shekara-marathi-book-review-cover

शेकरा

पोस्ट शेयर करा:

लेखक – रणजित देसाई 

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठसंख्या – ८४

मूल्यांकन – ४.५ | ५

आपल्यातल्या प्रत्येकात एक लहान मूल दडलेलं असतं ज्याला जंगल, तिथले प्राणी, पक्षी यांना पाहण्याची, जंगलात घडणाऱ्या नानाविध घडामोडी जाणून घेण्याची जन्मतःच भारी हौस असते. लहानपणापासूनच वडीलधाऱ्या माणसांकडून आपण अनेक छोट्या मोठ्या जंगलातल्या कथा मन लावून ऐकलेल्या असतात आणि त्यातूनच हे कुतुहुल वाढत गेलेलं असतं. रणजित देसाई यांनी लिहलेली शेकरा नावाची एक छोटेखानी कादंबरी नक्कीच आपल्यातल्या या कुतुहलास संजीवनी देते. एखाद्या कथेचा नायक शेकरा असू शकतो हे न पटणे स्वाभाविक आहे परंतु खारीचाच एक प्रकार असलेला शेकरा हाच या कादंबरीचा नायक आहे. जंगलातल्या जवळपास हर एक झाडावरती मक्तेदारी असल्यासारखी, त्याची घरटी त्याने बांधून ठेवलेली आहेत आणि त्याच घरट्यांमधून तो संपूर्ण जंगल जीवन आपल्या शेपटीचा झुपकेदार गोंडा मिरवत पाहत असतो.

प्रचंड मोठ्या कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपाताच्या होणाऱ्या प्रवाहावर, पाणी प्यायला येणार सगळं जंगल, कपारीतून धडकी भरवणारी डरकी फोडणारा वाघ, मधाच्या शोधात जमीन हुंगत निघालेलं अस्वल, प्रणयात मग्न असलेला व मादी सोबतच्या क्रीडेत दंग झालेला भुजंग, जमिनीवर न उतरता या झाडाहून त्या झाडावर फिरणारे काळतोंडी हुप्पे, जबडा वासून दात स्वच्छ करून घेणारी सुसर अन तिच्या दातातले मांस खाऊन तृप्त होणारे पक्षी, कान टवकारून सावधपणे पाणी पिणारे चितळ, गंडस्थळावरून वाहणाऱ्या मदाने मत्त झालेला गजेंद्र आणि या सगळ्यांशी आपली ओळख करून देणारा शेकरा हाहा म्हणता संपूर्ण जंगल आपल्या डोळयांसमोर जिवंत करतो. जंगलातल्या प्रत्येक प्राण्यांच्या कृतींमागे जंगलाचे काही नियम आहेत आणि ती नैतिकता जोपासूनच जंगल जीवन चालू असतं. त्यात काही भक्ष्यस्थानी पडतात तर काही त्यातूनच आपली भूक मिटवतात. शक्तिशाली माणसांची जशी समाजातल्या बुजलेल्या वर्गावर मक्तेदारी असते तसंच काही जंगलातही आहे. येथे सामर्थ्यशाली प्राण्याचा वचक आहेच मात्र इथे प्रत्येकाला संधी मिळते, कधी निसटून जाण्याची, कधी शिकार करण्याची तर कधी सावध भूमिका घेत माघार घेण्याची. आपलंही आयुष्य असंच तर असतं फक्त योग्य वेळ साधली की नुकसान होत नाही.

अचानक मग एके दिवशी वणवा पेट घेतो अन संपूर्ण जंगलाचा चेहरा बदलून जातो. सगळीकडे हाहाकार माजून जंगल खाक होऊन जातं. प्राणी, पक्षी वाट बदलून दुसऱ्या जंगलात निघून जातात. ज्या जंगलाने आपल्याला वाढवलं, अंगाखांद्यावर खेळवलं त्याच जंगलाला आज कठीण समयी सोडून जायचं या विचाराने सुन्न होऊन शेकरा जंगल सोडत नाही. तो वाट पाहतो पुर्नउभारणीची, खाक झालेल्या जंगलाने पुन्हा तरुण होण्याची. या सगळ्यात त्याला सोसाव्या लागणाऱ्या यातना, एकाकीपणाची वेदना लेखकाने ज्या शब्दांत, प्रसंगात मांडली आहे ते नकळत हेलावून जातात. ह्या सगळ्यातून जेंव्हा आपलीच शिकार होते अन क्षणात भोवतालच्या गोष्टींची जाणीव नष्ट होऊन, जणू काही झालंच नाही या अविर्भावात पुन्हा सगळं सुरळीत चालू होतं, तेंव्हा समजून येतं कि क्षणिक सुखामागे आपण सतत धावत असतो, धडपडत असतो पण ही सगळी धावाधाव व्यर्थ आहे. आपल्याकडे जे काही आहे त्यातून आनंद निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या सोबत सभोवतालच्यांच आयुष्य सुखी करता आलं पाहिजे. एक छोटासा जीव शेकरा आपल्याला आयुष्यातील अनेक चढ उतार दाखवत शेवटाकडे घेऊन जातो. त्याने जे काही केलं त्यातून तो हिरो ठरत नसेलही पण रणजित देसाई यांनी त्यातूनही नायक म्हणून त्याचा पुरेपूर वापर केला आहे. शेकरा आपल्या सगळ्यांमध्ये आहे, तो स्वच्छंदी आहे पण अल्लड नाही, त्याला जाण आहे, तो जागरूक आहे आणि या सगळ्या पलीकडे तो निस्वार्थी असून जबाबदार देखील आहे. लेखकाने नायक म्हणून त्याच चित्रण करताना रेखाटलेला शेकरा मनावर राज्य करून जातो. त्याच्या अचानक जाण्याने तो हुरहूर लावून जातो. हा शेकरा वाचल्याशिवाय समजत नाही कारण शेकरा वाचण्याची नाही तर समजून घेण्याची जास्त गरज आहे. म्हणून ही रंजक जंगल सफारी एकदा करून बघण्यासारखी नक्कीच आहे. तुम्हाला ती निराश करणार नाही.

shekara ranjeet desai girish kharabe mehta


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/6014/shekara—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

2 Comments

  • खूप सुंदर कथा यावर मराठीत आईस एज सारखा animated चित्रपट बनू शकतो.

    • एकदम सुंदर संकल्पना आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *