लेखक – मार्क मॅन्सन
अनुवाद – श्रद्धा भोवड
पृष्ठसंख्या – २२४
प्रकाशन – मधुश्री पब्लिकेशन
मुल्यांकन – ५ | ५
चोख जगण्याचे ठोक मार्ग, घंटा फरक न पाडून घेण्याची बेमालूम कला… अशा अनेक मसुद्यानी झळकणारे हे पुस्तक जगण्याचा मूलमंत्र आहे हे नक्की. ज्यांनी हे पुस्तक अजून वाचले नाही, माझ्या मते ते एका आयुष्यातील मोठ्या भागाला, स्वतःच्या स्वतःलाच आणि अनेकांच्या खोट्या आणि बनावट भागाला भेट न देताच जगत आहेत. स्वतःला सावरत, आयुष्याची घडी परत बसवायची असेल, निराशेतून आशेच्या वाटेवर यायचं असेल, स्वतःला आणि जगाला गवसणी घालायाची असेल तर यातील मुद्दे नीट विचारात घ्या आणि समजून आमलात आणले तर मला वाटतं आपल्या डोळ्यातील झापड स्वच्छ होतील.
उम्रभर गालिब…… यही भूल करता रहा,
धुल चेहरेपे थी, और आयना साफ करता रहा !!
या एका उर्दू शेर चा मतितार्थ या पुस्तकातून वाचायला मिळेल. आणि बाकी सगळ्यांपेक्षा स्वतःला सुधारणं, सावरन, स्वतःमध्ये बदल करुनच आपण सुखी होऊ शकतो, या विचाराचे हे पुस्तकं सर्वांच्याच संग्रहात असावे. आणि फक्त असून उपयोग नाही तर ते वरचेवर स्वतःला सावरण्यासाठी वाचत रहावे असेच मला वाटते. पाश्चात्य देशात लिहलेल्या आणि जगभर पसरलेल्या या पुस्तकातील काही ठेवणीतले मुद्दे सर्वच स्तरातून, भाषांमधून, भावनातून माणसाला समृद्ध करतात. आणि हे करत असताना यात लेखकाच्या लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. त्याची प्रत्येक गोष्ट, त्यातून मिळणारा बोध, उदाहरणादाखल सांगितलेले किस्से मनात घर करतात, आणि अशा वेगळ्या शैलीतून केलेलं हे मार्गदर्शन मेंदूतील प्रत्येक तंतुला तान पडेपर्यंत विचार करायला भाग पाडते. असेच आपल्याशी निगडित घटना आठवून त्यांची जुळवाजुळव करत आपल्या मनालाही विचार समजून घेण्यास मदत करते. प्रत्येक उदाहरण पुस्तकाला अजून समृद्ध करते. मुख्यतः इंग्रजी भाषेत असलेलं हे पुस्तक मराठी भाषेत जसच्या तस, गाभ्यास धक्का न लागू देता मराठी लोकांसाठी लिहण्याचे कठीण काम लेखिकेने अगदी सहज केलं आहे. ही प्रतिसादाची पावतीच सगळ काही सांगून जाते.
आयुष्याला अनेक उतार चढाव तर असतातच पण यातूनच आयुष्य खुलतं अस म्हणतात, पण फक्त एवढंच खर नाहीये. घडणाऱ्या घटना, त्यांचा प्रभाव, त्यांचा क्रम आणि आपण त्यांना दिलेलं महत्त्व, या साऱ्याच समीकरण लेखकाने अगदी छान मांडलं आहे. मार्क मॅन्सन हे नाव अचानक प्रसिद्धीला येण्याचं कारण म्हणजे त्यांनी या पुस्तकात जगण्याचा अंश मांडला आहे. आपण कशाला महत्त्व द्यावं आणि कशाला नाही, याउपर कशाला दिलं असत तर आपण अजून आनंदी आणि उत्साही जीवन जगू शकतो याचे सिद्धांत लेखक सुंदर तऱ्हेने सांगतो. आपण अडकलेल्या खोट्या जगात, आणि सांभाळणाऱ्या खोट्या मूल्यांच लेखक पितळ उघडं पाडतो. चुकीच्या विचारधारा बेधडक पणे आपल्या चुकातून दाखवून, लोकांना शहाणपण शिकवतो याबद्दल लेखक नक्कीच कौतुकास पात्र आहे.
माझ्या आयुष्यात आलेल्या आणि वळण लाऊन सरळ केलेल्या पुस्तकात हे पुस्तक अग्रणी आहे. अनेक मुद्दे आमलात आणल्यामुळे धुरकट वाट स्पष्ट झाली, शंका निवल्या आणि न रेटला जाणारा आयुष्याचा गाडा पुन्हा नव्याने वेग पकडू लागला. नकारातील मौज अजून जाणवतेय…
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
किंडल आवृत्ती (इंग्रजी) विकत घ्या
छान परिचय