी, दिग्दर्शक विनय आपटे आणि अभिनेते शरद पोंक्षे व त्यांच्या टीमने गेले वीस वर्ष अगदी लीलया पेलले आहे व ह्या वीस वर्षातल्या कडू-गोड आठवणींचा प्रवास त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. श्रीराम लागू, विक्रम गोखले अशा दिग्गज कलाकारांनी नाकारलेली नथूराम गोडसेंची भूमिका स्वीकारण्यापासून ते ह्या नाटकाची निर्मिती करण्यातपर्यंतचा शरद पोंक्षेंचा प्रवास खरंच अभूतपूर्व आहे. मला वाटतं जसं प्रत्येक माणसाचं एक नशीब असतं तसच प्रत्येक कलाकृतीचही एक नशीब असतं. जसं कोणत्या माणसाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही तसच कोणत्या कलाकृतीच्या वाट्याला काय येईल हेही सांगता येत नाही. पण ह्या कलाकृतीच्या आणि तिच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसाच्या नशिबात मात्र सुरुवाती पासूनच संघर्ष लिहिलेला होता. कारण नाटक लिहून झाल्यानंतर त्याचं सेन्सॉर सर्टिफिकेट मिळायला दहा वर्ष लागले. म्हणजे नाटकाला मूर्त स्वरूप येऊन ते रंगभूमीवर सादर व्हायलाच दहा वर्ष लागले. रंगभूमीवर येताच अवघ्या सात प्रयोगानंतर ह्या नाटकावर बंदी घालण्यात आली, अनेक मोर्चे, आंदोलनं, जाळपोळ इत्यादी घटना झाल्या, कोर्टात केस सुरू झाली आणि नाटक पुन्हा सुरू होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु शरद पोंक्षेंनी ह्या नाटकाचे सात प्रयोग करून नथुराम गोडसेंच्या भूमिकेसोबत आपली सप्तपदी पूर्ण केली होती त्यामुळे तिने त्यांच्या आयुष्यातून इतक्या सहजा सहजी जाणं शक्य नव्हतं आणि झालंही तसच. तीन वर्ष कोर्टात केस चालल्यानंतर अखेर नटकावरची बंदी उठली आणि नाटक पुन्हा सुरू झालं.

नाटक सुरू झाल्यानंतर पुढे वीस वर्ष शरदजींना ज्या दिव्यातून जावं लागलं त्या सगळ्या आठवणींनी किंबहुना संघर्षमय आठवणींनी हे पुस्तक व्यापून गेलं आहे. नाटकाला सतत होणारा विरोध, नाट्यगृहात व प्रयोगादरम्यान विरोधकांचे येणारे विक्षिप्त अनुभव, निर्मात्याने चालवलेला मनमानी कारभार आणि त्यामुळे लेखकासाकट सगळ्यांना झालेला मनःस्ताप अशा कितीतरी गोष्टी वाचताना मन खिन्न होऊन जातं तर रसिक प्रेक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्याविषयी वाचून मन भरून येतं आणि अशर्याचाकितही व्हायला होतं. थोडक्यात एकदा हाती घेतलेलं हे पुस्तक आपण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवू शकत नाही. एका कलाकाराने एका कलाकृतीला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेली अथक मेहनत, त्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि त्याची त्याच्या कामावर, त्या कलाकृतीवर व प्रेक्षकांवर असलेली श्रद्धा हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते. ह्याच सगळ्या गोष्टींचं फळ म्हणून की काय ह्या पुस्तकाच्या प्रकशनापूर्विच चार आवृत्या संपल्या व पाचवी आवृत्तीही आता संपण्याच्या मार्गावर आहे. मराठीत कदाचित पहिल्यांदाच कोणत्या पुस्तकाबाबत असं घडत असावं. तेव्हा तुम्ही हे पुस्तक अजून विकत घेतलं नसेल तर नक्की घ्या.

रंगभूमीवर एक मैलाचा दगड असणारं, आपल्या इतिहासाची एक दुसरी बाजू सांगणारं आणि एक माणूस म्हणून आपल्याला विचार करायला भाग पडणारं हे नाटक आणि ते नाटक आपल्यापर्यंत पोचवताना प्रत्येकवेळी घडलेलं नटकामागचं खरं नाटक जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर एकदातरी हे पुस्तक नक्की वाचा.

दुर्दैवाने शरदजींचं हे नाटक प्रत्यक्ष पाहण्याचा योग मला साधता आला नाही.शाळेत असताना दुसऱ्या एका नटाचं हे नाटक मी सीडी वर पाहिलं होतं. पण तेव्हापासून नथूराम गोडसेंविषयी आणि हे नाटक करत असलेल्या शरद पोंक्षेंविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं व हे नाटक बघण्याची मनात प्रचंड इच्छा होती.प्रत्यक्षात ती पूर्ण करता आली नाही पण आता ह्या पुस्तकाच्या पाचव्या अवृतीपासून शब्दामृत प्रकाशनाने पुस्तकाबरोबर ह्या नाटकाची सी.डी देखील उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा हे नाटक बघण्याची माझ्यासारखीच तुमचीही इच्छा असेल तर ती पूर्ण होऊ शकते.

शरदजींनी आपल्याला ह्या पुस्तकातून नकळतपणे एक महत्त्वाचा संदेश दिलाय.ते म्हणतात “आपण किंवा कोणत्याही महापुरुषाचे अनुयायी (काही अपवाद सोडून) त्यांचं अंधानुकरण करतो. ह्या थोर मोठया माणसांना देव बनवून टाकतो आणि मग त्यांच्याबद्दल एकही शब्द ऐकून घ्यायला आपण तयार नसतो. लगेचच मग भावना दुखावल्या जातात. पण हे सगळं करत असताना आपण हे विसरतो की हे महापुरुष शेवटी माणसच आहेत. ही माणसं थोर आहेत म्हणजे १०० टक्के परिपूर्ण नाही. पण मोठी आहेत.” आणि ह्याच विचारला विक्रम गोखले ह्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात दुजोरा देत लिहिलं आहे की, “हा सगळा जाणीवपूर्वक विचारकरण्यासाठी लोकांनी ह्याविषयी वाचलं पाहिजे, निदान आपल्या देशाचा इतिहास तरी तपासला पाहिजे.” थोडक्यात कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण न करता त्यामागच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची, त्या तपासण्याची आणि शेवटी त्या स्वीकारण्याची सजगता आपल्यात असायला हवी. मला वाटतं हे पुस्तक वाचून किंवा हे नाटक बघून आपल्या इतिहासाच्या सगळ्या बाजू पडताळून बघण्याची सजगता जर आपल्यात निर्माण झाली तर मला वाटतं हे नाटक लिहिण्याचा किंवा हे पुस्तक लिहिण्याचा उद्देश सफल होईल.

तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा आणि त्याविषयी मला कमेंट करून नक्की कळवा.

sharad ponkshe pranjali kulkarni mi aani nathuram shabdamrut

ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

प्रांजली कुलकर्णी

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *