लेखक – सत्या नाडेला
अनुवाद – उदय जोग
पृष्ठसंख्या – २००
प्रकाशन – वेस्टलँड । यात्रा
मुल्यांकन – ४ | ५
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे घरोघरी मायक्रोसॉफ्ट हे नाव पोहचलं आहे. बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी १९७५ साली मायक्रोसॉफ्ट सुरु केली आणि ती आज जगातील एक बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी आहे. ४ फेब्रुवारी २०१४ ची सकाळ प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा बातमीने झाली. मूळ भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची मायक्रोसॉफ्ट च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) या पदासाठी निवड करण्यात आली. हिट रिफ्रेश हे सत्या नाडेला लिखित, भविष्याचा वेध घेणारं आणि तंत्रज्ञानाचे दूरगामी परिणाम यांवर चर्चा करणार एक विलक्षणीय पुस्तक आहे.
मायक्रोसॉफ्ट जरी तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असली तरीही गूगल आणि अँपलच्या वर्चस्वामुळे स्मार्टफोन क्रांतीत मायक्रोसॉफ्ट मागे पडली. एकेकाळी तंत्रज्ञान क्षेत्रात निर्विवाद अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्टला २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात नवनवीन तंत्रज्ञान सीमांवर मुसंडी मारणे कठीण होत गेलं. बिल गेट्स नंतर मायक्रोसॉफ्टची कमान स्टिव्ह बॉल्मर (२०००-२०१४) यांच्यावर होती आणि याच कालावधीत मायक्रोसॉफ्टने मोठया प्रमाणावर नवीन संधी गमावल्या. १९९२ साली सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्ट मध्ये नोकरी स्वीकारली. सत्या हे मूळचे भारतीय, त्यांचं शिक्षण हैदराबादमधील एका नामांकित शाळेत झालं. त्यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत होते. मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांचं पाहिलंच प्रोजेक्ट अयशस्वी झालं तरीही सत्या यांनी हार न मानता आपला प्रवास सुरूच ठेवला.
२०१४ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्यानंतर त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये नवा उन्मेष जागृत केला, मायक्रोसॉफ्टचा हरवलेला आत्मा शोधायच्या त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळालं आहे असं आपण आता म्हणू शकतो. मागच्या दशकात झालेली पिछेहाट विसरून मायक्रोसॉफ्ट पुन्हा आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आपले पंख पसरवत आहे. या सर्व बदलांमागे सत्या यांची दूरदृष्टी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा सखोल अभ्यास आणि त्यांची प्रखर बुद्धिमत्ता हे कारणीभूत आहेत. सत्या यांनी खरोखरच हिट रिफ्रेश (नवी सुरुवात) करून मायक्रोसॉफ्टची घडी बसवली आहे.
पुस्तकात सत्या यांनी व्यापक गोष्टींचा आढावा घेतला. अगदी कंपनीची संस्कृती कशी असावी इथपासून कंपनीला भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी कसं सक्षम बनवायचं?, कोणत्या प्रतिस्पर्ध्यांसोबत कधी आणि का हातमिळवणी करायची? आणि आंतरराष्ट्रीय कायदे इथं पर्यंत त्यांनी सर्व गोष्टीवर आपली मत मांडली आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असणे म्हणजे किती अवघड काम आहे हे पुस्तक वाचताना तुम्हाला जाणवत राहील.
सत्या हे निस्सीम क्रिकेटभक्त आहेत. क्रिकेटमधुन त्यांना जीवनाचे धडे मिळतात असं ते म्हणतात. जर ते तंत्रज्ञान क्षेत्रात नसते तर ते नक्कीच उत्तम क्रिकेटपटू झाले असते असं ते गमतीने म्हणतात. सत्या यांची लेखनशैली साहित्य अनुकूल नसली तरीही त्यांची विनयशीलता तुमचं मन जिंकते. डेटा प्रायव्हसी (गोपनीयता) सध्याचा ज्वलंत मुद्दा आहे. त्याबद्दल सत्या यांनी दिलेली उदाहरणं वाचनीय आहेत. मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि अँपल या कंपन्या डेटा प्रायव्हसीकडे गंभीरतेने पाहतात हे वाचून समाधान वाटतं.
सत्या तंत्रज्ञानच्या लोकशाहीकरणाबद्दलही लिहितात. त्यांच्या मते तंत्रज्ञान सर्वसामान्यांना माफक किंमतीत उपलब्ध करून देणे हि बलाढ्य कंपन्यांची नैतिक जबाबदारी आहे. तंत्रज्ञाना च्या साहाय्याने अश्यकप्राय गोष्टी कश्या शक्य झाल्यात याची असंख्य उदाहरणे पुस्तकात आहेत.
जगभरात होत असलेले नवनवीन प्रयोग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच (कृत्रिम बुद्धिमत्तेचं) मानवजाती समोर उभं ठाकलेलं आव्हान याबद्दलचे त्यांचे विचार खरोखरच वाचनीय आणि विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना खुद्द बिल गेट्स यांनी लिहिली आहे.
एकंदर हिट रिफ्रेश हे मायक्रोसॉफ्टच अंतरबाह्य परिवर्तन याविषयीचं पुस्तक आहे. या पुस्तकातून तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकू शकता. पुस्तकाचा मराठी अनुवाद ठिकठाक झाला आहे पण जर तुम्हाला इंग्रजी येत असेल तर मूळ पुस्तक वाचणेच योग्य राहील.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ