लेखक – परमहंस योगानंद
पृष्ठसंख्या – ७५०
प्रकाशन – योगदा संत्संग सोसायटी
मुल्यांकन – ४. ५ | ५
आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेलं आणि शतकातील सर्वोत्तम १०० आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक. योगी कथामृत (ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी) हे परमहंस योगानंद यांच आत्मचरित्र आहे. परमहंस योगानंदांनी आपल्या बालपणीपासून ते अमेरिकेपर्यंत आणि योगविद्या जगभर पोचवण्याचा प्रवास यात लिहिला आहे. शिवाय या पुस्तकात त्यांच्या महासमाधी बद्दल देखील माहिती आहे. योगदा संत्संग सोसायटी तर्फे प्रकाशित या पुस्तकात त्यांची व तत्कालीन साधू संतांची अनेक छायाचित्रेही दिली आहेत.
अगदी पुस्तकांच्या पहिल्या पानापासून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पुस्तकाचा कालखंड १८९३ – १९५२ चा असल्यामुळे पुस्तकात ब्रिटिशकालीन भारताचे अनेक संदर्भ आहेत. पुस्तकात मानवी जीवन, उत्पत्ती, मृत्यू, मृत्युपश्चात जीवन, विज्ञान आणि आध्यात्म या सर्वांबद्दल लिहिलं आहे. सामान्य माणसाला माहित असलेल्या ज्ञानापेक्षाही विलक्षण ज्ञानाबद्दल ओळख या पुस्तकातून तुम्हाला होईल. लेखकाची लेखनशैली थोडी वेगळी आहे, योगविद्येबद्दल ज्ञान आपणास नवीन आहे आणि कालखंड शतकापूर्वीचा आहे त्यामुळे वाचकांना पुस्तक वाचणं किंचित कठीण वाटू शकत पण या पुस्तकातून भारतातील योगविद्देबद्दल जी माहिती आपणास मिळणार आहे त्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे असेच आहे.
पुस्तकात अनेक साधू संतांबद्दल लिहिल आहे आणि बऱ्याच संतांचे छायाचित्रही आहेत (जी एक दुर्मिळ गोष्ट आहे). नवीन पिढीला विसर पडलेल्या प्राचीन भारतातील विद्येबद्दल सर्वसामान्यांना माहिती करून देण्यासाठी या पुस्तकाचा प्रसार होणे गरजेचं आहे. हे पुस्तक ज्ञानी लोकानांही त्यांच्या रीतसर विचारसरणीला छेद द्यायला भाग पडेल आणि आपणास माहित असलेल्या गोष्टींपेक्षा मानवी जीवन आणि विश्व अधिक गूढ, रहस्यमयी आहे याची जाणीव आपल्याला पदोपदी करून देतं.
थोडक्यात हे पुस्तक विलक्षण आहे आणि भारतीय संस्कृती, संतपरंपरा, योग, तत्वज्ञान आणि विज्ञान याबद्दल जाणून घेण्यासाठी यापेक्षा योग्य पुस्तक असू शकत नाही.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: