shoe-dog-book-review-in-marathi-cover

शू डॉग

पोस्ट शेयर करा:

लेखक – फिल नाईट

पृष्ठसंख्या – ४००

प्रकाशन – सायमन अँड शुस्टर

मुल्यांकन – ४.८ | ५

एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी किती माणसे आहेत या जगात?? अगदी बोटावर मोजता येतील इतकीच आणि त्यापैकीच एक नाव म्हणजे “फिल नाईट”. खेळासाठी बनवल्या जाणाऱ्या बुटांचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या अवलीयाची ही जगप्रसिध्द कथा. असा कोणी आहे काय ज्याला यशस्वी व्हायचं नसतं ?? स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं नसतं ?? स्वतःची स्वप्नं साकारायची नसतात ?? मात्र ते मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून फार थोडे लोक काम करतात. अशा झपाटून काम करणाऱ्यांच्या मागे यश नेहमीच उभं राहतं हे वेगळं सांगायला हवं काय?

Nike (नाईकी) चे जनक फिल नाईट यांच्या अनुभवांचं जीवनचरित्र असणारं हे पुस्तक वाचताना आपणच आपलं आयुष्य पुस्तकातून जगत आहोत असं वाटत राहतं आणि हेच या पुस्तकाचं बाकीच्यांपेक्षा वेगळं गमक आहे. लहानपणी शालेय अभ्यासात मन न रमणाऱ्या, लोकांच्या मतांना अनावश्यक महत्व देऊन मनात न्यूनगंड तयार झालेल्या एका लहान मुलाची ही कहाणी आपल्याला बालपणात घेऊन जाते. आईने केलेले संस्कार, मार्गदर्शन आणि तिचा सतत मिळालेला पाठिंबा हेच फिलच्या यशाचं खरं गमक आहे. सगळीकडे अपयशी ठरणारा मुलगा मात्र एका गोष्टीमध्ये उत्तम असल्याची जाणीव आईने करून दिल्यानंतर फिलने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो स्वतःच्या आयुष्याला देखील एक धावण्याचीच स्पर्धा मानतो आणि जर ती जिंकायची असेल तर त्यात नियमितता आणि कष्ट कसे महत्वाचे आहेत हे आपल्याला पटवून देतो.

मुळातच फिलला धावण्याची आवड असल्याने, त्यात आलेले अडथळे दुसऱ्या कोणाला भेडसावू नयेत म्हणून सर्वोत्तम बूट बनवण्यासाठी त्याने सबंध आयुष्य अर्पण केलं. पदवी घेत असताना बुटांवर त्याने स्वतःचा प्रकल्प बनवून, त्यावर संशोधन करून नवनवीन पैलू जगासमोर मांडले. घरच्यांचा विरोधही नव्हता आणि पाठिंबाही नव्हता अशा परिस्थितीत खिशात मोजक्या दमड्या घेऊन निघालेला हा माणूस स्वबळावर आपल्या ध्येयासाठी झगडताना पाहून नक्कीच एक वेगळी ऊर्जा मिळते. जपान आणि अमेरिकेमध्ये विश्व युद्ध चालू असताना एका अमेरिकन नागरिकाने, आमचा बूट कसा चांगला आहे… हे पटवून देणे व याची जपानला कशी मदत होईल हे सांगणे मुळातच हास्यास्पद आहे. त्याला झालेला विरोध, त्याने सहन केलेल्या, अनुभवलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात परिपक्व बनवून जातात. जगण्याचे हजारो नवीन पैलू शिकवून जातात. संपूर्ण आयुष्य स्वप्नांसाठी झगडलेल्या एका माणसाच्या सानिध्यात आपल्याला स्वतःची वेगळी ओळख झाल्याशिवाय राहत नाही. अशी ही ध्येयवेडी कथा वाचताना एक वेगळीच जाणीव होते, एक वेगळाच उत्साह अंगात जाणवू लागतो.

आयुष्याची स्पर्धा जिंकण्यासाठी नक्की काय काय करावं लागतं, त्यात छोट्या छोट्या गोष्टी देखील किती महत्वाच्या असतात हे फिल आपल्याला सांगून जातात. आत्मचरित्र असले तरी कथा-कादंबरी प्रमाणेच यात अनेक विषय व दृष्टिकोन रंगवलेले आहेत. जे आपसूकच आपलं अवघं विश्व व्यापून घेतात. माझ्या लेखी तरी सर्वोत्कृष्ट अशा काही पुस्तकांमध्ये याचा समावेश नक्कीच होतो. वाचण्यासारखं, अनुभवन्यासारखं असं काहीसं हे फिल नावाचं अजब रसायन वाचल्याशिवाय समजतही नाही आणि समजावताही येत नाही !!

phil knight nike shoe dog memoir creator akshay gudhate simon schuster


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/9927/shoe-dog—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]
संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

अक्षय सतीश गुधाटे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *