inside-marathi-books-pakharmaya-marathi-book-review

पाखरमाया

पोस्ट शेयर करा:

लेखक – मारूती चितमपल्ली

प्रकाशन – साहित्य प्रसार केंद्र

पृष्ठसंख्या – १३९

समीक्षक – अक्षय गुधाटे

मुल्यांकन – ४.३ | ५

मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांनी पुस्तकाला दिलेली नावे. केशराचा पाऊस असो, रानवाटा असो, पाखरमाया असो वा सुवर्णगरुड असो नाव वाचता क्षणीच मनात विचारांचं काहूर माजतं. त्याला भर म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर पुस्तकाच्या नावाला साजेसे असे किंवा त्याहूनही सुंदर चित्र असते. आणि आपण त्याच्याकडे आपसूकच ओढले जातो. सहज चाळायला म्हणून जरी पुस्तक हातात धरलं असलं तरीही त्यांच्या लिखाणात आपण स्वतःला विसरून जातो, आणि पुस्तकाशी एकरूप होतो.

‘पाखरमाया’ या नावावरून जरी पुस्तकांत पक्षी जगताबद्दल सर्व असेल अस वाटलं तरीही आत मात्र अनेक विषयांवर लेख आहेत. पक्षी, कीटक, लहान प्राणी, झाडं एकूण निसर्गाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकांत पक्षी आपली घरटी कशी बांधतात याबद्दल अधिक विस्तृत महिती सांगितली आहे. तसेच वाळवी, चेलपतंग, काजवे, बेडूक, खेकडे यांची माहिती आहे. वानर आणि वांब माश्यावर देखील सुंदर लेख आहेत. आकाश आणि पृथ्वी ग्रहतारे यांच्या गमकाची वर्णने आहेत. तर झाडांमध्ये पिंपळ, चिंच, सुरु, कुसुमगुंजा, बाभूळ, महारुख, रायमुनिया आणि शेवग्याची बारीक माहीती दिली आहे. निसर्गातील सर्व गोष्टी सांगून त्यांचा आणि योग याचा संबंध शेवटच्या लेखामध्ये त्यांनी सुंदर प्रकारे मांडला आहे.

चितमपल्ली यांची पुस्तकं निसर्गाची नवीन ओळख करून देतातच परंतु त्यातील भाषा आणि चित्रमय गोष्टींमुळे आपल्याला निसर्गाविषयी आपसूकच आपुलकी निर्माण होते. त्यांचे साहित्य वाचून प्रसिद्ध लेखक “जी. ए. कुलकर्णी” यांनी त्यांना सुंदर पत्र लिहिलं आहे त्यावरूनच आपल्याला त्यांच्या लिखाणाची शैली समजून येते. ते पत्र असे आहे:

प्रिय चितमपल्ली,

निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यांतील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे यांचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेरओढ आहे.

• जी. ए. कुलकर्णी

असा सुंदर अभिप्राय वाचल्यानंतर हे पुस्तक मला आणखीनच वाचू वाटले. तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय कळवा.

समीक्षक – अक्षय गुधाटे

pakharmaya maruti chitampalli akshay gudhate sahitya prasar kendra


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:




पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *