prakashwata marathi book cover

प्रकाशवाटा

पोस्ट शेयर करा:

लेखक – डॉ. प्रकाश बाबा आमटे

पृष्ठसंख्या – १६०

प्रकाशन – समकालीन प्रकाशन

मुल्यांकन – ४.७ | ५

रामन मॅगसेसे पुरस्कार विजेता एक माणूस आपल्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात राहून प्रसिध्दीच्या आणि पैश्यांच्या पलीकडे जाऊन गरीब आणि आदिवासी भागात विकासाचे आणि शिक्षणप्रसाराचे काम करत आहे. आणि याची दखल घेणे तर सोडाच पण त्यांना तो परदेशी व्हिसा नाकारला जातो. आपण कोण आहात आणि आपलं वार्षिक उत्पन्न किती ?? या कारणांस्तव, याला आपलंच दुर्दैव म्हणावे लागेल. बाबांच्या आनंदवनातील जीवनाचा आदर्श घेऊन गरिबांसाठी आणि आदिवासी लोकांच्या सुधारणेसाठी आपलं आयुष्य पणाला लावलेल्या एका माणसाची ही आत्मकथा आहे. हे काम त्यावेळी अजून अवघड वाटते जेंव्हा त्यातून आपल्यालाच कष्ट आणि त्रास होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, सपत्निक आदिवासी भागात जाऊन काम करण्याच्या निर्णय घेऊन हे दोघे निघाले आणि हेमलकासा सारख्या अगदी छोट्या गावात जाऊन ठेपले. तिथं अनेक घटनांनी त्यांना नवे अनुभव दिले याच वर्णन करताना लेखक अगदी योग्य आणि व्यवस्थित कथावर्णन करतो. त्यात आलेल्या अनेक अडचणी लोकांनी घातलेला मोडता आणि या सर्वांतून घडलेला जिद्दीच्या प्रवासचे काही क्षण आपल्या डोळ्यात पाणी आणतील आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला इतक्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याचे नक्कीच मनात एक वारूळ उठेल.

आईच्या मायेचा एक किस्सा लेखकाने अतिशय सुरेख सांगितला आहे. आपल्या मुलाला तिकडे रानावनात राहावं लागतं आणि तिकडे पंखा नाही हे समजल्यावर त्या आईने घरी स्वतःला पंखा असूनही तो कधीच चालवला नाही हे फक्त आईच काळीज करू शकते. आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांनी एक नवीन विश्व निर्माण केलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी सुधारणा झाल्या पण खरी गरज असणाऱ्या आदिवासी भागात मात्र काहीच नव्हते अशा ठिकाणी सरकारी यंत्रणा आणि योजना त्या ठिकाणी पोहचाव्यात म्हणून लेखकाने दिलेला लढा आणि दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. अशातच तिथल्या स्थानिक लोकांना वैद्यकिय सुविधा मोफत पुरवणे आणि आणि त्याचबरोबर भुतदयेने अनेक माणसांसोबत प्राण्यांना देखील वाचवून तिथे नंदनवन फुलवले आणि गोकुळ निर्माण केले.

पुस्तक वाचताना अंगावर शहारे आणि काटे उभे करणारे अनेक प्रसंग आहेत. पण त्यासोबतच स्वतःला सावरत आपण खरे कोण आहोत आणि किती भाग्यवान आहोत याचीही जाणीव होते. आपण बाह्य गोष्टींना किती महत्त्व देतो आणि त्या खरेच इतक्या महत्वाच्या आहेत का?? असा एक मोलिक प्रश्न तुमच्या समोर उभा राहील. आणि मला वाटते याचे उत्तर आपण सर्वांनीच स्वतःपुरते का होईना पण शोधायला हवे. मानव म्हणून जन्म सार्थकी लागेल असे मला वाटते. अशी पुस्तकं माणसं घडवतात माणसातील माणूसपण जपतात. या प्रकल्पात सहभागी होऊन मदत करणारे नाना पाटेकर असतील किंवा पुल असतील त्यांनी आपापला वाटा सार्थ पणे उचलला आहे आणि आपणही उचलावा असे वाटते. यातून मिळालेले अनुभव जीवन सुखावणारं नाहीत पण मन पोळवून जगायला शिकवतात. नक्की वाचा ही प्रेरणादायी कथा.

: prakashawata prakash amte baba samkalin akshay gudhate


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/2602/prakashwata—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

1 Comment

 • समीक्षण – नितीश पारकर

  पुस्तक: प्रकाशवाटा
  लेखक: डॉ. प्रकाश आमटे
  पृष्ठसंख्या: १५६
  प्रकाशन: समकालीन प्रकाशन
  मूल्यांकन: ५ | ५

  माडिया गोंड आदिवासींना मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे आणि त्यांची होणारी पिळवणूक थांबावी या भूमिकेतून बाबा आमटेंनी हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात केली. वयाच्या बाविसाव्या वर्षी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याची धुरा हाती घेतली आणि तो यशस्वी करून दाखवला. प्रकाशवाटा म्हणजे प्राण्यांविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी प्राणी पाळणे, पाण्याविषयी लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी भोवऱ्यात उडी मारणे असे अनेक विलक्षण प्रयोग करणाऱ्या या अवलियाची गोष्ट.

  लोकबिरादरी प्रकल्पासाठी जेव्हा त्यांना जमीन मिळाली तेव्हा तेथे फक्त जंगल होते. त्यामुळे अगदी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यापासून सुरुवात करावी लागली. अतिशय दुर्गम अशा या भागात त्या काळी ना संपर्काची साधने उपलब्ध होती ना दळणवळणाची सोय. पहिली १७ वर्षे तर वीजही नव्हती. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन काही महिने बाहेरच्या जगाशी संपूर्णपणे संपर्क तुटायचा. जंगलात डासांचा सुळसुळाट, त्यामुळे पहिल्या वर्षी सर्वांना मलेरिया झाला. तिथल्या पाण्यामुळे आजारी पडणं तर सामान्य बाब. जंगलात राहताना एकटेपणा ही यायचा. सगळेच कुटुंबापासून दूर राहत होते, त्यामुळे मतभेद झाले तर मन मोकळे करायला किंवा सल्ला मागायलाही कुणी नव्हते. सर्वांसाठी एकाच स्वयंपाकघर, त्यामुळे जे स्वयंपाकी करेल तेच सर्वांना खावे लागे. सुरुवातीला तर सर्व कार्यकर्ते चक्क झाडाखालीच झोपायचे, नंतर सर्वांसाठी एक झोपडी बांधण्यात आली. सगळ्यांना या परिस्थितीचा त्रास झाला, पण सर्व त्यातून मार्ग काढायलाही शिकले आणि त्यामुळेच एकमेकांच्या जवळ आले.

  आदिवासींची जीवनशैली, त्यांची सहनशीलता, जगण्याविषयीचा व्यावहारिक दृष्टिकोन यांचीही बरीच उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात. सुरुवातीला तर हे आदिवासी प्रकल्पावर फिरकतही नसत. त्यांच्यातील अंधश्रद्धा, चालीरीती, बाहेरच्या माणसांनी वर्षानुवर्षे केलेले शोषण अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या मनात बाहेरच्यांविषयी अविश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेल्या धडपडीचेही वर्णन या पुस्तकात वाचावयास मिळते. अगदी त्यांची भाषा शिकण्यापासून ते त्यांच्यासाठी शाळा सुरु करण्यापर्यंत. आदिवासींचाही त्यांच्या जीवनशैलीवर बराच प्रभाव पडला. आधीच आमटेंचे राहणीमान साधे होते, आदिवासींकडे बघून त्यांनी आपल्या गरज अजून कमी केल्या.

  वैद्यकीय सेवा पुरवण्यातही अनेक अडचणी आल्या. तिथे कोणी specialist डॉक्टर नव्हते. त्यामुळे सगळ्या दुखण्यांवर, अगदी डोळ्यांपासून हाडांपर्यंत, प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनाच उपचार करावे लागत. इतर मेडिकल स्टाफ ही नसल्यामुळे कार्यकर्त्यांनाच प्रशिक्षण दिले गेले. पशुवैद्य नसल्याने प्राण्यांवरही उपचार केले. वीज नसल्याने कंदिलाच्या प्रकाशात कित्येक ऑपरेशन्स केली. एखाद्या आजाराविषयी किंवा उपचार पद्धतीविषयी माहिती नसेल तर पुस्तकात वाचून उपचार केले. इतर कुठेही सापडणार नाही अशा अविश्वसनीय केसेस चे वर्णन प्रकाशवाटा मधे वाचावयास मिळते.

  थोडक्यात काय, तर आपल्याकडे startup culture लोकप्रिय होण्याआधी आमटेंनी सुरु केलेली ही startup. येथे कोणीही प्रमुख नव्हता, सर्वच कार्यकर्ते(flat hierarchy). अंगावर पडेल ते काम करून, त्यासाठी जरुरी ती कौशल्ये स्वतःच आत्मसात करून आणि येणाऱ्या सर्व अडचणींवर उपलब्ध संसाधने वापरून मार्ग काढून या सर्वानी लोकबिरादरी प्रकल्प यशस्वी करून दाखवला.

  हा प्रकल्प यशस्वी करण्यात प्रकाश आमटेंबरोबरच त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे, भाऊ विकास आमटे, सुरुवातीचे त्यांचे सहकारी अशा अनेकांचा सिंहाचा वाटा आहे. या प्रकल्पात जसे अनेक व्यक्तिंचे योगदान लाभले, तसे काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु पुस्तकात कोणावरही टीका करताना त्या व्यक्तीचे नाव घेतलेले नाही, मात्र प्रकल्पास ज्यांची मदत झाली त्यांची स्तुती मात्र नाव घेऊन केली आहे.

  या प्रकल्पाव्यतिरिक्त आमटेंचे बालपण आणि जडणघडणीच्या अनेक प्रसंगांचे वर्णन या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे खरंतर प्रकाश आमटेंच्या जीवनातील अनेक किस्स्यांचा संग्रहच. यातील काही खळखळून हसवतात, तर काही डोळ्यातून टचकन पाणी आणतात. हे सर्व किस्से एकेमकांमध्ये सुसंबद्धपणे गुंफून आमटेंनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाची आणि त्यांच्या जीवनाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे हे पुस्तक जरूर वाचावे. अगदीच काही नाही तर अनेक गोष्टींविषयी एक नवा दृष्टिकोन नक्की मिळेल.

  समीक्षण – नितीश पारकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *